Tue, Jun 25, 2019 15:08होमपेज › Bhumiputra › ओढा हरितगृह शेतीकडे...

ओढा हरितगृह शेतीकडे...

Published On: Sep 10 2018 10:03PM | Last Updated: Sep 10 2018 10:03PMपारंपरिक शेतीप्रमाणेच आता हरितगृह शेती करण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढतो आहे. याचे कारण यामध्ये उत्पादन वाढते आणि मालाची प्रत आणि दर्जाही सुधारतो. 
 

विठ्ठल जरांडे

लाकूड, बांबू, लोखंडी अँगल्स, अ‍ॅल्युमिनियमचे खांब या वस्तूंपासून सांगाडा तयार करायचा आणि त्यावर झाकण्यासाठी पारदर्शक पॉलिफिल्स किंवा प्लॅस्टिकचे आच्छादन म्हणून वापर करायचा. 

अशा रीतीने तयार झालेल्या बंदिस्त घरात आतील वातावरण पूर्णतः किंवा अंशतः नियंत्रित केले जाते आणि मशागतीची सर्व कामे आतील क्षेत्रातच केली जातात. यालाच हरितगृह शेती (ग्रीन हाऊस) म्हणतात. या घरात झाकलेल्या प्लॅस्टिक आच्छादनामुळे निवडक सूर्यकिरणांना आत प्रवेश दिला जातो आणि आतून बाहेर पडणारी उष्णता रोखली जाते. याशिवाय रात्री बाहेर पडणारा कार्बनडायऑक्साईड वायू आतच साठवून प्रकाश संश्‍लेषण प्रक्रियेत वाढ केली जाते. या शिवाय तापमान, आर्द्रता यांचेही नियंत्रण केले जाते. यामुळे उत्पादन वाढते आणि मालाची प्रत आणि दर्जाही सुधारतो.

ग्रीन हाऊसमुळे पिकांचे अति उष्णता, थंडी आणि अतिवृष्टी यापासून संरक्षण होऊन पिकांना आवश्यक असे वातावरण कृत्रिमरीत्या तयार करता येते. नियंत्रित हंगामाशिवाय इतर काळातही फळे, भाजी आणि फुले ही पिके घेता येतात. त्यामुळे बाजारपेठेतील मागणी आणि भाव याप्रमाणे पिकांची काढणी करता येते. वर्षभर बाजारपेठेत मालाचा पुरवठा करून योग्य मोबदला मिळवता येतो. विशेष म्हणजे लागवडीस अयोग्य आणि नापीक जमिनीवरही हरितगृह शेती करता येते. हरितगृहात संकरित बियाणे तयार करणे सोपे जाते आणि निर्यातीसाठी आवश्यक असलेले निकष पूर्ण करणारे पीक  उत्पादन घेता येते.