मल्लिका-ए- मौत!

Last Updated: Mar 11 2020 1:05AM
Responsive image

सुनील कदम, कोल्हापूर


मनुष्याने आपल्या वाट्याला आलेल्या प्राप्त परिस्थितीत सुख मानून ‘ठेविले अनंते तैसेची राहावे’, असे साधूसंतांनी सांगून ठेवले आहे. पण काही जण आपल्या महत्त्वाकांक्षेपोटी आपलं प्रारब्धच बदलायचा प्रयत्न करतात आणि स्वत:च स्वत:च्या जीवनाचा सारीपाट उधळून टाकतात. अतिलालसेमुळे ‘मौत की सौदागर’ बनलेल्या एका मल्लिकाची ही कर्मकहाणी...

तिचं नाव केमपम्मा...कर्नाटकातील बेंगलोर शहरानजीकच्या एका खेडेगावात एका गरीब कुटुंबात तिचा जन्म झाला होता. कालांतराने केमपम्माचा विवाह देवराम नावाच्या एका इसमाशी झाला. देवराम हा शिंपी होता आणि त्याची मिळकतही त्या मानानेच होती. त्याच्या मिळकतीतून कशीबशी कुटुंबाची गुजराण चालायची. पण केमपम्मा आपल्या या मोडक्यातोडक्या संसारात सुखी नव्हती, तिची स्वप्ने भव्यदिव्य होती, आलिशान बंगला, मोटारगाड्या, भरपूर दागदागिने आणि प्रचंड पैसा आपल्याजवळ हवा असा केमपम्माचा ध्यास होता. 

आपला हा ध्यास पुरा करण्यासाठी सुरुवातीला केमपम्माने सरळमार्गीच प्रयत्न सुरू केले होते. चार घरची कामे करून ती पैशाला पैसा जोडू लागली होती; पण अशा प्रकारे पै-पै गोळा करून किमान या जन्मात तरी आपली स्वप्ने पूर्ण होणार नाहीत याची केमपम्माला खात्री वाटू लागली. त्यामुळे तिने झटपट पैसा मिळवण्यासाठी शॉर्टकट शोधायला सुरुवात केली.

सुरुवातीला केमपम्माने एक चिटफंड कंपनी सुरू केली आणि लोकांनी या कंपनीत पैसे गुंतवायला सुरुवात केली. केमपम्मावरील विश्वासापोटी आजुबाजूच्या गावातील हजारो लोकांनी लाखो रुपये केमपम्माच्या चिटफंड कंपनीत गुंतविले. एवढे पैसे बघून केमपम्माच्या तोंडाला पाणी सुटले आणि तिने तो सगळाच पैसा हडप करून टाकला. केमपम्मावर गुंतवणूकदारांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आणि या भानगडीत तिला एक वर्षाची शिक्षा झाली. ही शिक्षा भोगून 1998 साली केमपम्मा बाहेर आली; पण तिच्या नवर्‍याने आणि तिच्या कुटुंबीयांनी तिला घरात घ्यायला नकार दिला. 

झाले..केमपम्माचे घरदार सुटले आणि ती रस्त्यावर आली. यानंतर तिने एका दागिन्याच्या दुकानात काम मिळविले. तिथे दागिने खरेदीसाठी येणार्‍या बायका आणि त्यांच्या अंगावरील दागिने बघून केमपम्माची महत्त्वाकांक्षा पुन्हा उफाळून आली. याच काळात तिला दागिने तयार करण्याची पद्धत, त्यासाठी वापरली जाणारी रसायने यासह सायनाईड या अतिजहाल विषाचीही माहिती मिळाली आणि केमपम्माच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

केमपम्मा दररोज सकाळी बेंगलोरमधल्या वेगवेगळ्या मंदिरांत जायची, अशीच एका देवळात तिची आणि ममता नावाच्या एका महिलेशी ओळख झाली. ममता ही अतिश्रीमंत घराण्यातील होती; पण तिला मूलबाळ नव्हते. अपत्य प्राप्तीसाठी ममता दररोज एका देवळात जाऊन नवस-सायास करीत होती. केमपम्माने हेरले की हेच आपले पहिले गिर्‍हाईक. केमपम्माने ममताला सांगितले की, माझ्याकडे अपत्यप्राप्तीचा एक हमखास पूजाविधी आहे; पण हा पूजाविधी अत्यंत गुप्त पद्धतीने करावा लागतो. 

केमपम्मावर विश्वास ठेवून ममता या पूजाविधीला तयार झाली. या पूजाविधीसाठी केमपम्माने ममताला तिच्याकडे असलेले सगळे दागिने आणि भरपूर पैसे घेऊन येण्यास सांगितले होते. ठरल्याप्रमाणे ममता आल्यानंतर केमपम्माने तिला एका सुनसान ठिकाणी नेले आणि पूजाविधीच्या नावाखाली तिला सायनाईडची गोळी खायला दिली. या गोळीमुळे काही क्षणातच ममता मृत्युमुखी पडली आणि तिचे सगळे दागिने आणि पैसे घेऊन केमपम्माने पोबारा केला. ममताच्या या पूजाविधीची तिच्या घरच्यांना काहीही कल्पना नसल्यामुळे तिच्या खुनाचा कुणाला थांगपत्ताही लागला नाही.

ममताकडून लुटलेले दागिने आणि पैशातून केमपम्माने जवळपास दोन वर्षे चैनीत काढली आणि पैसे संपल्यानंतर पुन्हा आपल्या मूळ धंद्याकडे वळली. 2001 साली केमपम्माने बेंगलोरमधील अशाच एका कुटुंबाला पूजाविधी करायला राजी केले. हा पूजाविधी चालू असताना तिने त्या घरातील लोकांना सायनाईड मिश्रीत प्रसाद खायला दिला. पण हा प्रसाद खाताच काहीजणांना उलट्या होऊ लागल्याने त्या घरातील लोकांना केमपम्माचा संशय आल्याने त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिस येईपर्यंत केमपम्मा त्या घरातील दागदागिने लुटून पळ काढत असतानाच रंगेहाथ पोलिसांच्या तावडीत सापडली आणि या गुन्ह्यात तिला सहा वर्षांची शिक्षा झाली.

माणूस कारागृहाची हवा खावून आल्यानंतर त्याच्या मनातील गुन्हेगारीची भावना काही प्रमाणात कमी होते, असा सर्वसाधारण अनुभव आहे. केमपम्माच्या बाबतीत मात्र उलटेच झाले. 2007 साली दुसर्‍यांदा करागृहातून सुटून आल्यावर केमपम्माची महत्त्वाकांक्षा आणखी वाढली होती, आता तिला लवकरात लवकर श्रीमंत होण्याची जणूकाही घाईच झाली होती. शिवाय तिने आठ वर्षांपूर्वी केलेल्या ममताच्या खुनाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले नव्हते. त्यामुळे तिचा आत्मविश्वास आणखीनच वाढला होता. 

मंदिरात येणार्‍या श्रीमंत महिलांना हेरायचे, खुबीने त्यांच्या मनातील दुखर्‍या नसा जाणून घ्यायच्या आणि त्यांना एखाद्या निर्जन ठिकाणी करावयाच्या खोट्या पूजाविधीसाठी राजी करायचे, पूजाविधी सुरू झाला की प्रसादाच्या नावाखाली त्या महिलेला सायनाईड देऊन मारायचे आणि तिच्याकडील दागदागिने आणि पैसे घेऊन पोबारा करायचा, असा केमपम्माचा नित्यक्रमच सुरू झाला. 2007 साली ऑक्टोबर ते डिसेंबर या दोनच महिन्यांच्या कालावधीत केमपम्माने एक-दोन नव्हे तर तब्बल सहा महिलांना अशा पद्धतीने ठार करून त्यांच्याकडील दागदागिने आणि पैसे लुबाडले होते.

केवळ दोनच महिन्यांच्या कालावधीत बेंगलोर शहरातील वेगवेगळ्या निर्जन भागात एकाच पद्धतीने सहा महिलांचे खून झाल्यामुळे बेंगलोर पोलिसही चक्रावून गेले होते. राज्यभरातून पोलिसांवर टीकेचा भडिमार चालू झाला होता. खुन्याच्या तपासासाठी पोलिसांनी आपली सगळी ताकद पणाला लावली होती आणि परिसरात शेकडो खबरी तैनात केले होते. अखेर एका मंदिराच्या परिसरात अन्य एका महिलेला फसविण्याच्या तयारीत असलेल्या केमपम्माला पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले. तिच्या जवळच्या साहित्याची झडती घेतली असता खून झालेल्या महिलांचे लाखो रुपयांचे दागिने आणि लाखो रुपयांची रोख रक्कम केमपम्माकडे मिळून आली. 

आपल्या पापाचा घडा भरला आहे हे लक्षात येताच केमपम्माने बर्‍या बोलाने आपली सगळी कर्मकहाणी पोलिसांना सांगून टाकली. सात महिलांच्या खूनप्रकरणी केमपम्माला जन्मठेपेची शिक्षा झाली असून सध्या ती कारागृहात आपल्या केलेल्या कर्माची फळे भोगत बसली आहे. केमपम्मा भारतातील पहिली महिला सिरीयल किलर असून गुन्हेगारी जगतात ती ‘सायनाईड मल्लिका’ या नावाने ओळखली जाते.

शिराळा : ८१ वर्षाच्या वृद्धाला कोरोना; मणदूर गावात शुकशुकाट


'तो' कोरोना रुग्ण गेला कुणीकडे? केईएम प्रशासनाचा निष्काळजीपणा सुरुच!


'कोरोना अदृष्य पण, त्याचा सामना अपराजित कोरोना वॉरियर्सशी'


तुम्ही एकटे नाही! अमेरिकेतील आंदोलनाला गुगलचा खंबीर पाठिंबा


नागपूरातील कोरोना कंट्रोलचा मुंडे पॅटर्न; अर्ली ट्रेसिंग, मास क्वारंटाईन, टीम मॅनेजमेंट


तब्बल ८ पावसाळी नक्षत्रांची सुरुवात रविवारीच! 


संगीतकार वाजिद यांच्याबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का?


सातारजवळ एकाचा डोक्यात दगड घालून खून


पाससाठी तब्बल २३ वेळा अर्ज करणारा बहाद्दर सापडला जाळ्यात!


पुण्यात बाधितांची वाटचाल आठ हजारांकडे