MPSC 2020 : तयारीचा अंतिम टप्पा

Last Updated: Mar 16 2020 7:47PM
Responsive image

प्रा. सुजित गोळे


" The best preparation for tomorrow is doing your best today" स्पर्धा परीक्षा उमेदवारांचा प्रत्येक क्षण हा जणू काही युद्धाचाच प्रसंग असतो आणि त्यामध्ये देखील शेवटच्या दिवसातील तयारीला खूप महत्त्व द्यावे लागते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी व बहुतांश उमेदवारांचे स्वप्न असणारी राज्यसेवा नावाची परीक्षा एप्रिल महिन्यात पूर्व टप्प्यावर घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील अगदी कानाकोपर्‍यातून उमेदवार अर्ज भरतात. मात्र, यामधून काही निवडक विद्यार्थी वा उमेदवार यशस्वी होताना दिसतात. यासाठी काही प्रमाणात कारणीभूत असणारा घटक म्हणजे अंतिम टप्प्यातील तयारी होय. कारण, यामध्ये उमेदवार पिछाडीवर पडल्यास कदाचित पुढील परीक्षेसाठी एका वर्षाचा अवधी पुन्हा द्यावा लागतो. 

कोणतीही स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी नियम म्हणजे तुम्हाला त्या स्पर्धेच्या परिस्थितीमध्ये इतरांपेक्षा कमीत कमी एक पाऊल पुढे राहता येणे गरजेचे असते. अगदी शेवटच्या दिवसांच्या तयारीत काही ठळक मुद्द्यांवर. उमेदवारांनी भर देणे आवश्यक असते.

स्पर्धा परीक्षेचा प्रत्येक टप्पा उमेदवारांची वेगवेगळी कौशल्ये, गुण तपासत असतो. उमेदवारांनी त्या त्या टप्प्यांच्या मागणीनुसार स्वतःच्या तयारीत बदल करणे अपेक्षित असते. जसे राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये पेपर क्र. 1 हा संपूर्णपणे सामान्य अध्ययनाचा म्हणजे इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र व इतर विषयांचा असतो. यामध्ये उमेदवारांना विषयांतील संकल्पनांचे ज्ञान असावे. यामध्ये कोणत्याही प्रकारे वेळेचे व्यवस्थापन हा मुद्दा आयोगाकडून तपासला जात नाही. मात्र, पेपर क्र. 2 ज्यास CSAT असे म्हणतात. यामध्ये संपूर्णतः वेळेचे व्यवस्थानन करणे गरजेचे असते. उमेदवारांनी या काळात दिवसाचे नियोजन दोन्ही पेपरसाठी समान करावे, चुकूनही CSAT पेपरकडे दुर्लक्ष होता कामा  नये. कारण, हा पेपर गुण देणारा आहे.

उजळणी : शेवटच्या काळात उमेदवारांनी जास्तीत जास्त उजळणीवर भर द्यावा. शक्य असल्यास नवीन संकल्पना वा पुस्तके वाचन टाळावे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम हा विस्तारित स्वरूपाचा असतो आणि परीक्षेमध्ये कोणत्याही विषयामधील कोणताही मुद्दा अचानकपणे आठवणे गरजेचे असल्याने उमेदवारांनी जास्तीत उजळणी करणे अपेक्षित असते. उजळणी करत असताना जे संदर्भसाहित्य वा नोटस् वर्षभर वापरलेले असते तेच उजळणीसाठी वापरावे. या काळात बाजारात नवनवीन रंगीबेरंगी पुस्तके येत असतात. त्याचा वापर टाळावा.

सराव : परीक्षेचा अभ्यास व परीक्षा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या उमेदवाराचा अभ्यास जरी पूर्ण झाला असला तरी परीक्षेत ऐनवेळी गोंधळू शकतो यासाठी सराव करणे गरजेचे असते. सराव करत असताना आयोगाच्या धर्तीवरच प्रश्‍नांची काठिण्य पातळी असल्यास योग्य राहते. यामुळे परीक्षेवेळी येणारे संकट जसे वेळेचे नियोजन, टेन्शन, छोट्या चुका आदी यांची प्रचिती उमेदवाराला परीक्षेअगोदरच होते. त्यामुळे परीक्षेतील चुका टाळता येतात. 

आहार : शेवटच्या टप्प्यावर अभ्यास जास्तीत जास्त व्हावा यासाठी बरेच उमेदवार स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष करतात. मात्र, अभ्यास जरी चांगला असेल; पण परीक्षेदिवशी तब्येत बिघडल्यास वर्षभराच्या मेहनतीवर पाणी सुटू शकते. त्यामुळे आहार योग्य असावा व तो हलका पण वेळेवर असावा.

मानसिकता व आत्मविश्‍वास : हा शेवटचा मात्र खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणावा लागेल. कारण स्पर्धा परीक्षा क्षेत्रात असे बरेच उमेदवार पाहिलेत. ज्यांचा अभ्यास, सराव व इतर सर्व बाबी योग्य असतात. मात्र, शेवटच्या काही दिवसांत त्यांची मानसिकता, आत्मविश्‍वास कमी होतो व ते अपेक्षेप्रमाणे यश प्राप्‍त करीत नाहीत. परीक्षा म्हटले की शरीरात काही हार्मोनल बदलणे हे स्वाभाविक आहे. मात्र, ते परीक्षाभिमुख असल्यास उमेदवारास खूप मोठा फायदा होतो. म्हणूनच कोणत्याही टप्प्यावर स्वतः आत्मविश्‍वास कमी होऊ द्यायचा नाही. स्वतःच्या मेहनती व प्रयत्नावर विश्‍वास ठेवून पुढे जावे. 

वरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर योग्य विचार केल्यास व त्याप्रमाणे परिवर्तन झाल्यास सन 2020 ची पूर्व परीक्षा नक्‍कीच पास होता येईल.