छोटे मासे मोठे मासे 

Last Updated: Dec 18 2019 1:16AM
Responsive image


ज्ञानेश्वर म. कुलकर्णी, कोल्हापूर

कोल्हापूर-मुबंई तसेच पुणे-मुंबई या महामार्गावर चोरीच्या घटना वाढू लागल्या होत्या. आतापर्यंत खासगी ट्रॅव्हल गाड्यांमधून चोर्‍या होत होत्या. आता एस. टी. बसगाड्या रेल्वेमधूनसुद्धा चोर्‍यांचे प्रमाण वाढू लागले होते. खासगी स्वतःची गाडी घेऊन जाणार्‍यांनासुद्धा लुटल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या.

आता पोलिस सतर्क झाले होते. त्यांनी गुप्त पहारा ठेवला होता. जाळे टाकले होते. त्या जाळ्यात काही चोरटे बरोबर सापडले होते. रेल्वे पोलिसांनी चोरांच्या टोळ्यांना पकडले होते. या घडामोडीमुळे आता चोरटे घाबरून पळाले होते.
आता पोलिस स्टेशनमध्ये येताच इन्स्पेक्टर राणे सब-इन्स्पेक्टर चौगुलेंना म्हणाले, 
“उशिरा उठलो. रात्री जागरण झाले होते. काय बातमी आहे?” 
“शामलाल शेटजींनी रात्रभर धारेवर धरलं. सकाळी पेपरवाल्यांनी आमचा पंचनामा केला.”
“झालंय काय साहेब.”
“ चौगुले, शेटजींचे दहा लाख रुपये ट्रॅव्हलर बसमधून चोरीला गेले आहेत. पेपरमधील हेडलाईन वाचा.” पेपर वाचल्यावर चौगले म्हणाले, 
“याचा अर्थ पुन्हा चोरटे सक्रिय झाले आहेत.” 
“म्हणून पेपरवाल्यांनी हेडिंग दिलंय, ‘चोरटे सक्रिय, पोलिस निष्क्रीय’ चौगुले, आपणा दोघांवर या तपासाची कामगिरी आहे. चला, लागा कामाला.” 
पोलिस कामाला लागले होते. पण चोरट्यांनी नवीन नवीन युक्त्या वापरायला सुरुवात केली होती. आता सोनसाखळी चोरीचे प्रकार वाढू लागले होते. रात्रीच्या वेळी आडमार्गाला दुकाने, घरे लुटली जात होती. घरफोड्या वाढत चालला होत्या आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन दुचाकीस्वारांना लुटले जात होते. 

आता पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचले होते. खबर्‍यांंकडून माहिती मिळताच तत्काळ कार्यवाही होत होती. काही सापळ्यात चोर सापडत होते. एका ठिकाणी घरफोडीच्या तयारीत असणार्‍यांना पोलिसांनी पकडले. हत्यारासह सहा गुंड सापडले होते.
“पाहा, राणे साहेब, सहा गुंड जाळ्यात सापडले.”
हसून इन्स्पेक्टर राणे म्हणाले,
“स्वतःची पाठ स्वतःच थोपटून नका घेऊ, चौगुले.”
“हे काम मोठं नाही? हे गुंड महत्त्वाचे नाहीत?”
“अहो, तुम्ही छोटे मासे पकडलेत. मोठे तुमचे जाळे तोडून पसार झालेत.”
“याचा अर्थ काय साहेब? ” 
“शामलालचे दहा लाख रुपये चोरीला गेले. त्याचा शोध कधी लागणार? आपली ती कामगिरी आहे.” 
“साहेब, ते काम बड्या टोळीचे असावे.”
“मग त्या द़ृष्टीने तपासा करा.”
“राणे साहेब, लहान मासे काहीवेळेला मोठ्या माशांपर्यंत घेऊन जातात. भुरट्या चोरांवरून मोठ्यांचा माग सापडतो.” 
“हे रास्त बोललात. चला, आता पुन्हा जेथे जेथे या प्रवासी गाड्या थांबतात तेथे तेथे तपास करू.” 
“शेटजींची बॅग स्टार हॉटेलच्या आवारातून गेली होती, तेथेच तपास करू.”
“तेथून सुरुवात करू चला.” 
स्टार हॉटेलच्या आवारात असंख्य गाड्या थांबल्या होत्या. तेथे खूप गर्दी होती. हॉटेल फुल्ल होते. लोक जेवणासाठी गाड्यांतून बाहेर पडले होत. राणे म्हणाले,  
“हेच चुकते या लोकांचे. बघा, कसे बिनधास्त जेवत आहेत.”
“साहेब, जेवायला पण नको काय त्यांना.”
“खुशाल जेवा, पण साहित्याची कोण काळजी घेणार? इकडे मारताहेत जेवणार ताव. मौल्यवान साहित्य राम भरोसे.”
त्यांनी अनेक गाड्या तपासल्या. लोकांबरोबर बोलणी केली. हॉटेलात चौकशी केली पण हाती काहीच लागले नाही. राणे कंटाळले होते. रात्रीचे साडेबारा वाजले होते. ते म्हणाले,
“चौगुले, चला टपरीवर चहा घेऊ.” इन्स्पेक्टर चौगुले हसू लागले. इन्स्पेक्टर राणेंनी विचारले, 
“का हसलात तुम्ही?”

“हसण्यासारखंच बोलला तुम्ही.  समोर एवढे मोठे हॉटेल आहे. स्पेशल चहा - कॉफी मिळेल, सुग्रास जेवण मिळेल, तेही फुकटात. आणि तुम्ही म्हणता टपरीवर चहा घेऊ.”
“चौगुले, काहीवेळा टपरीवरील चहाच फक्कड असतो. तेथे जे कळतं हे इतरत्र कळणार नाही.”
त्या टपरीवरील मोकळ्या बाकावर बसून त्यांनी चहाची ऑर्डर दिली होती. पंधरा मिनिटांनी चहा आला. राणे म्हणाले, 
“कारे, चहापूड आणायला तू काय आसामात गेला होतास काय? एवढा उशीर का.”“काय करणार साहेब, गर्दी जास्त आहे. एकटा काम करणार... ”
“एक-दोन पोरं ठेव हाताखाली.”
“होती दोन पोरं, पण ती दोघं गेली चैन करायला.”
“त्यांना जास्त अ‍ॅडव्हान्स नको देऊस, पैसा घेऊन पळतील.”
“मी नाही पैसे दिले साहेब त्यांना, पण कुणीतरी दिले असणारच. साहेब, चार पैकं मिळाले की ही पोरं लागल्यात हवेत तरंगायला. त्ये दोघंबी गेल्यात जीवाची मुंबय करायला.” 
“लॉटरी लागली की काय?”
“लॉटरीच म्हणायची. घबाड घावलंय दोघास्नी.”
हे एकताच राणे साहेबांच्या मेंदूत उजेड पडला. त्यांनी त्या टपरीवाल्याकडून त्या दोघांची नावे घेतली. त्यांच्या घरचा पत्ता घेतला. त्यांचे वर्णन विचारून घेतले. बाहेर येताच ते म्हणाले,
“चौगुले, तुम्ही जावा छोट्या माशांच्या मागे. मी मोठ्या माशांच्या मागे लागतो.” 
“साहेब, जरा फोड करून सांगा मला.”

“चौगुले, तुम्ही उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कल्लू आणि बाळूच्या गावी जावा आणि त्यांची झडती घ्या. बरोबर आणखी पोलिस घ्या. साध्या वेशात जावा. मला खबर देत चला.”
“तुम्ही कोठे जाणार?”
“मी मोठ्या माशांच्या मार्गावर मुंबईला जातो.”इन्स्पेक्टर राणे गेल्यावर इन्स्पेक्टर चौगुले उस्मानाबादला जाण्यासाठी गाडीत बसले. 
कल्लू आणि बाळू एका खेडेगावात शेजारीच राहत होते. त्यांच्या घरावर साध्या वेशातील पोलिसांचा पहारा होता. चौथ्या दिवशी ते दोघे रमत-गमत घरी येताना पोलिसांनी त्यांना पकडले. चार दणके दिल्यावर दोघांनी गुन्हा कबूल केला. त्यांचेच हे कारस्थान होते.
“तुम्ही चोरी कशी केलीत ?”
“साहेब, आम्ही दोघे फक्त देखरेख करायचो. धोका वाढला तर त्यांना सावध करायचो. बाबू चोरी करायचा. सदू बॅग घेऊन पळायचा. अशाच चोर्‍या आम्ही केल्या आहेत. यावेळी घबाड मिळालं साहेब आम्हाला. दहा-दहा हजार  रुपयेच मिळाले.”
“त्यातून तुम्ही मजा केली. आता ते दोघे कोठे आहेत?”

“मारू नका साहेब, खरं सांगतो. ते दोघे आता माटुंग्याला सिटी हॉटेलात आहेत.”   त्या दोघांना चौगुलेंनी बेड्या ठोकल्या. इन्स्पेक्टर राणेंना सारी माहिती मोबाईलवरून कळवली. इन्स्पेक्टर  राणेंनी ते हॉटेल गाठले आणि त्या दोघांना तत्काळ ताब्यात घेतले.
चौघांना बेड्या ठेाकून पोलिस स्टेशनमध्ये आणले. त्या चौघांनी मिळून एक लाख रुपये उडवले होते. बांबूचा एक तडाखा देऊन इन्स्पेक्टर राणा म्हणाले,
“चोर्‍या करून जीवाची मुंबई करता काय? आता चला, खडी फोडा आता. उरलेले नऊ लाख रुपये कोठे आहेत ते मुकाट्याने सांगा.”
“साहेब, ते पैसे आमच्या घरातच लपवून ठेवलेत. सगळे परत करतो, आम्हाला मारू नका.”
नऊ लाख रुपये वसूल झाले. चौघांची टोळी गजाआड झाली. इन्स्पेक्टर  चौगुले म्हणाले,
“साहेब, तुम्ही मोठे मासे पकडले. मोठी कामगिरी केलीत.”
“चौगुले, अहो तुमची कामगिरीसुद्धा मोलाची आहे. तुम्ही छोटे मासे पकडले म्हणून मला मोठे मासे सापडले.”
ते दोघेही मनापासून हसू लागले....