मंत्री, खासदार यांची लूट, सामान्यांचे काय?

Published On: Oct 02 2019 1:03AM | Last Updated: Oct 02 2019 1:03AM
Responsive image

 अपर्णा देवकर


गेल्या 24 जून रोजी महाराष्ट्रातील मलकापूर आणि कल्याण स्टेशन या दोन ठिकाणी अज्ञात व्यक्‍तींनी वेगवेगळ्या गाडीतील दोन आमदारांना लुटल्याची घटना घडली. रेल्वेतून प्रवास करणारे काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे आणि शिवसेनेचे आमदार संजयराय मुळकर यांच्या कुटुंबीयांना अज्ञात व्यक्‍तींनी मुंबईला जाताना लुटले. त्याच दिवशी नवी दिल्लीतील अतिसुरक्षित असणार्‍या  लुटियन्स क्षेत्रातील मंडी हाऊसजवळ विधानसभाचे विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता यांची पत्नी शोभा यांचे कारमध्ये ठेवलेले सामान अज्ञात आरोपींनी लुटले. 

18 ऑगस्टच्या रात्री सव्वा आठ वाजता मंडी हाऊसच्याच जवळ फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या कार्यालयाबाहेर दोन मोटारसायकलस्वारांनी भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या पत्नी अपर्णा मेहता यांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेत पळ काढला. 

गेल्या आठवड्यात 22 सप्टेंबरला राजधानी दिल्लीमध्ये तर दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र जैन यांचे उत्तर-पश्‍चिम दिल्ली भागातील सरस्वती विहार येथील निवासस्थान लुटारूंनी लुटले आहे. यासंदर्भात त्यांनी रविवारी रात्री 10 वाजता एक ट्वीट केले आहे. त्यात सत्येंद्र जैन यांनी लिहिले आहे की, माझ्या सरस्वती विहार येथील बंगल्यात चोरी झाली आहे. अनेक तास चोरांचा माग काढण्यासाठी चोरांच्या जागा पोलिसांनी पिंजून काढल्या. समाजविरोधी घटकांना आणि चोरांना आता दिल्ली पोलिसांची भीती राहिलेली नाही. फक्‍त ट्वीट न करता सत्येंद्र जैन यांनी आपल्या घरातील अस्ताव्यस्त झालेल्या खोल्या, वस्तू यांचे फोटोही इंटरनेटवर टाकले आहेत. त्यांच्या पत्नी पूनमने नोंदवलेल्या तक्रारीनुसार हा बंगला बंद पडलेला होता आणि शेजार्‍यांनी बंगल्याचा मुख्य दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली होती. 

सर्वच सरकारे स्वतःच्या सरकारची आणि कायदा सुव्यवस्थेची प्रशंसा, कौतुक करत असतात. मात्र वरील घटनांमधून हे स्पष्ट होते की, समाजविरोधी घटकांची हिंमत इतकी वाढली आहे की, ते सामान्य माणसांना सोडत नाहीतच पण आता मंत्री, खासदार यांनाही लुटत आहेत. थोडक्यात सरकारने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वेळीच योग्य ती पावले उचलण्याची गरज आहे. कारण अशा प्रकारे लुटारूंची वाढती हिंमत पोलिसांना आव्हान देणारी आहेच; पण सामान्यांना मात्र भीतीच्या छायेखाली वावरायला भाग पाडणारी आहे.