होमपेज › Bhumiputra › पर्याय चारा पिकांचे

पर्याय चारा पिकांचे

Published On: Aug 28 2018 1:14AM | Last Updated: Aug 28 2018 1:14AMहंगामी पिकाबरोबर बहुवार्षिक, एकदल तसेच द्विदल चारा पिकांची लागवड पशुपालकांनी करणे गरजचे आहे. त्यामुळे जनावरांसाठी पौष्टिक चार्‍याची उपलब्धता होते. रब्बी हंगामाचा विचार करता चार्‍यासाठी लसूण घास, मका आणि बरसीमची लागवड करावी. या पिकांच्या सुधारित जाती आता उपलब्ध झाल्याने किफायतशीर उत्पादन घेता येते.
लसूणघास हे अतिशय लुसलुशीत, हिरवेगार आणि पौष्टिक चारा पीक आहे. या पिकामध्ये 19 ते 22 टक्के प्रथिने आहेत. लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत करावी. जमिनीची चांगली मशगत करून 30 सेें.मी. अंतरावर लागवड करावी. हेक्टरी 25 किलो बियाणे लागते. लागवडीसाठी आर.एल.-88, सिरसा-9 आनंद- 2 या जाती निवडाव्यात, पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाणास 250 गॅ्रम रायझोबियम जिवाणूसंवर्धक चोळावे. लागवडीच्या वेळेस माती परीक्षणानुसार खतमात्रा द्याव्यात. पिकाच्या गरजेनुसार दर पाच ते सहा दिवसांनी पाणी द्यावे. पहिली कापणी 55 ते 60 दिवसांनी आणि नंतरच्या सर्व कापण्या 25 दिवसांच्या अंतराने कराव्यात. अशा प्रकारे हेक्टरी 100-120 टन हिरवा पौष्टिक चारा जनावरांसाठी उपलब्ध होऊ शकतो. 
• चवदार मका : लागवडीसाठी सुपीक, कसदार आणि निचरायुक्‍त, मध्यम ते भारी जमीन या पिकाच्या वाढीसाठी आवश्यक आहे. लागवडीसाठी जमिनीची एक खोलवर नांगरट करून घ्यावी. नंतर कुळवाच्या दोन-तीन पाळ्या देऊन जमीन चांगल्याप्रकारे भूसभुशीत करून व्यवस्थितरीत्या शेत तयार करून घ्यावे. रब्बी हंगामाच्या द‍ृष्टीने ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत लागवड करावी. लागवडीसाठी आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगा सफेद-2, विजय या जातींची निवड करावी. पेरणी वेळेत करणे उत्पादनाच्या द‍ृष्टीने महत्त्वाचे आहे. 
पेरणीसाठी हेक्टरी 75 किलो बियाणे लागते. पेरणी पाभरीने 30 सें.मी. अंतरावर करावी. लागवडीपूर्वी दहा किलो बियाणास 250 ग्रॅम अ‍ॅझोटोबॅक्टर या जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी 20-25 गाड्या शेणखत अथवा कंपास्टखत जमिनीत मशागतीच्या वेळी चांगले मिसळून घ्यावे. पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो पालाश आणि 50 किलो स्फुरद द्यावे. पेरणीनंतर साधारणपणे एक महिन्यांनी नत्राचा दुसरा हप्‍ता हेक्टरी 50 किलो या प्रमाणात द्यावा. पीकवाढीच्या सुरुवातीच्या काळात एक कोळपणी आणि एक खुरपणी करावी. पिकाची वाढ व्यवस्थितरीत्या होण्यासाठी सात-आठ पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. कापणी साधारणपणे पीक 50 टक्के फुलार्‍यात असताना करावी, म्हणजे पौष्टिक आणि चवदार चारा आपणाला उपलब्ध होतो. अगोदर किंवा उशिरा कापलेल्या वैरणीत सकसपणा कमी असतो. साधारणपणे योग्य व्यवस्थापनात मक्याचे उत्पादन मिळते. 
• सकस बरसीम : बरसीम हे वर्षभराच्या चार्‍यासाठी उत्तम चारापीक मानले जाते. हा चारा पालेदार असून सकस आणि रूचकर असतो. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण 17-19 टक्के इतके असते. बरसीम पिकासाठी मध्यम आणि भारी, तसेच चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. 
या पिकाच्या पेरणीकरिता जमीन भूसभुसीत असणे आवश्यक आहे. त्याकरिता जमीन खोलवर एकदा नांगरून घ्यावी आणि त्यानंतर दोन वेळा कुळवावी किंवा रोटाव्हेटरच्या साह्याने जमीन भूसभुशीत करावी. बरसीमची लागवड ऑक्टोबर-नोव्हेेंबर महिन्यात करावी. लागवडीसाठी वरदान, मस्कावी, जे.बी.1, जे.एच.बी.146 या जास्त उत्पादन देणार्‍या जातींची निवड करावी. प्रति हेक्टरी लागवडीसाठी 30 किलो बियाणे लागते. पेरणी करण्यापूर्वी प्रति दहा किलो बियाणास 200 ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. पेरणी 30 सें.मी. अंतराने करावी. पेरणीपूर्वी प्रति हेक्टरी 15-20 बैलगाडी शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. पेरणीपूर्वी माती परीक्षणानुसार 20 किलो नत्र, 80 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. घासाची कापणी झाल्यानंतर खुरपणी करून शेत तणविरहित ठेवावे. पेरणी केल्यानंतर पहिली कापणी साधारणपणे 55 दिवसांनी करावी. त्यानंतरच्या कापण्या 25-30 दिवसांच्या अंतराने कराव्यात. योग्य व्यवस्थापन केल्यास दहा कापण्यांमध्ये प्रति हेक्टरी 1000 क्विंटल चार उत्पादन मिळते.