Tue, Jun 25, 2019 15:26होमपेज › Bhumiputra › लागवड नीर फणसाची!

लागवड नीर फणसाची!

Published On: Sep 04 2018 1:20AM | Last Updated: Sep 03 2018 8:21PMअरविंद चोडणकर

कोकणातील विशेषतः गोव्यातील नीर फणस या फळाची झाडे या विभागात दिसून येत नाहीत. या फळांचे आहार व औषधीद‍ृष्ट्या उपयोग पाहता तसेच या फळाची वाढती मागणी पाहता नीर फणसाची लागवड या तालुक्यात फायदेशीर ठरणार आहे. आणि या विभागातील शेतकर्‍यांना उत्पन्‍नाचे साधन बनणार आहे. 

पश्‍चिम घाटमाथ्यावरील अनेक तालुके कोकण सद‍ृश्य भाग म्हणून ओळखले जातात. या तालुक्यातील नित्य जनजीवन, हवामान, बोली भाषा, सांस्कृतिक गोष्टी कोकणाशी जवळीक साधणार्‍या आहेत. कोकणातील असंख्य वनस्पती तसेच फणस, नारळ, आंबा, काजू, जांभूळ, कोकम अशा स्वरूपाची खास कोकणी समजली जाणारी फळझाडे विपुल प्रमाणात आढळून येतात. तशी ही वनस्पती परदेशी आहे. इंडोनेशिया, मलेशिया आणि ब्रुनेई हे नीर फणसाचे मूळ देश. मात्र, आता थायलंड, फिलिपिन्स इत्यादी ठिकाणीसुद्धा त्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. कोकण किनारपट्टीत  आपल्याकडे जसे नारळाला प्राधान्य आहे, तसेच प्राधान्य दक्षिण-पूर्व एशियात नीर फणसाला आहे. तिकडे त्याला फळांचा राजा म्हणतात.

फणस असला तरी याच्यापासून ब्रेड व भाकरीही बनवली जाते. म्हणून याला भाकरीचा  फणस किंवा ब्रेड फणस म्हणतात. हा गोल भोपळ्याच्या आकाराचा असतो म्हणून याला भोपळी नावानेही ओळखले जाते.

रान फणस, बाधर आणि विलायती फणस या फणसाच्या कुळातीलच ही वनस्पती आहेत. कमी-अधिक प्रमाणात त्यांचेही गुणधर्म यात आहेत. नीर  फणसाची  सध्या गोवा किंवा कोकण किनार पट्टीत लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. परदेशात त्याच्या पिठाचे ब्रेड बनवले जात असल्याने त्याला इंगते ब्रेड फ्रूट’ ही म्हणतात.
• नीर फणसाचा वास उग्र असतो. नेहमीच्या फणसाचा वास त्यामानाने बराच मवाळ आहे.
•  नीर फणसाचे कवच इतर फणसापेक्षा जास्त कडक व कापण्यास अवघड असते.
•  नीर फणसाचा आकार इतर फणसापेक्षा थोडा लहान असतो पण त्याचे काटे फणसापेक्षा बरेच मोठे असतात.
•  निरफणसाचे काटे बोथट असतात. आणि फळ म्हणून खाण्यापेक्षा तो भाजी म्हणून जास्त खाल्ला जातो.

हे फळ भाजून वा उकडूनही खाता येते. भाजल्यावर ते पावाप्रमाणे लागतो. याचे झाड खूप मोठे असते. याची पाने नेहमीच्या झाडा पेक्षा वेगळी असतात. 30 सेमी लांब व तेवढीच रुंद असतात. फळे इतर फणसासारखे थेट खोडाला न लागता, फांद्याच्या टोकांना लागतात. फळे आरोग्य संपन्‍नता मिळवून देणारी आहेत. चांगली पोषण मूल्य असणारी मधुमेहींना आहारात आवर्जुन समावेश करावा असा नीर फणस आहे.

नीर फणसात असणारी  पोषण मूल्यद्रव्ये 71 टक्के कार्बो हायड्रेडस, 27 टक्के प्रोटीन 1 टक्के थैमीन. 
नीर फणसाच्या रोपाबाबत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ किंवा गोपुरी आश्रम, कणकवली, यांच्याशी संपर्क करावा.