बिल्ट युवर करिअर

Published On: Jun 18 2019 2:07AM | Last Updated: Jun 18 2019 2:07AM
Responsive image

जगदीश काळे


देशात बांधकाम, निर्मिती उद्योग वेगाने वाढत चालला आहे. या उद्योगातील तेजीमागे मुख्य कारण म्हणजे भारत सरकारकडून या क्षेत्रात शंभर टक्के परकी गुंतवणुकीला मंजुरी देणे होय. बांधकाम, निर्मिती उद्योग क्षेत्राच्या विकासाचा विचार केल्यास बीपीओ इंडस्ट्रीनंतर या क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक प्रगती झाली आहे. या क्षेत्राचा प्रतिवर्ष वाढीचा दर हा 30 ते 40 टक्के राहिला आहे. एका अंदाजानुसार भविष्यातही हाच विकासदर कायम राहिला तर वर्ष 2020 पर्यंत भारत आशिया खंडातील सर्वात मोठा रिअल इस्टेट मार्केट म्हणून नावारुपास येईल, अशी शक्यता आहे.  

बांधकाम, निर्मिती उद्योगात करिअर करण्यासाठी सेल्स स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, व्यावहारिक आणि कामाप्रती जबाबदार राहणे यासारखे गुण असणे गरजेचे आहे. या वैशिष्ट्यांच्या आधारावरच बांधकाम, निर्मिती उद्योगाच्या क्षेत्रात भवितव्य उज्ज्वल करण्याचे स्वप्न साकार करू शकतो. बांधकाम उद्योग हे असे क्षेत्र आहे की ज्याठिकाणी प्रॉडक्टच्या दर्जावर विशेष भर दिला जातो. जर बांधकाम कमकुवत असेल तर खरेदीदार भेटणार नाहीत. याच कारणामुळे आजही ग्राहक गुंतवणूक करण्यापूर्वी मालमत्ता किती विश्‍वासार्ह आहे, हे तपासून पाहत असतो. या गरजेमुळे आता कुशल, तज्ज्ञ प्रोफेशनल्सची मागणी वाढत चालली आहे. ही मंडळी केवळ पारंपरिक तंत्र जाणून असतात असे नाही तर या क्षेत्रातील आधुनिक रुपाशी देखील तितकेच परिचित असतात. 

बांधकाम उद्योगाच्या अंतर्गत आर्किटेक्चर, बिल्डिंग इंजिनिअरिंग आणि प्लॅनिंगसारखे अनेक कामांचा समावेश होतो. बांधकाम निर्मिती उद्योगाचा विस्तार आणि मोठ्या कंपन्यांच्या शिरकावामुळे टेक्नोक्रॅटसची मागणी सातत्याने वाढत चालली आहे.  आजच्या पारंपरिक गवंडीची जागा आर्किटेक्टने घेतली आहे. गवंडीचे काम हे त्याने सांगितलेल्या दिशादर्शकानुसार बांधकाम करणे एवढेच राहिले आहे. या कारणांमुळे बांधकाम क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. अनेक स्पेशलाइज्ड कामांसाठी कन्स्ट्रक्शन मॅनेजरला जबरदस्त मागणी वाढली आहे. बांधकाम निर्मिती उद्योगांकडे लोकांचा वाढता कल लक्षात घेता शिक्षण संस्थांनी देखील या क्षेत्राशी अनुकूल प्रशिक्षण अभ्यासक्रम राबवणे सुरू केले आहे. 

संधी कोठे कोठे? : बांधकाम उद्योगाच्या क्षेत्रात करिअरच्या पर्यायाचा विचार केल्यास हा एक बहुपर्यायी नोकरी प्रदान करणारे क्षेत्र आहे. बांधकामाचा विचार केल्यास यात दोन टप्पे असतात. आर्किटेक्टने प्रस्तावित केलेल्या बांधकामाचा नकाशा आणि त्यानुसार घर किंवा बांधकाम करण्याची जबाबदारी ही इंजिनिअर आणि मजुरांवर असते. डिझाईन तयार केल्यानंतर सिव्हिल इंजिनिअरचे काम सुरू होते. त्यात बांधकामाची जागा, तांत्रिक आणि आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांची पडताळणी, निर्मितीची अंमलबजावणी यांसारख्या घटकांचा समावेश असतो. सिव्हिल इंजिनिअरसाठी स्ट्रक्चरल इंजिनिअरची बॅचलर डिग्री असणे गरजेचे आहे. टाऊन अँड कंट्री प्लॅनर हा जमिनीचा अधिकाधिक वापर करण्याबाबत सल्ला देत असतो. या सर्व कामासाठी फिल्ड सर्व्हे आणि अभ्यास करणे गरजेचे आहे. यानंतर मॉडेल, स्केच किंवा ले-आऊट तयार केले जाते. अशा कामात तरबेज होण्यासाठी पदवीनंतर पोस्ट ग्रॅज्यूएट स्तरावर प्रावीण्य मिळवणे महत्त्वाचे असते. बांधकाम क्षेत्रात ड्राफ्टस्मनचे काम देखील महत्त्वाचे असते. त्याला आर्किटेक्टबरोबर राहवे लागते. ड्राफ्टस्मन हा इमारत, रस्ता, पूल किंवा बंधारे आदी ठिकाणी पायाभूत नकाशा तयार करण्याचे काम करत असतो. एखादी योजना मंजूर झाल्यावर तो त्याचा सविस्तर साईट प्लॅन तयार करत असतो. कोणती गोष्ट कोठे तयार करावी आणि किती मजली असावी, याचा आराखडा ड्राफ्टस्मन करत असतो. 

अभ्यासक्रम : कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये अभ्यासक्रमासाठी किमान पात्रता ही इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर यापैकी कोणत्याही शाखेत पदवी किंवा आटर्स, कॉमर्स किंवा विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी मिळवणे गरजेचे आहे. याशिवाय कंपनी सचिव, चार्टड अकाऊंटंट, पदवीधर इंजिनिअर, वास्तुकार यांच्यासाठी कंस्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये पोस्टल अभ्यासक्रम देखील आहे. गेल्या काही वर्षांपासून रिअल इस्टेटशी निगडित नवीन कंपन्या बाजारात येत आहेत. या कंपन्या रिअल इस्टेट फायनान्स, इन्शूरन्स, मार्केटिंग, लिगल, प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंटसाठी एक्झिकेटिव्हची नियुक्‍त करते. या कंपन्यांत मॅनेजमेंट ट्रेनी, असिस्टंट मॅनेजर, सेल्स एक्झिकेटिव्ह, लिगल एक्झिकेटिव्ह, प्रोजेक्ट कन्सल्टंटच्या रुपातून करिअर करता येते. पायाभूत रचनेत जसे की रस्ते, वीज, बंधारे, तलाव, विहीर यांसारख्या क्षेत्रात विकास योजनांत प्रोजेक्ट मॅनेजर, साईट मॅनेजर, साईट ऑफिसर, सुपरवायझर आदी रुपातून उज्ज्वल भवितव्य करता येते. सार्वजनिक निर्मिती विभाग, टपाल आणि तार, रेल्वे, टाऊन अँड कंन्ट्री प्लॅनिग आणि सार्वजनिक क्षेत्रातील विभागात पात्र युवकांना रोजगाराच्या मुबलक संधी आहेत. आर्किटेक्चर आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमाधारक हे खासगी क्षेत्रातही आपले नशीब चमकवू शकतात. बहुराष्ट्रीय कंपन्या, रिअल इस्टेट, डेव्हलपर फर्म, निर्मिती सल्लागार कंपन्यांत पात्र बांधकाम व्यवस्थापकाला मोठी मागणी आहे. बॅकिंग आणि हाऊसिंग फायनान्स सेक्टरमध्ये देखील बांधकाम व्यवस्थापकाची गरज असते. बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शनचे प्रोफेशनल मंडळी स्वत:ची कंपनी देखील सुरू करू शकतात. 

प्रमुख संस्था : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट अँड रिसर्च मुंबई, गुडगाव, बंगळूर, पुणे, अ‍ॅकोमेडेशन टाईम्स इन्स्टिट्यूट ऑफ रिअल इस्टेट मॅनेजमेंट, मुंबई, अन्‍नामलाई विद्यापीठ, चेन्‍नई, रुरकी विद्यापीठ, रुरकी, ह्यूमन सेटलमेंट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली, निकमार कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीज स्टाफ कॉलेज, हैदराबाद, स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर, नवी दिल्ली, सेंटर फार एन्व्हायर्न्मेंट प्लॅनिंग अँड टेक्नॉलॉजी, अहमदाबाद.