Tue, Jun 25, 2019 15:31होमपेज › Bhumiputra › पर्याय कवठ लागवडीचा

पर्याय कवठ लागवडीचा

Published On: Aug 28 2018 1:14AM | Last Updated: Aug 28 2018 1:14AM
कवठ या कोरडवाहू फळझाडाच्या लागवडीपासून चांगल्या प्रकारचे उत्पन्‍न कमी खर्चात मिळते. साधारण फळाची लागवड शेतावरील बंधारे, विहिरी लगतच्या जागा आणि पडीक जमिनीवर करण्यात येते. कवठ हे वेलवर्गीय फळझाड असून फळ कठीण, जड व गोल असते. फळामध्ये बियांचे प्रमाण भरपूर असते. फळाचा गर आंबट गोड असतो. जीवनसत्व ‘ब’ मोठ्या प्रमाणावर असते. कवठाचा जाम, जेली, चटणी इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होतो.

कवठाची लागवड अत्यंत हलक्या जमिनीवर करण्यात येते. क्षारयुक्‍त जमिनी कवठाच्या वाढीस उपयुक्‍त ठरतात. कवठाची वाढ मध्यम कोरड्या हवामानात चांगल्या प्रमाणात होते. कवठ या झाडाची लागवड करण्याकरिता रोपे तयार करावी लागतात. रोपे तयार करण्याकरिता फक्‍त निरोगी फळे निवडावीत. गर हाताने चोळून बियांपासून वेगळा करावा. बिया स्वच्छ पाण्यात धुवून पाण्यावर तरंगणार्‍या बिया बाजूला काढाव्यात. धुतलेल्या बिया सावलीत वाळवून तत्काळ रूजू घालाव्यात. 20 ते 22 दिवसांनंतर उगवलेली रोपे लागवडीकरिता उपयोगात आणावीत. लागवड करण्यापूर्वी शेत चांगल्या प्रकारे नांगरून कोळवून सपाट करावे. खड्डे तयार करून 10, 10, 10, मि. या अंतराने लागवड करावी. कवठाची लागवड एलोरा या वाणाद्वारे अथवा स्थानिक उपलब्ध जातीतून निवड पद्धतीने करण्यात येते. कवठ या फळाची अभिवृद्धी बियांपासूनच करतात. 

कवठ या फळझाडास खताची गरज कमी प्रमाणात असते. फळांची वाढ चांगल्याप्रकारे होण्याकरिता शेणखत व रासायनिक खते देण्यात यावीत. साधारणतः खते एक वर्षाचे झाड झाल्यानंतर द्यावीत. पूर्ण वाढ झालेल्या झाडांना शेणखत 20 किलो, नत्र 400 ग्रॅम, स्फुरद 700 ग्रॅम, पालाश 250 ग्रॅम या मात्रेत द्यावीत.

कवठ हे सहसा कोणत्याही रोगास बळी पडत नाही. परंतु, काही वेळा पेप्रायसिक नावाचा रोग पानावर दिसून येतो. त्याकरिता 6 टक्के बोरॅक्स फवारावेत.

 कवठापासून उत्तम जेली तयार करण्यात येते. पिकलेल्या कवठाचा 1 किलो गर भांड्यात घेऊन त्यामध्ये 4 लिटर पाणी टाकावे. त्यास 45 मिनिटे उकळावावे. त्यानंतर अर्क गाळून वेगळा करावा. या अर्कात 2 किलो साखर व 5 ग्रॅम सायट्रिक अ‍ॅसिड टाकावे. मिश्रण गोळीबंद होईपर्यंत शिजवावे. त्यानंतर जेली मिश्रण गरम असताना रुंद तोंडाच्या बाटलीत भरून थंड जागी ठेवावे. पिकलेल्या कवठाचा अर्धा किलो गर घेऊन त्यात दीडपट गूळ चांगला मिसळावा. त्यात चवीप्रमाणे मीठ, जिरे (भाजलेले) व तिखट टाकावे व चटणी कुटून लगेच उपयोगात आणावी.