दाऊद गँगचे कॉल का घटले?

Last Updated: Nov 06 2019 1:57AM
Responsive image


कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचे नाव घेतले की डोळ्यासमोर येते 1993 चे मुंबई बॉम्बस्फोट. या साखळी बॉम्बस्फोटाने दाऊदचे नापाक इरादे जगासमोर आलेे. तत्पूर्वी खंडणी, हत्या, अपहरण आदी कुकर्म करणार्‍या डी कंपनीने कालांतराने भारताविरुद्ध छुपे युद्ध सुरू केले. देशात घातपाती कारवाया घडवून आणण्यासाठी परदेशात स्थायिक असलेली डी गँग सक्रिय झाली. मुंबई पोलिस कर्मचार्‍याचा मुलगा असलेल्या दाऊदने स्फोटानंतर परदेशात पळ काढला आणि अद्याप तो परागंदा आहे. तो पाकिस्तानात असल्याचे सांगितले जाते. याबाबतचे सरकारकडून पुरावे दिले गेले तरी पाकिस्तानकडून त्याला दुजोरा मिळत नाही. काही वर्षांपासून दाऊदच्या कुरापतींना वचक बसवण्यासाठी मुंबईतील त्याच्या नातेवाईकांना मुसक्या बांधल्या जात आहेत.

दाऊद गँगच्या कुटुंबाविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेमुळे पाकिस्तानातून मुंबईत येणारे कॉल थांबले आहेत.  डी गँगकडून मुंबईतील नातेवाईकांना नेहमीच कॉल येत असल्याचा दावा पोलिसांकडून केला जातो. मात्र दोन महिन्यांपासून अशा कॉलमध्ये घट झाल्याचे चित्र आहे. डॉन दाऊद इब्राहिमने मुंबईत शेवटचा कॉल कधी केला, यावरून मुंबई पोलिसांकडे कोणतेही रेकॉर्ड नाही. दाऊदचे पंटर हे पाकिस्तानात बसून मुंबईला सतत कॉल करत असतात, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र आता या कॉलमध्ये लक्षणीय घट झाली आहे. यामागच्या कारणाचा पोलिस शोध घेत आहेत.

गेल्या दोन महिन्यात भारतात मोठ्या घडामोडी झाल्या आहेत. दाऊदचा भाचा रिझवानला जुलैच्या तिसर्‍या आठवड्यात अटक केली आणि पाच ऑगस्टला जम्मू-काश्मीरमधून कलम 370 काढून टाकले. यानंतर पाकिस्तानातून येणार्‍या प्रत्येक कॉलवर लक्ष ठेवले जात आहे. यानुसार पाकिस्तानात डी गँगला आश्रय असल्याचा कोणताही पुरावा भारताच्या हाती लागू नये, यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय सूचना देत असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. कारण या आधारावर भारत पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवर मोहीम सुरू करू शकतो, अशी भीती आयएसआयला वाटते. दुसरे कारण म्हणजे दाऊदचा भाचा रिझवानची अटक. पाकिस्तानातून कॉल सुरू राहिले तर दाऊदचे अन्य नातेवाईकदेखील अडचणीत येऊ शकतात, अशीही शंका आयएसआयला वाटत आहे. त्यामुळे कॉलच्या संख्येत घट झाली आहे. 

मुंबईच्या गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, दाऊद गँगमधील दोन प्रमुख म्होरके छोटा शकील आणि फहीम मचमच हे महिन्यातून सरासरी सात ते आठ कॉल्स डी कंपनीच्या मुंबईतील नातेवाईकांना करतातच. इक्बाल कासकरला अटक करण्यापूर्वी  एकाच दिवसात वीस ते पंचवीस कॉल व्हायचे. या कॉलच्या माध्यमातून दाऊदचा संदेशही पोचायचा.  याशिवाय या कॉल्समध्ये गुंड अनिसची ऑडिओ रिकॉर्डिंगही व्हॉट्स अपच्या माध्यमातून नातेवाईकापर्यंत जायची. कायदेशीर मदतीसाठीदेखील मुंबईत नियमित कॉल येत असे. आता मात्र या सर्व हालचालींना पायबंद बसला आहे.  

भारताकडून दाऊद इब्राहिम आणि त्याच्या गँगची आर्थिक नाकाबंदी सुरू आहे. त्यामुळे एके काळी आलिशान आयुष्य जगणार्‍या मंडळींची आता शेवटची घटका सुरू आहे. पाकिस्तानमधून येणार्‍या फोन कॉल्समध्ये घट होणे हे त्याचेच लक्षण मानले जात आहे.