Wed, Jul 24, 2019 08:18होमपेज › Crime Diary › झटका ‘बबली’चा! 

झटका ‘बबली’चा! 

Published On: Aug 29 2018 1:45AM | Last Updated: Aug 28 2018 11:24PMपश्‍चिम महाराष्ट्रातील एका शहरात काही वर्षांपूर्वी घडलेली ही घटना! एका उच्चमध्यवर्गीय कुटुंबात मुलाच्या विवाह सोहळ्याची धामधूम सुरू होती. मुलगा अमेरिकेत नोकरीस असल्याने सोहळ्याचा थाट औरच होता. एकुलता एक मुलगा, तो देखील विदेशात नोकरीस! जणू घी मे शक्‍कर..यामुळे त्याच्या घरच्यांनी न चुकता सर्वच नातेवाईकांना लग्‍नाचे आमंत्रण दिले होते. लग्‍नाला नातेवाईकांची मोठीच गर्दी झाली होती. 

मात्र, याच लग्‍नात आतापर्यंत कधी फारशी न आलेली, तशी नात्यातीलच मात्र लांबून खास लग्‍नासाठी आलेल्या तनयाने  आपल्या रुपाने, आणि मिठ्ठास बोलण्याने  सर्वांच्याच मनात घर केले. लग्‍न धामधूमीत झाले. सारे सायंकाळी कार्यालयातून घरी आले. तनयादेखील  वर्‍हाडघरी  आली. दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर परत गावाकडे जायचे, त्याआधी  ती संध्याकाळी मित्राला भेटायला जाते म्हणून निघून गेली. मात्र, लग्‍नाच्या गर्दीत तिच्याकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही.  मात्र, रात्री उशिरा जेवताना बोलकी तनया कोठे दिसेना, ती कोठे गेली असा विषय निघाला. पण कोणतरी घरातलेेच म्हणाले की, ती सकाळी लवकर गावाकडे जाणार आहे, म्हणून शहरातीलच एका जुन्या मित्राला भेटायला गेली आहे. यावर तिच्याबाबत फारसा काहीच विचार झाला नाही. 

रात्र संपली..दिवस उजाडला...लग्‍नघरात नवविवाहित वधू-वरांचा खेळपाणी, रंगपाण्याचा खेळ झाला.  मुलाला सुट्टी कमी म्हणून नवविवाहित दाम्पत्याचे देवदर्शनाला जाण्याचे ठरले. नवविवाहित दाम्पत्याची आतील रुममध्ये आवरा आवरीची धांदल सुरू झाली. आणि रुममधून एकच दंगा सुरू झाला.  मुलाचे सोन्याचे दागिने सापडत नसल्याने घरातील सारेच हादरले. घरची मंडळी हादरली तर मुक्‍कामास राहिलेले सारेच नातेवाईक गप्प झाले. लग्‍नघराचे वातावरण काही क्षणातच बदलून गेले.  सार्‍यांचीच मती गुंग झाली. हळूहळू चर्चा, अंदाज सुरू झाले. घरात कोण अनोळखी आले होते का, कोण संशय येण्यासारखे वागले का याची चर्चा सुरू झाली. एवढ्यात एका नातेवाईकाने  पोलिसांत  तक्रार देण्याची सूचना केली. तडक वरपित्यासह काही जबाबदार व्यक्‍तींनी थेट पोलिस ठाणे गाठले.  सोन्याची साखळी, काही दागिने आणि लाखभर रुपयांची रोकड लंपास झाल्याची  तक्रार पोलिसांनी नोंद करून घेतली. 

ठाणे अंमलदार चव्हाण हे पोलिस खात्यात मुरलेले होते. लग्‍न घरातील चोरी करणारी व्यक्‍ती बर्‍याचवेळा नातेवाईक असते, हे त्यांच्या या आधी घडलेल्या अशा अनेक घटनांतून लक्षात आले होते. सारी तक्रार नोंदवून घेतल्यानंतर त्यांनी चष्मा काढून टेबलवर ठेवला. डोळे स्वच्छ केले आणि वरपित्याला प्रश्‍न विचारला, तुमचा कोणावर काही संशय आहे का? ‘नाही’ लग्‍नघरातील गर्दीत कोणावर संशय घ्यायचा या प्रश्‍नात वरपित्याची मान कधी नकारार्थी हलली हे त्यांना देखील कळले नाही. वरपित्याने  ‘नाही’ म्हणताच एका चाणाक्ष नातेवाईकाने त्यांना अडवित, तनया काल लगेच निघून गेल्याचे सांगतिले. प्रथम तिच्यावर कोणी संशय घेईना. पण एव्हाना ही चर्चा चव्हाण यांनी ऐकली. ते म्हणाले, कोण तनया, काय भानगड आहे? ती कोठे गेली. त्यावर वरपिता म्हणाले, नाही हो साहेब, ती फार लाघवी आणि सरळमार्गी मुलगी आहे. ती चोरी करणे शक्यच नाही. मात्र, चव्हाण यांनी हेका सोडला नाही. स्टेशन डायरीत रीतसर नोंद करून ते सार्‍यांबरोबर लग्‍न घरात आले. त्यांनी सर्व खोल्यांची तपासणी केली. तनया मुक्कामाला होती त्या खोलीत त्यांना बारकाईने पाहणी केली. ड्रेसिंग टेबलवर त्यांना एक लिफाफा सापडला. त्यावर मागील बाजूस एका तरुणाचा जवळील एका शहरातील पत्ता आणि त्याच्या फर्मचे नाव होते. या तरुणाची मात्र माहिती नसल्याचे वरपित्याने  सांगितले. 

चव्हाण यांचा संशय अधिकच बळाविला. त्या कार्डवरील क्रमांकावर दूरध्वनी न करता समक्ष तेथे जाण्यासाठी त्यांनी तातडीने गाडीचे नियोजन केले.  मनाशी काही एक अटकळ बांधून एक  महिला पोलिस त्यांनी बरोबर घेतली. 

तनयाच्या खोलीत सापडलेल्या त्या कार्डवरील पत्ता पॉश कॉलनीत एका बंगल्याचा होता. चव्हाण यांनी सहकारी पोलिसांसमवेत त्या बंगल्याच्या मुख्य दरवाजाची घंटा वाजविली. दरवाजा उघडला तो एका तरुणाने, चव्हाण यांनी  आत येता येताच आपली ओळख करून खडसावले..तनया कोठे आहे? त्या तरुणाने आतील खोलीत बोट दाखविले आणि काय प्रकार आहे हे विचारले, पण त्याला थांबवित महिला पोलिसांना चव्हाण यांनी आधी आतील खोलीत पाठविले. आतील खोलीत तनया अलगद पोलिसांच्या हाती आली. 

खरे तर ती तेथून आपल्या गावाकडे निघण्याच्याच तयारीत होती. सुरुवातीला ती काही बोलेनाच. मात्र, महिला पोलिसाने थोडा ‘प्रसाद’ देताच ती पोपटासारखी बोलू लागली. पोलिसांनी तिच्या बॅगेची तपासणी केली. त्यात लग्‍नघरातील वराचे दागिने, रोख रक्‍कम सापडलीच शिवाय आणखीन एक सोन्याचे ब्रेसलेट सापडले,  त्याबाबत  खडसावताच तिने ते आपल्या प्रियकराचे असल्याचे सांगतिले. एव्हाना तो प्रियकर आपल्या प्रेयसीने आपलेच सोन्याचे ब्रेसलेट चोरले म्हटल्यावर तिला मारण्यासाठी धावू लागला. पोलिसांनी या चोरीतील जप्त दागिने, रोख रकमेसह तनयाला अटक केली. तिला न्यायदेवतेने योग्य ती शिक्षा ठोठावली.  मात्र आपल्या ‘बंटी’ला देखील इश्काचे नाटक करत पैशासाठी झटका देणार्‍या या ‘बबली’चे कारनामे अजूनदेखील या शहरात चर्चिले जातात. 

विवेक दाभोळे,सांगली