Sat, Aug 24, 2019 12:21होमपेज › Edudisha › नाचते-बागडते करिअर  ः  डान्स थेरपिस्ट

नाचते-बागडते करिअर  ः  डान्स थेरपिस्ट

Published On: Feb 05 2019 1:59AM | Last Updated: Feb 19 2019 1:17AM
प्रियांका जाधव

नृत्यात पारंगत तरुण डान्स डायरेक्टर किंवा कोरिओग्राफर बनून पैसा कमावू शकतातच; शिवाय डान्स थेरपिस्ट हे नवे करिअर त्यांच्यासाठी सध्या उदयाला आले आहे. नृत्यात निपूण असण्याबरोबरच एक चिकित्सापद्धती म्हणून नृत्यकलेच्या वापराचे तंत्र आत्मसात करावे लागते.

तुम्हाला जर उत्तम नृत्य येत असेल तर केवळ नर्तक किंवा नृत्य दिग्दर्शक बनणे एवढेच पर्याय समोर असण्याचे दिवस मागे गेले आहेत. या क्षेत्रात करिअरचे आणखीही अनेक मार्ग आहेत. नृत्यकलेच्या आकर्षणातून तुम्ही स्वतःसोबत इतरांचीही सेवा करू शकता. मानवी सेवेशी निगडित या क्षेत्राचे नाव आहे डान्स थेरपी. गेल्या काही वर्षांत नागरिक आपल्या स्वास्थ्याविषयी जागरूक झाले असून, आजार होताच औषधे घेण्याबरोबरच आजार होऊ नये म्हणून अनेक मार्गांचा अवलंब करू लागले आहेत. अशा स्थितीत डान्स थेरपिस्ट म्हणून करिअर घडविण्यासाठी मोठी संधी उपलब्ध आहे. ‘यूएस ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिक्स’चा अहवाल असे सांगतो की, 2019 पर्यंत या क्षेत्रात थेरपिस्टची संख्या सुमारे 15 टक्क्यांनी वाढेल. 

कामाचे स्वरूप : नृत्यकलेतील विविध शैली आणि हालचालींचा वापर चिकित्सापद्धती म्हणून करून घेणे हे डान्स थेरपिस्टचे मुख्य काम होय. सर्व वयोगटातील व्यक्‍तींच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि मनोवैज्ञानिक समस्यांचे निराकरण नृत्याच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणे यात अपेक्षित असते. आपल्या क्लाएन्टची समस्या व्यवस्थित ऐकून घेणे, तिचा अभ्यास करणे आणि मग त्याच्यासाठी योग्य उपचारपद्धती निवडणे डान्स थेरपिस्टकडून अपेक्षित असते. वेगवेगळ्या थेरपी सेशनच्या माध्यमातून रुग्णाच्या स्थितीत होत जाणार्‍या सुधारणांच्या नोंदी ठेवून त्याचा अहवाल थेरपिस्ट तयार करतो. 

कौशल्य : उत्तम डान्स थेरपिस्ट होण्यासाठी कल्पकता आणि परिपक्वतेची गरज असते. याव्यतिरिक्‍त वेगवेगळ्या व्यक्‍तींना भेटून त्यांच्या व्यथा समजून घेण्याची पात्रता या थेरपिस्टकडे असावी लागते. त्यासाठी थेरपिस्टचे अंतर्गत व्यक्‍तिमत्त्व आणि संपर्ककौशल्य उत्तम असणे अपेक्षित असते. आपल्या कामात त्याला गोडी असायला हवी.

पात्रता : या क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त करण्यासाठी प्रथम पदवीधर असणे गरजेचे आहे. नृत्य प्रशिक्षणातही निपूण असणे आवश्यक आहे. मानसशास्त्र, समाजशास्त्र, समाजशिक्षण आणि तत्संबंधी विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍यांना नृत्याची आवड असेल, तर चांगले करिअर घडविता येते. अर्थात या क्षेत्रात पदार्पण करताना अनुभव घेण्यासाठी इंटर्नशिप करणेही तितकेच गरजेचे आहे. 

शक्याशक्यता : सामाजिक सेवा विभाग, रुग्णालये, सामुदायिक देखभाल केंद्रे, गुन्हेगार सुधारणा केंद्रे, विशेष मुलांच्या शाळा, कारागृहे आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये डान्स थेरपिस्टला काम करता येते. 

उत्पन्‍न : सुरुवातीच्या काळात वर्षाकाठी तीन ते साडेतीन लाख रुपयांची कमाई करणे सहज शक्य असते. जसजसा अनुभव वाढत जाईल, तसतसे उत्पन्‍नही वाढू शकते. तसेच स्वतंत्र व्यवसाय सुरू केल्यास उत्पन्‍नाला मर्यादा राहत नाही.

•अभ्यासक्रमासाठी संस्था - सिंबायोसिस, पुणे - एसआयडी़टी, दिल्ली, बंगळूर- टीआयएसएस, मुंबई

-संवेद सेन्टर, कोलकता