शेकोटीचा व्हिडीओ

Last Updated: Mar 17 2020 8:27PM
Responsive image


गौरव अहिरे, नाशिक

दारूच्या व्यसनामुळे त्याची चांगली नोकरीही सुटली आणि संसारही तुटला. तेथून त्याच्या आयुष्यास उतरती कळा लागली. त्याची ओळखही पुसली जात होती. त्याच्या अशा वागण्याने ‘तो’ कोणालाही महत्त्वाचा नसल्यासारखाच होता! मात्र काही दिवसांतच पोलिसांनी त्याचा शेवट शोधला. शेवटही दारूच्या व्यसनातून झाल्याचे तपासातून लक्षात आले. तो बेपत्ता असल्याची साधी नोंदही नव्हती किंवा कोणी तक्रारही केलेली नव्हती. त्यामुळे पोलिसांनाही तो अनोळखीच होता. मात्र पोलिसांच्या चाणाक्ष नजरेच्या टप्प्यात एक व्हिडीओ आला आणि एक गंभीर गुन्हा उघडकीस आला..

घरफोडी करणार्‍या टोळीला पोलिसांनी पकडले होते. सुरुवातीस त्यांनी तीन ते चार घरफोड्या केल्याची कबुली दिली. मात्र त्यातील एक चोरटा रेकॉर्डवरील असल्याने या टोळीने जास्त घरफोड्या केल्याचा अंदाज पोलिसांना होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांची कसब लावून चौकशी सुरू केली होती. चोरटे घरफोडीतील मुद्देमालही देत नव्हते. पोलिस सतत चौकशी करीत होते. त्यातच एकाचा मोबाईल तपासत असताना हे चोरटे मद्यसेवन करून आगीसमोर शेकत असल्याचा व्हिडीओ दिसला. पोलिसांनी त्यांना विचारले की ‘तुम्ही काय जाळत होता?’ 
त्यांनी सांगितले की, ‘मेलेले जनावर होते, तेच जाळत होतो.’ 

तरीही पोलिसांनी बारकाईने व्हिडीओ पाहिला असता टोळीतील रम्या नावाचा एकजण आगीत वारंवार पेट्रोल ओतत असल्याचे दिसले. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा त्यांना विचारले की, ‘तेथे पालापाचोळा, लाकूडफाटा असतानाही तुम्ही पेट्रोल का ओतत होता?’ तेव्हा ‘नशेत असल्याने आम्ही पेट्रोल टाकत असल्याचे’ रम्याने सांगितले. पण पुन्हा पोलिसांच्या मनात शंका उपस्थित झाली. रम्याने पेट्रोल का आणले होते?

सहसा असे कोणीही पेट्रोल आणत नसतो किंवा अशा निर्जनस्थळी कारणाशिवाय पेट्रोलची आवश्यकताही नसते. त्यामुळे पोलिसांनी रम्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू केला. अनेक प्रश्नांमध्ये तो गोंधळल्याचे पोलिसांना जाणवले. त्यामुळे त्यांनी रम्यासह इतरांची पुन्हा चौकशी सुरू केली व व्हिडीओदेखील पुन्हा पुन्हा बारकाईने पाहिला व त्यांचे संभाषण ऐकण्याचा प्रयत्न केला. त्यात प्रकाश आगीकडे पाहून शिवीगाळ करीत रम्याला आगीवर वारंवार पेट्रोल टाकण्यास प्रवृत्त करीत होता. 

प्रकाशला कसलातरी संताप होता. तो व्यक्तकरताना आगीकडे सारखा पाहत होता. त्यामुळे पोलिसांनी चौकशीचा केंद्रबिंदू प्रकाशकडे वळवला. प्रकाशने सुरुवातीस नकारघंटाच वाजवली. मात्र पोलिसांनी आवाज चढवताच त्याने गुडघ्यात डोके घातले. खाली मान करूनच त्याने त्या दिवशीची सारी घटना सांगण्यास सुरुवात केली.

‘आम्ही जे जाळत होतो ते मेलेले जनावर नव्हते, तर आम्ही मारलेला दिनकर होता. त्याला मी माझ्या घरात आसरा दिला. तो शिकलेला असल्याने आमची न्यायालयातली कामे त्याच्याकडे सोपवली होती. त्याच्या दारूच्या व्यसनापायी त्याची नोकरी सुटली.संसारही तुटला. तरीदेखील त्याचे व्यसन सुटले नव्हते. आम्ही घरफोडी करून आणलेला पैसा, दागिने त्याच्याकडे ठेवण्यास देत होतो. मात्र तो त्या पैशांचीही दारू पीत होता. दारू पिऊन आम्हाला व घरच्यांना शिवीगाळ करीत होता. त्याचे हे वागणे नेहमीचेच झाले होते. त्यामुळे आम्ही त्याचा काटा काढण्याचे ठरवले. एक दिवस त्याला भरपूर दारू पाजली. दारूच्या नशेत त्याला कसलीच शुद्ध राहिली नाही. आम्ही त्याला मारझोड केली, त्यातच तो मेला. त्यानंतर आम्ही घरातच त्याचा मृतदेह जाळला. मात्र घरात धूर झाल्याने आम्ही घाबरलो. त्याचा मृतदेह विझवला आणि पोत्यात गुंडाळला. अंधार पडल्यानंतर आम्ही नदीकिनारी निर्जनस्थळी त्याचा मृतदेह नेला आणि तेथे जाळला. पण या सोम्याला शूटिंगची हुक्की आली आणि सगळा खेळ बोंबलला...’

पोलिसांनी नदीकिनारी असलेले ते ठिकाण गाठले. तेथे जाळपोळ केल्याचे थोडे पुरावे मिळाले. पोलिसांनी तेथील जागेची बारकाईने तपासणी केल्यानंतर काही मानवी हाडांचे तुकडे मिळाले. तसेच तेथील नदीपात्रातही पाहणी करून तेथून हाडांचे तुकडे बाहेर काढले. प्रकाशच्या घराची पाहणी केल्यानंतर एका भिंतीला नवीन रंग दिल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर त्या भिंतीवर रक्त सांडल्याने प्रकाश व त्याच्या मित्रांनी रंगकाम करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे आढळून आले. पोलिसांना ठोस पुरावा पाहिजे असल्याने त्यांनी घरातील फरशी तोडून तपासणी केली. त्यात त्यांना यश आले. फरशीखाली दिनकरचे रक्त आढळून आले. पोलिसांनी सर्व पुरावे गोळा करून न्यायालयात सादर केले. तसेच प्रकाश व त्याच्या साथीदारांना दिनकरचा खून करून पुरावे नष्ट केल्याच्या आरोपावरून कारागृहात धाडले. 

दिनकरचा घात त्याच्या व्यसनाने व वर्तवणुकीने केला. त्यातच द्वेष, रागातून प्रकाशने दिनकरचा खून केल्याचे निष्पन्न झाले. व्यसनामुळे दिनकर मूळ गावापासून दुसर्‍या गावी आल्याने त्याला फारसे कोणी ओळखत नव्हते. 

त्यामुळे तो मेल्यानंतरही कोणी दिनकर बेपत्ता झाल्याची किंवा त्याचा घातपात झाल्याची तक्रार केलेली नव्हती. पोलिसांनीही तो व्हिडीओ बारकाईने पाहिला नसता, तर दिनकरचा शेवट गूढच राहिले असते.