संयुक्त पूर्व परीक्षा २०२०

Last Updated: Mar 02 2020 8:04PM
Responsive image


‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत’ PSI/STI/ASO या तीन पदांसाठी घेण्यात येणारी संयुक्त पूर्व परीक्षा यासाठीची सन 2020 ची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली. सदर परीक्षा ही एकूण 806 पदांसाठी घेण्यात येणार असून त्यासाठीचा अर्ज भरण्याचा कालावधी 28 फेब्रुवारी 2020 पासून 19 मार्च 2020 पर्यंत असणार आहे. सदर पूर्व परीक्षेचा दिनांक 3 मे 2020 असून ती महाराष्ट्रामधील 37 जिल्हा केंद्रांवर घेण्याचे प्रस्तावित आहे. यासाठीचे अर्ज हे online स्वरुपात स्वीकारण्यात येतात. प्रस्तुत परीक्षा ही एका पेपरची असून त्यासाठी 100 प्रश्न 100 गुणांसाठी विचारण्यात येतात तसेच यामध्ये नकारात्मक गुणपद्धतीचा वापर होतो. त्यामुळे या परीक्षेच्या तयारीसाठी योग्य अशी रणनीती व अभ्यासपद्धती उमेदवारांनी स्वीकारावी. या परीक्षेसाठी एकूण सात घटकांचा समावेश आयोगाने केलेला आहे, या सात घटकांच्या अभ्यासाविषयी आपण चर्चा करुयात.

1) इतिहास - अभ्यासक्रम - आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास. इतिहास हा विषय तसा खूप व्यापक आहे, मात्र सदर परीक्षेसाठी याची तयारी एका विशिष्ट पद्धतीने करावी तसेच अभ्याससाहित्य देखील मर्यादीत ठेवून वारंवार उजळणी करणे उचित ठरते. 
पुस्तक सूची - शालेय पुस्तके : इयत्ता 5 वी, 8 वी, 11 वी , आधुनिक भारताचा इतिहास : जयसिंगराव पवार, समाधान महाजन, महाराष्ट्राचा इतिहास : कठारे/गाठाळ, समाजसुधारक : के सागर प्रकाशन

2) भूगोल - अभ्यासक्रम - (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इ.
परीक्षेसाठी महत्त्वाचा विषय असून गुण प्राप्तीसाठी योग्य असा विषय असल्यामुळे पुढील पुस्तकांचा वापर करावा.
पुस्तक सुची - शालेय पुस्तके  : इयत्ता 5 वी ते 12 वी.
भारताचा भूगोल : ए. बी. सवदी, महाराष्ट्राचा भूगोल : ए. बी. सवदी/खतिब
नकाशा वाचन : ए. बी. सवदी.

3) अर्थव्यवस्था - अभ्यासक्रम - भारतीय अर्थव्यवस्था - राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्य्र व बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीती.
शासकीय अर्थव्यवस्था - अर्थसंकल्प, लेखा, लेखापरिक्षण.
पुस्तक सुची - रंजन कोळंबे, किरण देसले.

4) नागरिकशास्त्र - अभ्यासक्रम - भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्यव्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन).
पुस्तक सूची - शालेय पुस्तके 11 वी, 12 वी
भारतीय राज्यघटना - रंजन कोळंबे.
पंचायत राज - किशोर लवटे.

5) सामान्य विज्ञान -  अभ्यासक्रम - भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, आरोग्यशास्त्र.
पुस्तक सूची - सर्वप्रथम इयत्ता 5 वी ते 10 वी क्रमिक पुस्तके व्यवस्थित करावीत. चंद्रकांत गोरे (भाग 1 व 2), रंजन कोळंबे.

6) बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित - अभ्यासक्रम -  बुद्धिमत्ता चाचणी : उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.
अंकगणित : बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी. 
पुस्तक सूची : पंढरीनाथ राणे, नितीन महाले, अनिल अंकलगी, सुजित पवार.

7) चालू घडामोडी - अभ्यासक्रम - जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडींचा अभ्यास ही सतत चालणारी प्रक्रिया असते.

पुस्तक सूची :  • महत्त्वाची वर्तमानपत्रे वापरावीत. रविवारच्या वर्तमान पत्रातील पुरवण्या • मासिके : 1) योजना 2) लोकराज्य 3) युनिक बुलेटिन/पृथ्वीची परिक्रमा.
वरील सर्व घटकांचा योग्य पद्धतीत वापर केल्यास याचा नक्कीच फायदा 2020 मध्ये होणार्‍या पूर्व परीक्षेमध्ये होईल.