Thu, Aug 22, 2019 04:41होमपेज › Bhumiputra › हमखास आर्थिक उत्पन्‍न  देणारा पोल्ट्री व्यवसाय

हमखास आर्थिक उत्पन्‍न  देणारा पोल्ट्री व्यवसाय

Published On: Feb 12 2019 1:11AM | Last Updated: Feb 19 2019 1:17AM
संग्राम पाटील,                                                         

‘कोणत्याही व्यवसायामध्ये अपार कष्ट करायची तयारी असेल तर यश नक्‍कीच मिळते’ असे म्हणतात. आणि असेच यश तिरपण (ता. पन्हाळा) येथील अनेक तरुण युवकांनी पोल्ट्री व्यवसायाची उभारणी करून मिळवले आहे. 
ग्रामीण भागातील हा व्यवसाय तरुणांना हमखास आर्थिक उत्पन्‍न मिळवून देणारा व्यवसाय आहे, असे या युवकांनी सिद्ध केले आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या अधिक वापरामुळे व बेरोजगारीमुळे ग्रामीण युवक भरकटलेला दिसतो आहे. यासाठी ग्रामीण युवकांनी कष्ट करण्याची तयारी ठेवावी व असे छोटे-मोठे व्यवसाय उभारून बेरोजगारीवर मात करत आपले आर्थिक उत्पन्‍न वाढवून प्रगती करावी, असे या युवकांचे म्हणणे आहे.

तिरपण येथील संग्रामसिंह ऊर्फ अमर घोरपडे, कुमार घोरपडे, शिवाजी घोरपडे, दिलीप घोरपडे याचबरोबर राजेंद्र पाटील व बाबुराव कांबळे यांनी या व्यवसायात आपला जम बसवला आहे. घोरपडे कुंटुबीयांनी साधारणपणे सात वर्षांपूर्वी दिगवडे फाट्यानजीक असलेल्या आपल्या शेतामध्ये तर राजेंद्र पाटील याने चार ते पाच वर्षांपूर्वी व बाबुराव कांबळे यांनी यावर्षी कोतोली-कळे रस्त्याला लागून असलेल्या तिरपण येथील माळरानावर पोल्ट्री फार्मची उभारणी केली आहे. हे युवक पदवीधर असून आपली नोकरी सांभाळत हा व्यवसाय करत आहेत. तर बाकीचे सर्वजण शेती सांभाळत हा व्यवसाय उत्तम पद्धतीने करत आहेत.

पोल्ट्री व्यवसायासाठी शेडची उभारणी करण्यासाठी सर्वसाधारणता 7 लाख रुपयेच्या आसपास खर्च येतो. प्रत्येक शेडमध्ये साधारणत: 3500 ते 4000 पक्षी असतात. हे पक्षी सगुणा कंपनी पुरवठा करते. कंपनीकडून पक्षी पोल्ट्रीमध्ये दिले जातात तेव्हा त्यांचे वजन 50 ते 75 ग्रॅमच्या दरम्यान असते. हे पक्षी साधारणता 45 ते 50 व्या दिवशी कंपनी परत घेते. तेव्हा त्यांचे वजन 2 ते 2.5 किलोग्रॅम दरम्यान असते. सध्या मांसासाठी मोठ्या प्रमाणात मागणी  असल्यामुळे हा व्यवसाय तेजीत आहे.

या व्यवसायामध्ये आर्थिक उत्पन्‍न जरी ज्यादा असले तरी कष्टही त्याचप्रमाणात करावे लागतात. यामध्ये पक्षी अतिशय चांगल्या हवामानात वाढवावे लागतात, वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यामुळे कोणत्याही प्रकारची रोगराई निर्माण होऊ नये, याकरिता प्रकर्षाने लक्ष  दयावे लागते, दररोज पोल्ट्रीतील कोंडा हलवणे, पक्ष्यांना धान्य घालणे, पाणी सोडणे, वेळोवेळी लस देणे ही नित्याची कामे करावी लागतात. 

पक्ष्यांची निगा राखावी लागते. दोन महिन्यांतून एक लॉट याप्रमाणे वर्षातून सर्वसाधारणपणे पाच ते सहा लॉट होतात. प्रत्येक लॉटमधून सरासरी निव्वळ उत्पन्‍न 30,000 हजार ते 40,000 हजार दरम्यान मिळते. या उत्पन्‍नाचा वार्षिक विचार करता सर्वसाधारणपणे दीड लाख ते दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्‍न मिळते. पाच ते दहा गुंठे जागा असेल तर हा व्यवसाय चांगला करता येतो. याच दहा गुंठ्यात ऊस पिकाचे उत्पादन घेतले तर वार्षिक उत्पन्‍न 30,000 हजार रुपये मिळते. परंतु, पोल्ट्री व्यवसायातुन मिळणारे उत्पन्‍न त्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे हा व्यवसाय तरुणांना हमखास आर्थिक उत्पन्‍न मिळवून देणारा व्यवसाय आहे.