Tue, Jun 25, 2019 15:10होमपेज › Bhumiputra › कांदा प्रक्रियेला चालना गरजेची

कांदा प्रक्रियेला चालना गरजेची

Published On: Sep 10 2018 10:12PM | Last Updated: Sep 10 2018 9:51PMकांद्यावर प्रक्रिया केली तर त्यापासून विविध प्रकारचे पदार्थ बनवता येतात. यामुळे होणारे फायदे लक्षात आल्यानंतर अलीकडे कांदा प्रकिया उद्योगाला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

विठ्ठल जरांडे

 

महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे कांदा पिकविणारे राज्य आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील हवामान हे वर्षभर म्हणजे खरीप, रांगडा, रब्बी आणि उन्हाळी हंगामात लागवडीस पोषक असते. महाराष्ट्रातील 37 टक्के कांदा क्षेत्र हे एकट्या नाशिक जिल्ह्यात असून प्रामुख्याने पुणे, धुळे, अहमदनगर, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये कांदा पीक घेतले जाते. कांदा पिकाच्या प्रति हेक्टरी आणि एकूण उत्पादनाबाबत अनेक विक्रम शेतकर्‍यांनी नोंदविलेले असले तरी कांदा साठवणुकीबाबत परिस्थिती फारशी समाधानी नाही. सद्यस्थितीचा विचार करता 30 ते 40 टक्क्यांपर्यंत कांद्याचे अयोग्य साठवणुकीमुळे नुकसान होते. कांदा साठवणुकीवर कितीही उपाय योजले तरी त्याला मर्यादा आहेत. म्हणून त्यावर मेहनत घेण्यापेक्षा ताज्या कांद्यावर प्रक्रिया करणे सोपे असते. त्यामुळे कांदा प्रक्रिया उद्योगाला अलीकडे महत्त्व प्राप्त झाले आहे.

आपल्या देशात कांदा कच्च्या स्वरूपात खाल्ला जात असला तरी परदेशात मात्र प्रक्रिया केलेलाच कांदा खाल्ला जातो. म्हणून प्रक्रिया केलेल्या कांद्याला देशांतर्गत तसेच देेशाबाहेरही मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकणार आहे. कांद्यावर प्रक्रिया करून तयार केलेल्या पदार्थांची विक्री केल्यास साठवणुकीत आणि वाहतुकीत होणारे कांद्याचे नुकसान टाळता येईल. परदेशात कांद्याच्या पावडरीस आणि निर्जलीकरण केलेल्या कांद्यांच्या चकत्यांना मोठी मागणी आहे, सध्या त्यांची निर्यात जपान, मलाया, पूर्व आफ्रिका, इंग्लंड, श्रीलंका, हाँगकाँग, जर्मनी इत्यादी देशांमध्ये होत आहे.

वेगवेगळ्या उच्च तापमानाच्या सान्‍निध्यात निर्जलीकरण करून त्यापासून ड्राईड कांदा चकत्या किंवा कांद्याची पावडर बनविली जाते. पुढे असे पदार्थ हवाबंद डब्यात किंवा पाकिटात भरून पॅक करता येतात. निर्जलीकरण केलेल्या कांद्याचा उपयोग सूप, सॉस, सलाड सजविण्यासाठी केला जातो.अल्कोहोलविरहित पेय, आईस्क्रीम, चॉकलेट, च्युईंगम, लोणचे इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी कांद्यापासून तयार केलेल्या तेलाचा उपयोग होतो. कांद्याचे तेल पिवळसर तपकिरी रंगाचे असते.

 कांद्याला दाब देऊन आणि नंतर गरम करून ज्यूस तयार करता येतो. अशा प्रकारच्या ज्यूसला नैसर्गिक स्वाद आणि वास असतो. परदेशात कांदा लोणच्याला मोठी मागणी आहे. तेथे ब्राईन द्रावणात कांदा भिजवून नंतर तो गोड लोणच्यासाठी साखर आणि व्हिनेगरमध्ये बुडवून बाटलीबंद केला जातो. तर खारट लोणच्यासाठी मीठ आणि व्हिनेगरच्या द्रावणात बाटलीबंद केला जातो