Wed, Sep 26, 2018 14:27



होमपेज › Bhumiputra › तीन हंगामात उत्‍पादन देणारं 'झेंडुचं फुल'

तीन हंगामात उत्‍पादन देणारं 'झेंडुचं फुल'

Published On: Sep 11 2018 3:08PM | Last Updated: Sep 11 2018 3:08PM



पुढारी ऑनलाईन : धनाजी सुर्वे

दिवसेंदिवस शेतीचे कमी होत जाणारे क्षेत्र, कृषी मालाची कमी उत्पादकता व जास्तीचा उत्पादन खर्च, बेभरवशाची बाजारपेठ यामुळे शेती व पर्यायाने लहान शेतकरी अडचणीत येत आहे. मात्र, आधुनिक तंत्रज्ञान आणि नव नवीन उपक्रम शेतीत राबविले तर शेती हा व्यवसासुध्दा फायदेशीर ठरतो. फुलशेती शेतकऱ्यांना जास्‍त फायदेशीर ठरणारा पर्यात आहे. यातच आधुनिक पध्दतीने केलेली झेंडूची शेती शेतकऱ्याला चांगले उत्‍पादन मिळवून देते. 

झेंडू हे फक्त राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात महत्वाचे फुल पीक आहे. झेंडूचे पीक अनेक प्रकारच्या जमिनीत आणि तिन्ही हंगामात घेतले जाणारे पिक असून, झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. दसरा-दिवाळी या सणांच्या काळात तसेच विविध कार्यक्रमांमध्येही झेंडूच्या फुलांचा वापर केला जातो. तसेच उन्हाळ्यात लग्नसराईत झेंडूच्या फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात, कमी दिवसात जास्‍त उत्‍पादन घेता येते. महत्‍वाची बाब म्‍हणजे कमी पाण्यात आणि हलक्या जमिनीतही हे पीक तग धरून वाढते. 

जमीन व हवामान
झेंडू हे मुख्यत्वाने थंड हवामानाचे पिक आहे. थंड हवामानात झेंडूची वाढ व फुलांचा दर्जा चांगला असतो. वातावरणाच्या परिस्थितीनुसार झेंडूची लागवड पावसाळी, हिवाळी व उन्हाळी या तीनही हंगामात केली जाते. आफ्रिकन झेंडूची लागवड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर व जुलैच्या पहिल्या आठवड्यापूर्वी केल्यास उत्पादनावर आणि फुलांच्या दर्जावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून १५ दिवसाच्या अंतराने लागवड केल्यास ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत भरपूर व दर्जेदार उत्पादन मिळते. परंतु सर्वात जास्त उत्पादन सप्टेंबरमध्ये लागवड केलेल्या झेंडूपासून मिळते.

सुपीक जमिनीत जास्‍त उत्‍पादन
झेंडूची लागवड निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीत करता येते. झेंडूसाठी सुपीक, पाणी धरून ठेवणारी परंतु, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन चांगली मानवते. ज्या जमिनीचा सामू ७.० ते ७.६ इतका आहे त्या जमिनीत झेंडूचे पीक चांगले येते. झेंडू या पिकास भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक आहे. सावलीमध्ये झाडांची वाढ चांगली होते, परंतु फुले येत नाहीत.

जाती
१) आफ्रिकन झेंडू
या प्रकारची झेंडूची झाडे उंच वाढतात. झाड काटक असते. पावसाळ्याच्या हवामानात झाड १०० ते १५० से. मी. पर्यंत उंच वाढतात. फुलांचा रंग पिवळा, फिकट पिवळा, नारंगी असतो. या प्रकारांमध्ये, जायंट डबल, आफ्रिकन यलो, ऑरेंज, अर्ली यलो, अर्ली ऑरेंज, गियाना गोल्ड, क्रॅकर जॅक, ऑरेंज ट्रेझंट, बंगलोर लोकल, दिशी सनशाईन, आफ्रिकन टॉल डबल, मिक्स्ड, यलो सुप्रीम, हवाई, स्पॅन गोल्ड, अलास्का, इत्यादी

२) फ्रेंच झेंडू 
या प्रकारातील झेंडूची झाडे उंचीला कमी असतात व झुडुपासारखी वाढतात. झाडांची उंची ३० ते ४० से. मी. असते. फुलांचा आकार लहान मध्यम असून, अनेक रंगाची फुले असतात. या प्रकारातील जाती कुंडीत, बागेत, रस्त्याच्या दुतर्फा, तसेच फुलांचा गालीचा तयार करण्यासाठी, हिरवळीच्या कडा सुशोभीकरणासाठी लावतात. या प्रकारामध्ये पुढीलप्रमाणे जातींचा समावेश होतो. यलो बॉय, हार्मोनी बॉय, लिटल डेव्हिल, बायकलर, बटर स्कॉच, स्प्रे, लेमन ड्वार्फ यलो, रेड मारिटा, हार्मोनी, रॉयल बेंगाल, क्विन, सोफिया, इत्यादी.

सुधारित व संकरीत जाती
पुसा नारंगी, (क्रॅकर जॅक जर गोल्डन जुबिली): या जातीस लागवडीनंतर १२३-१३६ दिवसानंतर फुले येतात. झाड ७३ से. मी. उंच वाढते व वाढ देखील जोमदार असते. फुले नारंगी रंगाची व ७ ते ८ से. मी. व्यासाची असतात. हेक्टरी उत्पादन ३५ मे. टन / हेक्टर याप्रमाणे येते.

पुसा बसंती (गोल्डन यलो जरसन जायंट): या जातीस १३५ ते १४५ दिवसात फुले येतात. झाडे ५९ से. मी. ऊंच व जोमदार वाढते. फुले पिवळ्या रंगाची असून ६ ते ९ से. मी. व्यवसायाची असतात. प्रत्येक झाड सरासरी ५८ फुले देते. कुंड्यात लागवड करण्यासाठी ही जात जास्त योग्य आहे.

एम. डी. यू.१
 या जातीची झाडे मध्यम उंचीची असतात. ऊंची ६५ से. मी. पर्यत वाढते. या झाडास सरासरी ९७ फुले येतात व ४१ ते ४५ मे. टन प्रती हेक्टर याप्रमाणे उत्पादन येते. फुलांचा रंग नारंगी असतो व ७ से. मी. व्यासाची असतात.

लागवड पूर्व तयारी
लागवडीपूर्व जमिनीची २ ते ३ वेळा खोलवर नांगरट, २ ते ३ वेळा फणणी करून जमीन स्वच्छ व भुसभुशीत करावी. त्यानंतर हेक्टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत मिसळून ५० किलो नत्र, २०० किलो. स्फुरद व २०० किलो पालाश लागवडीपूर्वीच जमीनीच पूर्णपणे मिसळून घ्यावे. व नंतर ६० से. मी. अंतरावर सरी वरंबे तयार करून घ्यावेत व त्यानंतर सर्यासची नाके तोडून पाणी देण्यासाठी  वाफे करून घ्यावेत.

लागवड
झेंडूची लागवड करताना ६० से. मी. अंतरावर घेतलेल्या सरीच्या मध्यभागी ३० से. मी. इतके दोन रोपांमधील अंतर ठेवून लागवड करावी. ६० X ३० से. मी. अंतरावर लागवड केल्यास हेक्टरी ४०,००० रोपे लागतात. लागवड करताना भरपूर पाण्यामध्ये व सायंकाळी ४ नंतर लागवड करावी. म्हणजे रोपांची मर होत नाही.

आंतरमशागत
लागवडीनंतर १५ दिवसांनी पहिली खुरपणी करावी. त्यावेळी नत्र खताचा दुसरा हप्ता ५० किलो प्रति हेक्टर याप्रमाणात द्यावा. लागवड केलेला वरंबा फोडून दुसऱ्या वरंब्‍यास माती लावावी व झाड मध्यभागी घ्यावे. त्याचवेळी रोपाचा शेंडा खुडावा म्हणजे झेंडूच्या रोपास भरपूर फांद्या फुटतात व उत्पादन चांगले येते.

खते
आफ्रिकन आणि फ्रेंच जातींसाठी शेणखत २५ ते ३० मे. टन प्रति हेक्टर याप्रमाणे तसेच १०० किलो नत्र, २०० किलो स्फुरद व २०० किलो पालाश याप्रमाणे खते दयावी. संकरीत जातींची लागवड करायची असल्यास प्रति हेक्टर नत्र २५० किलो, स्फुरद ४०० किलो याप्रमाणे लागवडीपूर्वीच जमिनीत पूर्णपणे मिसळून खते द्यावीन.

आंतरपीक घेतल्‍यास फायदा 
झेंडूच्या पिकामुळे जमिनीतील सूत्रकृमींचा (निमॅटोड) त्रास कमी होतो. महत्‍वाचे म्‍हणजे भाजीपाला आणि फळांच्या बागांमध्ये झेंडू हे आंतरपीक घेतल्यास निमॅटोडचा उपद्रव फार कमी होतो. फळझाडांच्या बागेतही सुरूवातीच्या काळात झेंडूची आंतरपीक म्हणून लागवड करता येते. झेंडूची लागवड तीन प्रकारे करता येते. यात झेंडूची स्वतंत्र लागवड, भाजीपाल्याच्या पिकात मिश्र पीक म्हणून आणि  फळबागांत आंतरपीक म्हणून झेंडूची लागवड करता येते. आपल्याकडील हवामानात झेंडूच्या पिकाला वर्षभर फुले येऊ शकतात म्हणूनच वर्षभरात केव्हाही झेंडूची लागवड करता येते. अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन, आकर्षक फुलांच्या सुधारित जातींमुळे झेंडूच्या पिकाची लागवड फायदेशीर होऊ लागली आहे. भरपूर मागणी, चांगला भाव, कमी खर्च आणि खर्चाच्या तुलनेत भरपूर उत्पदान यामुळे झेंडू पिकाच्या लागवड शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरत आहे. 

पीक संरक्षण (रोपवाटिका)
सुदृढ रोपे मिळवण्यासाठी वाफ्यातील रोपांवर उगवणीनंतर एका आठवड्याने कार्बन ड्रेझीम २० ग्रॅम किंवा कॅपटॉप २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. त्याचप्रमाणे अंतरप्रवाही कीटकनाशके व बुरशीनाशके यांच्या आठ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ फवारण्या द्याव्यात.

पाणी
हंगामी झेंडूचे पीक घेतले असल्यास पावसाचा ताण पडल्यास १-२ वेळा १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. हिवाळी हंगामातील पिकासाठी ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे व उन्हाळी हंगामासाठी ५ ते ७ दिवसांनी पाणी द्यावे. कळ्या लागल्यापासून फुलांची काढणी होईपर्यंत पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये.

पीक संरक्षण
झेंडू या पिकावर मावा, तुडतुडे, पांढरी माशी, लाल कोळी, नाग अळी, अळी, कटवर्म या किडींचा व करपा, मर या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी पुढीलपैकी कोणतेही एक किटकनाशक / बुरशीनाशक फवारावे. फवारणी करताना प्रत्येक फवारणीमध्ये ५ मी. ली. प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात स्टिकर्स मिसळावे.

फुलांची काढणी : 
झेंडूची फुले पूर्ण उमलेल्‍या आवस्थेत तोडावीत, सुरु होण्याचा कालावधी २. ५ ते ३ महिने, बाजारभावाचा अंदाज घ्यावा, झेंडूची फुले झाडावर ५ ते ६ दिवस टिकू शकतात.