Thu, Jun 27, 2019 17:44होमपेज › Bhumiputra › कापणीसोबत पेंड्या बांधणारे यंत्र

कापणीसोबत पेंड्या बांधणारे यंत्र

Published On: Sep 10 2018 9:48PM | Last Updated: Sep 10 2018 9:48PMपिकाची कापणी झाल्याबरोबर त्याच्या पेंड्या बांधणे आवश्यक असते आणि त्यासाठी अधिक मजूर लागतात. परंतु, एका नव्या यंत्रामुळे मजूर शोधण्याची वेळ शेतकर्‍यांवर येणार नाही. कापणीसाठी यापूर्वीही यंत्र उपलब्ध होते; मात्र पेंड्या बांधणारे यंत्र उपलब्ध नव्हते. नव्याने बाजारात आलेले यंत्र एकाच वेळी कापणी आणि पेंड्या बांधण्याचे काम करते. 

विलास कदम


शेतीच्या कामात कापणीला मोठे महत्त्व असते. हल्ली पावसाच्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे कापणीचे काम सुरू असताना पाऊस आल्यास शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होते. त्याचबरोबर कापणी केलेले पीक शेतात ठेवलेले असताना पाऊस आला तरी हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो. 

विशेषतः गव्हाच्या बाबतीत कापणीची वेळ आणि पेंड्या बांधण्याच्या कामाला अधिक महत्त्व असते. परंतु, गहू कापणीतील आणखी एक अडचण म्हणजे मजुरांचा तुटवडा. कामाच्या शोधार्थ शहरांकडे होणारी स्थलांतरे वाढली असल्यामुळे आजकाल शेतकर्‍यांना मजूर वेळेवर मिळत नाहीत. एकाच वेळी अनेकांच्या शेतात कापणीचे काम सुरू असल्यामुळेही मजुरांचा तुटवडा जाणवतो. मजूर मिळाले तरी मजुरीचा दर परवडत नाही. या सर्व अडचणींवर हुकमी उपाय देणारे यंत्र आता बाजारात आले आहे. पिकाची कापणी झाल्याबरोबर त्याच्या पेंड्या बांधणे आवश्यक असते आणि त्यासाठी अधिक मजूर लागतात. परंतु, या यंत्रामुळे मजूर शोधण्याची वेळ शेतकर्‍यांवर येणार नाही. कापणीसाठी यापूर्वीही यंत्र उपलब्ध होते; मात्र पेंड्या बांधणारे यंत्र उपलब्ध नव्हते. नव्याने बाजारात आलेले यंत्र एकाच वेळी कापणी आणि पेंड्या बांधण्याचे काम करते. 

गव्हाची कापणी केल्यानंतर त्याच्या पेंड्या बांधणारे हे यंत्र व्हील रीपर बाईंडर व्हीट हार्वेस्टर नावाने ओळखले जाते. हे यंत्र आणल्यास शेतकर्‍यांच्या अनेक समस्या एकाच वेळी सुटू शकतात. यापूर्वी बाजारात उपलब्ध असलेली यंत्रे गव्हाच्या पिकाची कापणी अगदी मुळांच्या जवळून करीत असत.  त्यामुळे शेतकर्‍यांना भुसा उपलब्ध होत नसे आणि यंत्राने कापणी केल्यास गुरांच्या चार्‍याचा प्रश्‍न निर्माण होत असे. आता बाजारात आलेल्या नव्या यंत्राद्वारे मात्र शेतकर्‍यांना पर्याप्त प्रमाणात भुसाही उपलब्ध होऊ शकतो. त्याचबरोबर मजुरांना शोधत बसण्याची वेळ शेतकर्‍यांवर येत नाही. हे यंत्र केवळ गहूच नव्हे तर भात, सोयाबीन, मूग, तीळ, हरभरा, मसूर अशा सर्वच पिकांची कापणी करू शकते. या यंत्राची बाजारातील किंमत सुमारे अडीच लाख एवढी आहे. परंतु, यातील एक महत्त्वाचा फायदा म्हणजे, ट्रॅक्टर नसतानाही केवळ या यंत्राच्या साह्याने कापणी करता येते. या यंत्राला 10.2 अश्‍वशक्‍तीचे इंजिन बसविण्यात आले आहे. 

एका तासात हे यंत्र एक एकर जमिनीतील पिकाची कापणी करून लगोलग पेंड्याही बांधू शकते. विशेष म्हणजे, हे काम करण्यासाठी या यंत्राला केवळ एक लिटर डिझेल लागते. या यंत्राला पाच गिअर असून, त्यातील चार गिअर पुढचे आणि एक मागचा गिअर आहे.