Tue, Apr 23, 2019 01:38होमपेज › Edudisha › जाहिरात क्षेत्रातील अभिनव करिअर्स

जाहिरात क्षेत्रातील अभिनव करिअर्स

Published On: Sep 10 2018 8:51PM | Last Updated: Sep 10 2018 8:51PMजाहिरात क्षेत्रात सातत्याने नावीन्यपूर्ण बदल होत असल्याने कोणतेही दोन दिवस सारखे नसतात. सध्याच्या केबल आणि डिजिटल चॅनेल्सच्या जमान्यात हे क्षेत्र सातत्याने बदलते आहे. त्यामुळे या क्षेत्राला कल्पकतेची आणि सृजनशीलतेची गरज भासते. ‘माकेटिंग कॅम्पेन’ची धुरा वाहण्याची जबाबदारी जाहिरात एजन्सीकडे असल्याने बाजारपेठेची ‘नस’ पकडण्याची कसब जाहिरात निर्मितीमध्ये असायला हवी.

-प्रा. मनोहर हिरिकुडे

ताजेपणाची लज्जत देणारी फार थोडी अशी करिअर्स आहेत. त्यापैकी एक म्हणजे अ‍ॅडव्हरटायझिंग इंडस्ट्री (जाहिरात उद्योग) हे आहे. हे करिअर करताना तुम्हाला सातत्याने नावीन्याचा ध्यास घ्यावा लागतो. या क्षेत्रातील जीवघेण्या स्पर्धेत आपल्या फर्मचा आगळा ठसा उमटविण्यासाठी तुम्हाला तुमच्या कल्पकतेचा कौशल्याने उपयोग करावा लागतो. त्यामुळे ज्यांना नेहमी उत्तमातील उत्तम गोष्टी साधण्याची ओढ असते त्यांच्याकरिता हे क्षेत्र आव्हानात्मक तसेच भरपूर आर्थिक लाभ देणारे करिअर ठरू शकते. या क्षेत्रात सातत्याने उत्क्रांती होत असल्याने कोणतेही दोन दिवस सारखे नसतात, इतके हे विश्‍व नावीन्यपूर्ण आहे. क्‍लायन्ट किंवा ग्राहकांची मानसिकता/वर्तन सातत्याने बदलत असल्याने हे करिअर करणार्‍यांना या क्षेत्रात आघाडीवर राहण्याकरिता नवनवीन कौशल्ये आत्मसात करावी लागतात. 

• करिअर/व्यवसायाचे स्वरूप ः- 

जाहिरात क्षेत्र/उद्योग हे एक असे क्षेत्र आहे की जाहिरात एजन्सीने पुरविलेल्या गोष्टी एखाद्या व्यवसायाची किंवा उद्योग संस्थेची भरभराट किंवा विध्वंस काही क्षणातच करू शकतो. त्यामुळे हे करिअर करताना अतिशय जबाबदारीने आणि सर्व घटकांचे भान ठेवून वाटचाल करावी लागते. आपले कामकाज यशस्वीपणे हाताळणार्‍या जाहिरात एजन्सी आपल्या सेवेसाठी भरपूर फी आकारून कार्यरत राहू शकतात आणि अतिशय आत्मविश्‍वासाने अनेकप्रकारच्या जाहिराती हाताळू शकतात. याकरिता एजन्सीमध्ये कार्यरत असणार्‍या जबाबदार कर्मचार्‍यांकडे उत्तम संवाद कौशल्य असणे अत्यंत आवश्यक बाब ठरते. 
सध्याच्या केबल आणि डिजिटल चॅनेल्सच्या जमान्यात, हे क्षेत्र सातत्याने बदलते आहे. त्यामुळे या क्षेत्राला नावीन्यपूर्ण कल्पकतेची आणि सृजनशीलतेची गरज भासते. ‘मार्केटिंग कॅम्पेन’ची धुरा वाहण्याची जबाबदारी जाहिरात एजन्सीकडे असल्याने बाजारपेठेची नस पकडण्याचे कसब जाहिरात निर्मितीमध्ये असायला हवे. वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून एकाच वेळी कार्यरत राहण्याची क्षमता हवी. एखाद्या उत्पादनाची भविष्यातील स्थिती जाहिरातीच्या कौशल्यावर अवलंबून  असल्याने अशा जाहिराती हाताळताना जाहिरात निर्मात्याला आपल्या कल्पकतेची पराकाष्टा करावी लागते आणि व्यवसायात यश मिळवावे लागते.

जाहिरातीची परिणामकता साधण्यासाठी सध्या प्रसार माध्यमातील टेलिव्हिजन कमर्शिअल्स (जाहिराती), रेडिओ आणि प्रिन्ट मीडिया (वर्तमानपत्रे/नियतकालिके इ.) प्रामुख्याने वापरली जातात. अगदी अलीकडच्या डिजिटल मीडिया साधनांनी जाहिरात उद्योगात फार मोठा बदल घडवून आणलेला आहे. जाहिराती विश्‍वाचे स्वरूपच पालटून गेले आहे. स्मार्ट फोनच्या उपलब्धतेमुळे डिजिटल अँड नेटवर्कमध्ये एक प्रकारची क्रांतीच घडून आली आहे. हायस्पीड नेटवर्कस् नाममात्र किमतीला उपलब्ध होत असल्याने कामाची व्याप्ती सातत्याने वाढते आहे. मोबाईल  फोन अ‍ॅपस्, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मस्, कस्टम सॉफ्टवेअर, डेस्कटॉप अ‍ॅप्लिकेशन्स अशा गॅजेटस्मुळे जाहिरात व्यवसायाचे स्वरूपच बदलून गेले आहे आणि त्यामुळे गुगल अ‍ॅडस् सारख्या एजन्सीज भरपूर आर्थिक कमाई करीत आहेत. 

• शिक्षण/प्रशिक्षण संस्था ः- 

जाहिरातीचे काम देणार्‍या संस्था जाहिरात एजन्सीला जी फी देतात त्या मोबदल्यात त्यांना आपल्या उत्पादित घटकाच्या बाजारपेठेतील अवस्थेला उठाव प्रमाणे अपेक्षित असते. संस्थांची ही अपेक्षा पूर्ण करण्याकरिता जाहिरात एजन्सीमध्ये काम करणार्‍यांना अनेक कौशल्ये आत्मसात असणे आवश्यक ठरते. जाहिरात क्षेत्राला आवश्यक असणारे शिक्षण/ प्रशिक्षण देणार्‍या अनेक शैक्षणिक संस्था सध्या कार्यरत आहेत. 

जाहिरात विश्‍वाशी संबंधित शिक्षण संस्थेत प्रवेश घेणार्‍या उमेदवाराला कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे. 12 वी नंतर जर्नालिझम कोर्सेस/डिग्री करणे करिता प्रवेश घेता येतो. याकरिता 12 वीमध्ये 50टक्के गुण मिळविणे आवश्यक ठरते. अशा संस्थेत प्रवेशाकरिता प्रवेश परीक्षा, मुलाखत अशी  प्रक्रिया अवलंबिली जाते. 

• जाहिरात क्षेत्राला आवश्यक असणारे शिक्षण/प्रशिक्षण देणार्‍या संस्थेमध्ये प्रामुख्याने पुढील संस्थांचा समावेश केला जातो ः 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, नवी दिल्‍ली, भूद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन (एमआयसीए) गुजरात, झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन, मुंबई, सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन, पुणे, मॉसको मीडिया नवी दिल्‍ली, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, फिल्म अँड टेलिव्हिजन स्टडीज, कोलकत्ता, इंडियन फील्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट उत्तर प्रदेश/पुणे, वृत्तपत्र विद्या आणि मास कम्युनिकेशन विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. 

या क्षेत्रात व्यवसाय/नोकरी/करिअर करू इच्छिणार्‍या उमेदवारांकडे काही मूलभूत कौशल्ये असणे आवश्यक बाब ठरते. अति उत्तम संवाद कौशल्ये, भाषण मॅनेजमेंट, कन्टेट क्रिएशन (जाहिरात मसुदा निर्मिती), सर्च इंजिन ऑप्टिमायजशन (संशोधन वृत्ती) इत्यादी गोष्टींच्या विशिष्ट विभागात कार्यरत राहण्यासाठी उमेदवाराला पुढीलपैकी एका कोर्सची निवड करावी लागते.

• मीडिया- जर्नालिजम किंवा मास कम्युनिकेशन

• स्टुडिओ- फाईन आर्टस्मधील पदवी

• फिल्मस्- ऑडिओ-व्हिज्युअलमधील

• विशेष प्रशिक्षण, क्‍लायन्ट सर्व्हिसिंग - एम. बी. ए. किंवा माकेटिंगमधील पदव्युत्तर  पदविका. 

•नोकरी/व्यवसाय संधी उपलब्धता ः- 

जाहिरात क्षेत्रातील मोठ्या पगाराच्या नोकर्‍या प्रामुख्याने पुढील दोन प्रकारांत उपलब्ध असतात. 

•एक्झिक्युटिव स्वरुपाच्या नोकर्‍या ः 

क्‍लायन्ट सर्व्हिसिंग, मार्केट रिसर्च, मीडिया रिसर्च इ. विभागात एक्झिक्युटिव दर्जाच्या नोकर्‍या उपलब्ध असतात. क्‍लायन्टच्या गरजा/अपेक्षा समजावून घेणे हे अशा एक्झिक्युटिवची मुख्य जबाबदारी असते. नव्या क्‍लायन्टस्चा शोध घेणे, व्यवसाय वृद्धी करणे, योग्य प्रसार  माध्यमाची निवड करणे, जाहिरातीचा कालावधी, स्थळ आणि आर्थिक बाजूंचा विचार करणे इ. कामे अशा एक्झिक्युटिवना करावी लागतात. 

• क्रिएटिव जॉब पोझिशन्स ः- 

जाहिरात एजन्सीच्या क्रिएटिव टीममध्ये अशा नोकर्‍या उपलब्ध असतात. विविध माध्यमांमध्ये जाहिरात प्रसारीत करण्याकरिता तिची पूर्ण स्वरुपातील निर्मिती क्रिएटिव टीमला करावी लागते. यामध्ये कॉपी रायटर्स, स्क्रिप्ट रायटर्स, व्हिज्युलायजर्स, क्रिएटिव डायरेक्टर्स, फोटोग्राफर्स यांचा समावेश असतो. 

जाहिरातीचे क्षेत्र हे सातत्याने वाढत जाणारे क्षेत्र आहे. अनेक क्षेत्रामध्ये आर्थिक मंदीची लाट येणे/जाणे सुरू असले तरी या क्षेत्रामध्ये मात्र सतत वृद्धीच होत असते. 

जगातील सर्वात मोठ्या न्यूज एजन्सीमध्ये गणल्या जाणार्‍या ग्रुप एम (च) च्या अगदी अलीकडच्या अहवालानुसार देशी मार्केटमध्ये 13 टक्के  वृद्धी अपेक्षित आहे. जाहिरात खर्चाचा वाढत जाणारा आलेख पाहता 2022 पर्यंत भारतीय अ‍ॅड मार्केट एक ट्रिलियन रुपये इतकी मजल मारणार आहे. अशा या सातत्याने वाढत जाणार्‍या जाहिरात क्षेत्रात प्रतिभावंत आणि कल्पक उमेदवारांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होत असतात.