Sun, Aug 25, 2019 12:20होमपेज › Crime Diary › फाऊंटन पेनचे गुपित 

फाऊंटन पेनचे गुपित 

Published On: Nov 14 2018 1:37AM | Last Updated: Nov 14 2018 1:37AMचैत्राचं ऊन रणरणत होतं. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत घामाच्या धारा निघत होत्या. आता सूर्य मावळतीकडे कलला होता. सायंकाळ झाली तरी वार्‍याचा पत्ता नव्हता. गोठ्यात जनावरांच्या धारा काढण्यासाठी लगबग सुरू झाली होती. तात्याचा जनावरांचा गोठा गावापासून तसा दोन कोस दूर अगदी निर्जनस्थळी होता. तात्याच्या दावणीला चार म्हशी, दोन गायी, चार शेरडे होती. दिसभर जवळच्या जंगलात जनावरं हिंडवणे तात्याचे रोजचे काम. सायंकाळ व्हायला गावाकडं यायचं. ते रात्री नवच्या वक्‍ताला पुन्हा गोठ्यावर वस्तीला. निधड्या छातीचा तात्या एकटाच वस्तीवर राहायचा. सोबत केवळ मोत्या कुत्रा अन् हातात धारदार फरशी. तिन्हीसांज होऊ लागली तसं तात्यांच्या दोघा सुनांनी धारा आवरल्या. एकीनं डोक्यावर दुधाची घागर तर एकीनं जळणाचा बिंडा डोक्यावर घेऊन दोघी गावाकडे चालू लागल्या. तात्यानं बाहेरची शेरडं खोपीत बांधली. खोपीत बारीक करून कंदील लावला. खोपीचं कवाडं लावलं अन् तात्याही गावाकडं निघाला. जेवून माघारी येऊन तात्यानं वळकट टाकली. दिवसभर ढोरांच्या मागं फिरून दमलेला तात्या गाढ झोपी गेला. एक प्रहर संपला तसा पाय दुमडून खोपी बाहेर झोपलेला मोत्या जंगलाकडे तोंड करून जोरात भुंकू लागला. तसा तात्यानं कंदिलाचा उजेड मोठा केला. हातात फरशी घेतली अन् खोपीचं कवाडं उघडलं. तात्या बाहेर येताच विहिरीकडल्या बांधाकडं मोत्या धावू लागला; पण काळाकुट्ट अंधार अन् जंगली धाडी यामुळे तात्याला काहीच दिसल नाही, ‘असंल एखादं जंगली जनावर’ म्हणून तात्यानं खोपीत येऊन पुन्हा अंग टाकलं.

रात्री झोपमोड झाल्यानं तात्याला गाठ झोप लागली होती. उजाडल्यावर सुनांनी हाका मारल्यावर तात्या उठला. ‘आयला, लई टाईम झाला वाटतं. काय वाजलं’ डोळे चोळत तात्या बोलू लागला. तसं बादलीतले पाणी घेऊन तात्यानं तोंड खगाळलं. घरातनं आणलेला चहा गरम करून तात्यानं संपवला. कोपर्‍यातला तांब्या हातात घेऊन तात्या जंगलाच्या दिशेला वळला.

जंगलातील पाण्याचा निचरा होऊन ते गावतळ्याकडं यावं म्हणून चर मारली होती. तिथं तात्या बसला. हलकीशी चिलीम तात्यानं पेटविली. एक झुरका मारून दुसरा झुरका मारला अन् सहज त्याची नजर चरीच्या पुढच्या बाजूला गेली. नि तात्या घाबरला. एरव्ही निधड्या छातीचा तात्या! तांब्या रिकामा करून पुढं गेला. कुणा एका तरुणाचा मृतदेह पालथा पडला होता. तात्यानं चेहरा पारखून पाहिला. चेहरा अनोळखी वाटत होता.

तसा तात्या खोपीकडं वळला. सुनांनी धारा संपविल्या होत्या. बडमीची वैरण घालून सुनांनी जनावरं बाहेर बांधली. शेण काढून उकिरड्यावर टाकलं. तसा तात्या घाबर्‍या आवाजातच ‘सुनंदे, मालकाला लवकर लावून दे, त्येला म्हणावं डोंगराच्या घळीत कोणतरी मरून पडलंय.  संग पोलिस पाटलाला घेऊन यायला सांग, निघ बिगीनं.’ तशी सुनंदा घाबरली. तिला प्रेत पाहण्याचा मोह झाला; मात्र तात्या खेकसल्यानं  ती गावाकडं फिरली.

सुनंदा गावात आली. जातानाच तिनं दूध डेअरीत घातलं. तरातरा पावलं उचलत ती घरात आली. तात्याचा धाकटा मुलगा बाजीराव अजून दात घासत होता. सुनंदाचं बोलणं ऐकताच तो दचकला. गडबडीनं चहा घेऊन त्यानं पाटलाचं घर गाठलं. घटना समजताच पाटलांनी गाडीबाहेर काढून त्यावर टांग टाकली.

जंगलाच्या चरीत तरुणाचा मृतदेह पडला होता. प्रेत ओळखीचे नव्हते. शिवाय गावातीलही नव्हते. त्यामुळे त्यांनी लागलीच पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच फौजदार पद्मजा पाटील घटनास्थळी दाखल झाल्या. घटना घडलेले ठिकाण डोंगराळ-जंगलात होते. चरीमध्ये काही सापडते का, हे पोलिस तपास करत होते. जवळपास काहीच पोलिसांना आढळून आले नाही. मात्र, खिशाला एक फाऊंटन पेन तेवढा अडकवलेला दिसत होता. पोलिसांनी तो पेन जप्‍त केला. महाग, भारी किमतीचा तो पेन होता. त्यामुळे पेन वापरणारी व्यक्‍ती खास असावी असा अंदाज फौजदार पद्मजा पाटील यांनी बांधला. चरीमध्ये बारकाईने पोलिसांनी पाहणी केली. खून केल्यानंतर ओळख पटू नये याची आरोपींनी काळजी घेतल्याचे दिसत होते.

मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पीएमसाठी पाठविण्यात आला. जवळपासच्या गावातून कोण बेपत्ता आहे का? याचा तपास पोलिसांनी सुरू केला. जवळच्या पाच ते दहा गावांमध्ये कोणीच बेपत्ता नसल्याचे आढळून आले. जवळचा कोणत्याही पोलिस स्टेशनला बेपत्ता नोंद झालेली नव्हती. दोन दिवस तपास करूनही पोलिसांना ओळख पटली नाही. खबर्‍यानाही खबर लागली नाही. चौथ्या दिवशी मात्र एका शाळेचे एक मुख्याध्यापक पोलिस ठाण्यात आले.  गुरुजी घाबरतच खुर्चीत बसले. ‘बोला’ म्हणताच गुरुजी चाचरतच बोलले.

‘ मॅडम, गेले चार दिवस आमच्या शाळेतील विज्ञान शिक्षक बेपत्ता आहेत, तवा म्हटलं तुम्हाला माहिती द्यावी’ त्याबरोबर फौजदार पद्मजा सावध झाल्या. त्यांनी हावलदार ठोंबरेंना मयताचे फोटो गुरुजींना दाखविण्यास सांगितले. फोटो बघताच गुरुजी बोलले. ‘मॅडम, हे आमचे विज्ञान शिक्षक एस. एच. सनगर आहेत. हे असे कसे झाले.’ म्हणून गुरुजींनी कपाळाचा घाम पुसला.

मयताची ओळख पटताच तपासाची चक्रे वेगाने फिरली. शाळेत जाऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली. गेली सात वर्षे गुरुजी शिक्षक म्हणून शाळेत कार्यरत होते. शिकवण्यात गुरुजी अतिशय हुशार होते. अशी माहिती पोलिसांना मिळाली. मग अशा शिक्षकाचा खून कोणी अन् का करावा असा प्रश्‍न होता.

मयताच्या गावी जाऊन पोलिसांनी चौकशी केली. गुरुजी महिन्यातून एकदाच गावी जात होते. ते खानावळीत जेवत होते. घरी बायको, दोन मुले होती. आई, वडील वृद्ध होते. अगदी सुस्थितीत कुटुंब होते. 
पोलिसांनी पुन्हा शाळेत चौकशी सुरू केली. गुरुजी कुणा बरोबर फिरतात हेही तपासले. चार दिवस होऊनही तपासाचा केंद्रबिंदू सापडत नव्हता. गुरुजींच्या मृतदेहाजवळ सापडेला फाऊंटन पेन पद्मजा मॅडम वारंवार पाहत होत्या. वर्गातील सर्व मुलांना दाखवूनही पेन गुरुजींचा नव्हता, हे सिद्ध झाले. त्यामुळे हा पेन कोणाचा हे कोडे होते. गावात खबर्‍यामार्फत असला पेन कोण वापरते हे पोलिस तपासत होते. हे तपासत असताना दहावीच्या वर्गातील एका विद्यार्थ्याने हा पेन ओळखला. ‘मॅडम, हा पेन आमच्या गल्‍लीतले रावसाहेब काका वापरतात’, असे सांगताच पोलिस सावध झाले.

रावसाहेब चौगुलेच्यावर पाळत ठेवली गेली. ते महसूल खात्यामध्ये कामाला होते. पोलिसांना चार-पाच दिवसांत चौगुलेकडून कोणताच क्ल्यू मिळाला नाही. हावलदार टोणके त्यांच्या टेबलाजवळ गेले. ‘साहेब, या कागदावर सही हवी आहे.’ असे म्हणताच रावसाहेब चौगुलेने एक साधा पेन हातात घेतला. पण सही करताना ‘आयला, माझा फाऊंटन पेनच लय भारी.’ म्हणत सही करू लागला. त्याचवेळी हावलदार ठोंबरेंनी त्यांची कॉलर पकडली, ‘साहेब, हा बघा तुमचा फाऊंटन पेन; तुमचाच ना. आमच्याकडे आहे. चला. सोबत’ असे म्हणत त्याला ठाण्यात ओढत घेऊन आले. चार तास पाहुणचार दिला अन् मग ‘मॅडम, मास्तराला मीच मारलंय’ असे तो म्हणू लागला.

‘मास्तर, आमच्या गावात सात वर्षांपासून नोकरी करत होता. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून त्याचे आमच्या घरी येणे जाणे वाढले होते. माझ्या बायकोशी त्याची जवळीक वाढली होती. मी कामावर गेलो की दुपारच्या सुट्टीत यांचे खेळ चालायचे.सुरुवातीला मला नुसती शंका होती; पण एके दिवशी मी दोघांना रंगेहात पकडले. मी मास्तरला सोडून दिला. पण माझ्या मनात प्रचंड राग होता.’
‘त्या दिवशी मी मास्तरला सोबत घेऊन दारू पिण्यासाठी बाहेर पडलो. नाही-होय म्हणत मास्तरला भरपूर दारू पाजली. अन् चाकूने वार करून केला खातमा. आणि जंगलात नेऊन टाकला. जनावरं खाऊ देत म्हणून...’ रावसाहेबाच्या चेहर्‍यावर पश्‍चातापाचा लवलेशही नव्हता. रावसाहेब आता जेलची हवा खात आहे.
 

- डी. एच. पाटील, म्हाकवे (कोल्हापूर)