Sun, Dec 15, 2019 04:49होमपेज › Crime Diary › फिरस्ती

फिरस्ती

Published On: Jun 26 2019 1:41AM | Last Updated: Jun 25 2019 8:43PM
डी. एच. पाटील, म्हाकवे

गेले दोन दिवस पाऊस जोरात पडत होता. दोन दिवस सूर्य  बेपत्ताच होता. नदीला महापूर आल्यामुळे  अनेक गावांचे रस्ते बंद झाले होते. पाऊस घरातून बाहेर पडू देत नव्हता. गावाशेजारचा वाघजाई डोंगराकडील तलाव पूर्ण भरून पाणी मुसीतून बाहेर पडले होते. साहजिकच ओढ्याचे पाणीसुद्धा आता धोक्याच्या पातळीवर होते. गावापासून तलाव पाच किलोमीटर अंतरावर होता. गुराखीच जनावरे घेऊन तिकडे जात होते. बाकी फारशी वर्दळ या तलावाकडे नव्हतीच. 

तलाव भरून मूस बाहेर पडली की, तलावातील मोठे मासे अथवा नदीतील मोठे मासे प्रवाहाच्या उलट जाऊन पाण्यात मिसळतात. त्यामुळे जुन्या मच्छरदाणीचा वापर यावेळी मासे धरण्यासाठी केला जातो. तलावातील मूस कालच बाहेर पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नदीचे मासे वरती चढून आले होते. रामू आज लवकरच भर पावसात जुनी मच्छरदाणी घेऊन निघाला होता. काखेत पिशवी व हातात मच्छरदाणी घेऊन तो मुशीजवळ पोहोचला. मुशीतून मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडत होते. त्याने मच्छरदाणी पसरली. पाण्यात उतरला.  पाण्याच दाब जोरात होता.  पाच मिनिटात सहा-सात पानगे मासे त्याला मच्छरदाणीत सापडले. अर्ध्या-एक तासात मााश्यांनी त्याची पिशवी भरली. मात्र तरीही रामूची हाव कमी होईना. तो तलावाच्या पाठीमागील डोंगराकडील बाजूस चालला. थोडेसे चालला तसा  पावसाचा जोर पुन्हा वाढला. तरीही तो पिशवी सावरत डोंगराकडे निघाला. डोंगराहून येणार्‍या मोठ्या वताडाला मासे मिळतील ही अपेक्षा. तो वताडाजवळ आला. पाऊस अधिक असल्याने वताड धडाधड कोसळत होते. त्याने वताडाजवळ पाहिले; पण अधिक मासे दिसलेच नाहीत. त्यामुळे ‘आयला, माप झालं’ असे म्हणत त्याने मच्छरदाणी काढण्याचा प्रयत्न सुरू केला. तेवढ्यात वताडाच्या पाण्यात त्याला काहीतरी तरंगताना दिसले. तो पुढे झाला. एका बाईचा मृतदेह तरंगत होता. तो  पाहताच रामू घाबरला. जवळपास चिटपाखरूही नव्हते. कुणाला बोलवावे? त्याला प्रश्‍न पडला. त्याने काखेला पिशवी अडकली अन् तरातरा गावात आला. पोलिस पाटलांना भीतभीतच माहिती दिली. त्याबरोबर  पोलिस पाटीलही बावरले. खात्री करून घेण्यासाठी ते डोंगर पायथ्याला पोहचले. खरंच, एका तरुण बाईचा मृतदेह पडला होता. पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत आल्याने चेहर्‍याचा चेंदामेंदा झाला होता.  पाटलांनी पोलिसांना कळविले.

घटनेची माहिती मिळताच फौजदासर शेरखान घटनास्थळी पोहचले. जोरदार पाऊस पडत होता. त्या पावसातही  पोलिस पंचनामा करत होते. झिम्माड पावसाने गारठून गेलेले गाव घटनेने जागे झाले. जो कळेल तो डोंगर पायथा गाठत होता. झिम्माड पाऊस अंगात ईर आल्यागत सुरूच होता. 

पंचनामा करून पोलिसांनी घटनास्थळी काही सापडते का  याची तपासणी सुरू केली. बराच वेळ शोध घेऊन पोलिसांना घटनास्थळी काहीच सापडत नव्हते. पण असलेला पुरावा  पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला असावा असे समजून  पोलिसांनी शोधमोहीम थांबवली. मृत महिलेची ओळख पटत नव्हती. ती त्या गावातील महिला नव्हती. 

पोलिसांनी डोंगरावरती असणार्‍या वाड्यावरील ही महिला असावी या आशेने वाड्यांवरती चौकशी सुरू केली. चौकशीत पावसाचा अडथळा येत होता. अखंड डोंगरावर सात वाड्या होत्या. चार वाड्यावर पोलिस पोहचले. मात्र तिथेही काहीच माहिती मिळाली नाही. कामतवाडीत  पोलिस पोहोचले. डोंगरावर वार्‍याचा जोर अन् पाऊस वेगातच होता.  पोलिस दीडशे लोकवस्तीच्या त्या वाडीत पोहचले. तिथे मंगला नावाची तरुण महिला  बेपत्ता असल्याची माहिती मिळाली.  पोलिसांनी तिथे  चौकशी केल्यानंतर तीन दिवसांपासून ती बेपत्ता होती असे समजले. पोलिसांनी तिच्या नवर्‍याला ताब्यात घेतले. मृतदेह ओळखू येत नव्हता, मात्र महिलेच्या अंगावरील कपडे मंगलाचेच होते. 
वैद्यकीय अहवालानुसार मृत तरुणीचा गळा दाबून खून करण्यात आला होता. त्यामुळे तिच्या नवर्‍याला पोलिसांनी चांगलाच झोपडला. मात्र ‘मी माझ्या बायकोला का मारू?’ असेच तो म्हणत होता. गावात चौकशी केली. मात्र मंगला व तिच्या नवर्‍याचे कधीच भांडण नव्हते,  असे दिसून आले. त्याचा सहभाग दिसून येत नसल्याने पोलिसांनी त्याला सोडून दिले. 

गावात चौकशी केल्यानंतर सात वाड्यांमध्ये एक वेडी फिरस्ती बाई फिरत होती. बरीच वर्षे या गावातून ती भटकायची. मात्र मंगलाचा खून झाल्यापासून ती सात वाड्यांमध्ये आढळून आली नव्हती. त्यामुळे फौजदार शेरखान यांना या दोन्ही घटनेत काहीतरी साम्य असावे असे वाटत होते. कदाचित त्या फिरस्तीनेच मंगलाचा खून केला असावा व ती बेपत्ता झाली असावी. हा संशय धरून  पोलिसांनी तपास सुरू केला. या वाड्यांमध्ये वारंवार चौकशी करूनही फिरस्तीचा पत्ता लागत नव्हता. गावातून या दोघी कुठे गायब झाल्या किंवा जाताना यांना कोणी पाहिले हे समजत नव्हते. मात्र दोघींचा या घटनेशी काहीतरी संबंध होता हे शेरखान यांनी जाणले होते. 

दोन महिने उलटले. पाऊस आता कमी झाला होता. अधूनमधून श्रावणसरी कोसळत होत्या. श्रावणातल्या एका सोमवारी एका वाडीवर मोठी जत्रा भरते. जिल्ह्यातील लोक या यात्रेला हजेरी लावतात. पोलिसांनीसुद्धा या यात्रेत साध्या वेशात हजेरी लावली होती. बारकाईने पोलिस काही धागा मिळतो का ते पाहत होते. या यात्रेत एका खबर्‍याने एका वाडीतील एका इसमाच्या हालचाली संशयास्पद असल्याची खबर दिली. तो जिल्ह्याच्या ठिकाणी हमाली करायचा. दररोज तो गावी यायचा मात्र गेल्या दोन महिन्यांपासून तो आठवड्यातून एकदाच घरी गावाकडे येतोय.

खबर मिळताच हा जिथे हमाली करायचा तिथे पाळत ठेवली. त्याच्यासोबत असणार्‍या हमालांना पोलिसांनी गाठले अन् घटना ऐकून पोलिसही चक्रावले. सुबोध हमालाने दुसरे लग्न केले होते. पहिली बायको गावाकडे अन् दुसरी त्याच्यासोबत खोलीवर होती.  पोलिसांनी मंगलाच्या नवर्‍याला बोलावून घेतले. मंगलाचा नवरा, एक हमाल व पोलिस यांनी सुबोधच्या खोलीवर पाळत ठेवली. दोन तास काहीच झाले नाही. तेवढ्यात नळाला पाणी आले अन् सुबोधच्या खोलीतून नववधू पाणी भरण्यासाठी घागर घेऊन बाहेर पडली. तसा तिघांनाही शॉक बसला. ती मंगला होती. 

मंगला तर इथे आहे. मग आपण क्रियाकर्म केले ती कोण? पोलिसांनी अलगद मंगलाला ताब्यात घेतले. तिची वरात  पोलिस स्टेशनला आणली. तशी ती घाबरली. ‘साहेब, मी कायच केलं नाही, सगळं सुबोधनंच केलंय’ असे ती म्हणू लागली. 
पोलिसांनी सुबोधला ताब्यात घेतले. चांगला मार दिला. तसा तो पोपटागत बोलू लागला, ‘साहेब, मंगला जिवंत आहे, मात्र तिचा खून तिच्या नवर्‍यानं केला अन् तो अडकावा म्हणून हे सगळं नाटक केलं.’ 
‘असं, मग ती मेलेली कोण?’ 

‘माझं व मंगलाचं सूत जमलं. आम्ही  प्रेमात पडलो. आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र तिचा नवरा अडथळा ठरत होता. एके दिवशी एक खुळी आमच्या दारातून जात होती. त्याचवेळी माझ्या डोक्यात कल्पना आली. मी ती मंगलाला सांगितली. एके दिवशी मोठा पाऊस सुरू होता. डोंगरावर अतिपाऊस पडत असल्यानं कोणी बाहेर पडत नाही ही संधी साधून देवळात झोपलेल्या वेड्या फिरस्तीबाईचा मी गळा दाबला. मंगलाची कपडे तिला घातली. त्या पावसात वताडात तिला टाकून दिली. तीन दिवस सलग पाऊस झाल्यानं ती वाहत  पायथ्याच्या तलावात जाऊन पडणार अन् खुळीच्या मृत्यूला कोण विचारणार? शिवाय मंगलाच्या खुनाखाली तिचा नवरा आत अन् आम्ही दोघे बाहेर असा बेत आखला होता. पण साहेब बेत फसला हो.’

‘बेत चांगलाच होता; मात्र एका निष्पाप जीवाचा बळी तू आपल्या वासनेसाठी दिलास. ती वासना आता तुला नरकयातना देणार. नियतीच्या फेर्‍यात तू फसलास. चल तुरूंगात.’म्हणत पोलिस त्यांना घेऊन गेले. 
सध्या मंगला आणि तो जेलची हवा खात आहेत.