Wed, Apr 24, 2019 21:33होमपेज › Crime Diary › मोहाचा  बळी!

मोहाचा  बळी!

Published On: Aug 29 2018 1:45AM | Last Updated: Aug 28 2018 11:27PMसांगली शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही घटना आहे. सांगली रेल्वे स्टेशन लगत असलेल्या झोपडपट्टीत गंगुबाई पाटील नावाची एक महिला आपल्या पतीसह राहत होती. पूर्वीच्या काळी अगदी लहानपणीच मुला-मुलींची लग्‍ने व्हायची, त्याप्रमाणे गंगुबाईचे लहानपणीच लग्‍न झाले होते. घरात अठराविश्‍व दारिद्य्र असताना सुखी संसाराचे स्वप्न हे तिच्यासाठी स्वप्नच होते. तरीही नवर्‍याच्या बरोबरीने काबाडकष्ट करून संसाराचा गाडा रेटत होती. पण बहुधा काळाला तिचे हे सुखही बघवले नाही आणि एका साथीच्या रोगात काळाने तिच्या नवर्‍यावरच घाला घातला. मागे-पुढे कुणाचा आधार नाही, पदरी एखादं लेकरू नाही, जवळचे कोणी नातलग नाहीत, एक भाऊ होता पण तोही तिच्यापेक्षा फाटका, कुणाकडं आधार मागायचा, गंगुबाईवर जणू आभाळ कोसळले, पण ती डगमगली नाही.

काही काम-धाम मिळवायचे असेल तर खुशाल मुंबईचा रस्ता धरायचा, असा तो काळ. गंगुबाईनेही सरळ मुंबईचा रस्ता धरला. मुंबईतील एका झोपडपट्टीत एक खोली भाड्याने घेऊन ती राहू लागली. मिळेल त्या घरची धुणी-भांडी अशी मिळेल ती कामे ती करू लागली, रात्रंदिवस राब-राब राबून पैशाला पैसा जोडू लागली. गंगुबाईचं जीवाभावाचं असं कुणीही नसताना, पोटी कुणी लेकरं-बाळं नसताना ती कशाला पैसे साठवत असावी, असा प्रश्‍न कुणालाही पडला असता, पण दैवाचे सारे भोग भोगलेल्या गंगुबाईला हे माहीत होतं की हात-पाय थकल्यावर या मिळकतीशिवाय आपणाला जगण्यासाठी दुसरा कुठलाही तरणोपायच नाही. त्यामुळेच तर ती पैशाला पैसा जोडत होती. त्या झोपडपट्टीतच एक बंगाली मिठाईवाला तरुण राहत होता, तिथे त्याचे मिठाईचे दुकान होते. गंगुबाईचा त्याच्यावर फार मोठा विश्‍वास होता आणि तोही गंगुबाईचे हाडाची काडं मोडणारं कष्ट बघत होता. त्याच्या मदतीनं गंगुबाईनं तिथल्या एका बँकेत खातं उघडलं आणि ती आपले कष्टातून मिळणारे पैसे बँकेत भरण्यासाठी त्या मिठाईवाल्याकडे द्यायची. तोही बिचारा प्रामाणिकपणे गंगुबाईच्या कष्टाची पै आणि पै तिच्या नावावर बँकेत भरायचा.

दिवसामागून दिवस, वर्षामागून वर्षे जात होती, अगदी पोरसवदा वयात पोटापाण्यासाठी मुंबईत आलेल्या गंगुबाईने आता जवळ जवळ पंचाहत्तरी गाठली होती. तिच्याने आता पूर्वीसारखे कष्ट होत नव्हते. आयुष्याची संध्याकाळ दिसू लागल्यावर 1980 साली तिने ठरवले की आता आपल्या गावाकडे म्हणजे सांगलीला परतायचे आणि आयुष्यभर मोठ्या कष्टाने मिळवलेल्या पुंजीवर राहिलेले दिवस आपल्या सांगलीच्या झोपडपट्टीतील मोडक्या-तोडक्या घरात सुखा-समाधानात घालवावेत. तो बंगाली मिठाईवालाही आता आयुष्याच्या उत्तरारार्धाकडे झुकला होता. गंगुबाईने गावाकडे जाण्याचा आपला इरादा त्याला सांगितला आणि बँकेत आपल्या नावावर जमा असलेली रक्‍कम काढून देण्याची विनंती केली. पन्‍नास-पंचावन्‍न वर्षांच्या काळात गंगुबाईच्या नावावर थोडी-थोडकी नव्हे तर तब्बल पंचवीस लाख रुपयांची रक्‍कम जमा झाली होती. एटीएम, क्रेडिट कार्ड किंवा ऑनलाईन बँकिंगचा तो जमाना नव्हता. त्याचप्रमाणे लोकांना बँकिंग व्यवहाराचीही फारशी माहिती नव्हती, या बँकेकडून चेक घेऊन गावाकडे जावे आणि तिकडे गावाकडे एखाद्या बँकेत खाते उघडून तिथे चेक जमा केले की संपले, एवढे सामान्य ज्ञानही मुळातच अक्षरशत्रू असलेल्या त्या दोघांनाही नव्हते.

गंगुबाईने सांगितल्यानुसार बंगालीबाबाने एक दिवस गंगुबाईच्या नावावर असलेली पंचवीस लाख रुपयांची सारी रक्‍कम काढून आणली आणि एका सुटकेसमध्ये भरली. मात्र, त्याला काळजी वाटत होती की एवढी मोठी रक्‍कम सोबत घेऊन गंगुबाईला या उतारवयात एकटीला पाठविणे धोक्याचे होते. काय करावे, काय करावे असा विचार करता त्याला एक कल्पना सुचली. त्याचं काय होतं की त्या दिवसात त्याचा कलकत्ता शहरात राहणारा भाचा जॉन हा त्याच्याकडे आला होता. त्याचेही कलकत्ता शहरात मिठाईचे मोठे दुकान होते, महिन्याकाठी लाखो रुपयांची उलाढाल होत होती. बंगालीबाबाने जॉनला गंगुबाईची सारी हकिकत सांगून तिला तिच्या पैशासह सुखरूप सांगलीला पोहोचविण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकली. तोही कबूल झाला. बंगालीबाबाने एक दिवस महालक्ष्मी एक्स्प्रेसने दोघांनाही सांगलीकडे रवाना केले. वर्षांनुवर्षांच्या एकमेकांच्या विश्‍वासामुळे बंगालीबाबा आणि गंगुबाईचे डोळे भरून आले. गाडी सुटल्यानंतर मात्र मुळातच लखपती असलेल्या या जॉनच्या मनात नसती अवदसा जागी झाली, त्याने गंगुबाईचे पंचवीस लाख रुपये हडपण्याचा डाव रचला.

एका स्टेशनवर गाडी काही काळासाठी उभारल्यावर जॉनने घाईगडबडीने हुबेहुब गंगुबाईच्या सुटकेससारखी एक सुटकेस विकत घेतली आणि त्यामध्ये दगड भरले आणि पुन्हा गाडीत येऊन गंगुबाईच्या नकळत ती सुटकेस एका बाजूला ठेवून दिली, थोड्याच वेळात त्याने सुटकेसची अदला-बदल केली. मुळात त्याच्याकडे कोणतीही सुटकेस नव्हती हे गंगुबाईला ठाऊक होते. सांगलीत पोहोचल्यावर जॉनने रिक्षातून तिला घरी सोडले आणि गंगुबाईने आग्रह करून सुद्धा चहाच काय पण पाणी पिण्यासही तिथे न थांबता पोबारा केला. थोड्या वेळाने आवराआवर करून गंगुबाईने सुटकेस उघडली आणि बॅगेत दगड बघून तिला धक्‍काच बसला, ती हाणून बडवून घेऊ लागली. बंगालीबाबा तर असे करणार नाही याची तिला खात्री होती. त्यामुळे आता तिला जॉन आणि त्याच्या हुबेहूब सुटकेसविषयी संशय आला. 

गंगूबाईने थेट सांगली पोलिस ठाणे गाठले आणि घडली हकिकत सांगितली. पोलिसांनाही आश्‍चर्य वाटले, कारण आजच्या तुलनेत 1980 साली पंचवीस लाखांची रक्‍कम छोटी नव्हती. त्यावेळी व्ही. पी. बुधवंत हे सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक होते. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी ताबडतोब गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आणि पोलिस उपनिरीक्षक एस. पी. कामत  यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपविला. गंगुबाईने दिलेल्या माहितीनुसार  कामत यांनी मुंबई गाठली. बंगालीबाबाला ही हकिकत समजताच त्यालाही धक्‍काच बसला. कारण गंगुबाईला सांगलीला पोहोचवायला म्हणून गेलेला त्यांचा भाचा परत मुंबईला न जाता परस्परच कुठेतरी लंपास झाला होता. त्यामुळे त्यांचाही भाच्याबाबत संशय बळावला आणि त्यांनी भाचा जॉन याच्या वर्णनासह कलकत्त्यातील त्याचा पत्ताही पोलिसांना दिला. रेल्वेने तीन दिवसांचा प्रवास करून कामत कलकत्त्यात तर पोहोचले, पण तपास कसा करायचा, कुठे सांगली आणि कुठे कलकत्ता, ना ओळख-ना पाळख, ना भाषा ओळखीची-ना माणसे माहितीची. बंगालीबाबाने दिलेल्या पत्त्यावर गुप्तरितीने शोध घेतला तर त्याचा भाचा जॉन याचा तिथेही ठिकाणा नव्हता.

पण फौजदार कामत हा महाहिकमती गडी होता. गवताच्या गंजीत हरवलेली सुई शोधून काढतील असे करामती. अनेक गुन्ह्यांचा आणि गुन्हेगारांचा त्यांनी यशस्वीपणे शोध लावला होता, त्यामुळे तर बुधवंत साहेबांनी त्यांची या किचकट गुन्ह्याच्या तपासासाठी नियुक्‍ती केली होती. त्यांनी दोन-तीन दिवस आपल्या पद्धतीने तपास करून अखेर एखदाचा जॉनचा छडा लावला. सांगलीच्या पोलिसांना समोर बघताच जॉनची पाचावर धारण बसली. त्यातच महाराष्ट्र पोलिसांच्या ‘महातिखट महाप्रसादाची’ चव त्याला चाखवताच मिठाईवाल्या जॉनची बोबडीच वळली. त्याने गंगुबाईला फसवून लंपास केलेले जवळपास निम्मे पैसे काढून दिले. कामत यांनी लागलीच त्याची गठडी वळून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून जप्त केलेले पैसे आणि जॉनला घेऊन कामत सांगलीत दाखल झाले आणि जॉनला चोरी आणि फसवणुकीच्या गुन्ह्याखाली गजाआड केले. गंगुबाईलाही तिची कष्टाची कमाई हाती लागली. अशा पद्धतीने मूळचा लखपती असलेला जॉन त्याच्या समोर असलेलं कष्टानं मिळणारं ‘मानाचं पान’ लाथाडून केवळ चोरीच्या मोहापायी तुरुंगाच्या वणव्यातील ‘उखळ’ चाटायला गेला.

सुनील कदम, कोल्हापूर