शिवाजी विद्यापीठाने बदलले एम.बी.ए. अभ्यासक्रमाचे स्वरूप

Published On: Sep 10 2019 1:21AM | Last Updated: Sep 10 2019 1:21AM
Responsive image


डॉ. सारंग भोला

बदलत चाललेला काळ, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उद्योगधंद्याच्या व व्यापार्‍यांच्या गरजा त्याचप्रमाणे भारतातील उच्च शिक्षण नियंत्रित करणार्‍या यूजीसी, एआयसीटीई व डीटीई आदी शासकीय विभागांच्या अपेक्षा लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाने एमबीएच्या अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल केले आहेत. ते तरुणांना नव्या शैक्षणिक प्रवाहात अग्रेसर ठेवण्यात मदत करतील. नव्या बदलांना सामोरे जात असताना विद्यार्थ्यांना उद्योगधंद्यांना व विस्तारित होणार्‍या सेवा क्षेत्रांना अपेक्षित अशी कौशल्ये प्रदान करण्यात येणार आहेत. सर्वांगीण विकास आणि उद्योजकीय कौशल्यांनी परिपूर्ण असे मनुष्यबळ नव्या एमबीएमुळे निर्माण होणार आहे.

एमबीएचा नवा अभ्यासक्रम हा एआयसीटीईच्या मॉडेल क्युरिक्युलमचा आधार घेऊन तयार केला असल्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमाशी तो सुसंगत झाला आहे. नोकरीच्या व स्वयंरोजगाराच्या जास्तीत जास्त संधी आता सेवा क्षेत्रात उपलब्ध असल्यामुळे सेवा क्षेत्रात विशेष नैपुण्य प्राप्त होण्यासाठी हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट हे नवे स्पेशलायझेशन देऊ केले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारामधील संधी पाहता त्या क्षेत्रातील ज्ञान प्राप्तीसाठी इंटरनॅशनल बिझनेस हे स्पेशलायझेशन देऊ केले आहे. 

ज्या तरुणांना नव्याने उद्योग सुरू करावयाचे आहेत, किंबहुना असलेले उद्योगधंदे वृद्धिंगत करावयाचे आहेत, त्यांच्यासाठी आंत्रप्रिन्युअरशीप डेव्हलपमेंट हे स्पेशलायझेशन नव्याने निर्माण केले आहे. हे करत असताना मार्केटिंग मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, प्रोडक्शन मॅनेजमेंट, सिस्टीम्स मॅनेजमेंट आणि अ‍ॅग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट हे प्रस्थापित अस्तित्वात असलेले स्पेशालायझेशन आणखी दर्जेदार स्वरूपात देऊ केले आहेत. 

एमबीएच्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन स्पेशलायझेशन देऊ करणारे शिवाजी हे महाराष्ट्रातील एकमेव विद्यापीठ आहे. यामुळे विद्यार्थ्यांना एकमेकास पूरक असे विषय निवडता येेतात. त्याचबरोबर बदलत्या परिस्थितीत करिअरमध्ये मार्गक्रमण करताना आवडीप्रमाणे आणि उपलब्ध संधी पाहून स्पेशालायझेशनुसार करिअरच्या अधिक संधी शोधता येतात. नवीन अभ्यासक्रमात एमबीए पूर्ण झाल्यानंतरसुद्धा जर अधिकचे स्पेशलायझेशन करावयाचे असेल तर ते करण्याची सोयही या अभ्यासक्रमात केलेली आहे, हे याचे आणखी एक वैशिष्ट्य.

नव्या एमबीएच्या अभ्यासक्रमात सैद्धांतिक अभ्यासाचा भार कमी करून प्रात्यक्षिकांवर अधिक भर देण्यात आलेला आहे. प्रत्येक विषयाच्या प्रत्येक टॉपिकवर प्रॅक्टिकल देण्यात आलेले असून प्रत्येेक सेमिस्टरमध्ये एक विषय केवळ कौशल्य वृद्धीसाठीच राखून ठेवण्यात आलेला आहे. ज्यात विद्यार्थ्यांचे सॉफ्ट स्कील्स, प्रभावी व्यवस्थापनविषयक कौशल्ये, रोजगाराभिमुख कौशल्ये यांच्यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. प्रत्येक सत्रात दिलेल्या सहा विषयांच्या यादीतून एक आवडीचा विषय निवडण्याची मुभा विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमात देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी करून व्यावहारिक कौशल्यवृद्धी करण्याचा प्रयत्न या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.

एमबीएच्या परीक्षा पद्धतीतही व्यवहार्य बदल केले आहेत. 60 गुणांची विद्यापीठ परीक्षा, 20 गुणांची ऑनलाईन मल्टिपल चॉईस परीक्षा आणि 30 गुणांचे अंतर्गत गुण, अशी 100 गुणांची परीक्षा होणार आहे. सन 2016 पासूनच अंतर्गत गुणांसाठी शिवाजी विद्यापीठाने ओपन बुक एक्झामिनेशन सुरू केली. नव्या अभ्यासक्रमात अंतर्गत मूल्यमापनाबरोबरच विद्यापीठ परीक्षांमध्ये फक्त स्पेशलायझेशन पेपर्ससाठी ओपन बुक एक्झामिनेशन देऊ केली आहे. 
विद्यापीठ परीक्षांसाठी ओपन बुक एक्झामिनेशनचा पर्याय देऊ करणारे शिवाजी विद्यापीठ महाराष्ट्रातील एकमेव विद्यापीठ आहे.

शिक्षकांसाठीसुद्धा कालबाह्य प्रशिक्षणाची व्यवस्था या अभ्यासक्रमात केली आहे. जेणेकरून शिक्षक व्यापार, सेवा व उद्योगांमधील प्राप्त परिस्थिती व बदल विद्यार्थ्यांसमोर योग्य रीतीने मांडू शकतील. यूजीसीच्या अपेक्षा लक्षात घेऊन व विद्यार्थ्यांना अधिकचे शैक्षणिक स्वातंत्र्य देण्याच्या उद्देशाने स्वयंम व मूक (MOOC) हे ऑनलाईन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना करता येणार असून नवीन अभ्यासक्रमातील अंतर्गत विषयांच्या बदली हे विषय घेता येतील, अशी व्यवस्था या अभ्यासक्रमात करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या आणि ज्यांच्या नावे हे विद्यापीठ आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीती, राजकारण, स्वराज्य, व्यवस्थापन, अर्थनीती इत्यादींचा परिचय एमबीएच्या विद्यार्थ्यांना करवून देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज - द मॅनेजमेंट गुरू’ हा विषय अभ्यासक्रमात देणारे शिवाजी विद्यापीठ केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिले विद्यापीठ ठरले आहे.
(लेखक शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असून कर्मवीर भाऊराव  पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सातारा येथे कार्यरत आहेत.)