Tue, Jun 25, 2019 15:09होमपेज › Bhumiputra › वाटाणा लागवड

वाटाणा लागवड

Published On: Sep 04 2018 1:20AM | Last Updated: Sep 03 2018 8:16PMकडधान्यामध्ये वाटाण्याचे स्थान महत्त्वाचे आहे. तरी शेतकरी बंधूनी वाटाण्याची लागवडीकडे लक्ष वेधावे वाटाणा सर्व प्रकारच्या जमिनीत येतो. वाटाने दोन प्रकारचे असतात. एक देशी वाटाणे व दुसरे विलायती वाटाणे. विलायती बी सुकल्याप्रमाणे सुरुकुत्या पडलेल्या असतात. रंग हिरवा असतो. वाटाण्याच्या काही प्रकारची रोपाची उंची एक फूट असते. तर काही रोपांची उंची 3 ते 4 फूट असते. कमी उंचीच्या वाटाण्यास  लवकरच शेगा लागतात. जास्त उंचीच्या रोपांना काठीचा आधार द्यावा लागतो व शेंगाही लागतात. वाटाण्याला शेंगा लागल्यानंतर काळजीपूर्वक शेंगा तोडाव्या लागतात. देशी वाटाण्यामध्ये पांढर्‍या रंगाचे वाटाणे चांगले तर ओल्या वाटाण्याची भाजी उसळ केली जाते.

जमीन व हवामान : वाटाणा जरी सर्व प्रकारच्या जमिनीत येत असलातरी चांगली निचरा होणारी भूसभुशीत, काळी रेताड जमीन पोषक आहे. रेताड व सुपीक जमिनीत हे पीक चांगले येते. थंडीच्या दिवसात वाटाण्याचे पीक चांगले पोसते. ज्या प्रदेशात वसंत ऋतूत थंडी हळूहळू कमी होऊन उष्णता वाढते त्या प्रदेशात वाटाण्याचे उत्पन्‍न चांगल्या प्रकारे होते. पावसाळी पिकांसाठी जून-जुलैमध्ये लागवड केली जाते. तरी रब्बी हंगामात ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये केली जाते.

पूर्व मशागत : निवडलेल्या शेतीची नांगरट, कुळवट करून पालापाचोळा वेचून जमीन भूसभुशीत करून द्यावी.

पेरणी : खरिपाच्या सुरुवातीला पेरणी करावी. त्यानंतर रब्बी हंगामात ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये करावी. पेरणी करतेवेळी बियाणांची निवड व कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बीज प्रक्रिया करावी. 15 ते 20 किलो बियाणे प्रति हेक्टरी लागते.

आंतर मशागत : ‘तण खाई धन’ याप्रमाणे वाटाण्याच्या क्षेत्रात तण वाढू देऊ नये. यासाठी कोळपण व खुरपण करून घ्यावी. तणविरहीत क्षेत्र असले पाहिजे.

खत व्यवस्थापन : हेक्टरी 5 टन शेंण खत व 25 किलो नत्र व 50 किलो स्फुरदचा वापर करावा. सेंद्रिय खतांचाही वापर केल्यास उत्तम होईल.

पीक संरक्षण : या पिकास पांढरी माशी, पाने खाणारी अळी, भुंगे यांचा उपद्रव होतो तसेच मूळ कुजव्या, भुरीसारखा रोग होतो. त्यासाठी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्यावेळी औषध फवारणी करावी.

 पाणी व्यवस्थापन : खरिपात पाण्याचा फारसा प्रश्‍न निर्माण होत नाही, तरी गरज पडल्यास पाण्याची व्यवस्था होणे महत्त्वाचे आहे. रब्बी हंगामात 4 ते 5 दिवसांनी पाणी द्यावे लागेल.

वाटाण्याचा औषधी उपयोग : वाटाण्यामध्ये फॉस्परस, पोटॅशिअम, मॅग्‍नेशियम, कॅल्शियम, गंधक, ताम्र, लोह असते. म्हणजे सुपाच्या प्रोटीन पुष्कळ असते. तसेच कार्बोहायड्रेट व ए व सी जीवनसत्त्वे पुष्कळ असतात. इतर खजिनेही भरपूर असतात. अलीकडे वाटाणे हवाबंद डब्यात ठेऊन जास्तकाळ टिकवता येतात. दक्षिण भारतात वाटाण्याच्या पानांची भाजी बनवली जाते. वाटाण्याचे सूप रोग्यास उत्तम आहे. झुका वाटाणा कडधान्य म्हणून सर्वात उपयोगी आहे. वाटाण्याची खिचडी, भाजी, उसळ हे रोग्यास द्यावे. त्यातून भरपूर खनिजे मिळतात.