Wed, Jun 26, 2019 11:32होमपेज › Belgaon › आईसमोर मुलाचा नदीपात्रात बुडून मृत्यू

आईसमोर मुलाचा नदीपात्रात बुडून मृत्यू

Published On: Apr 23 2018 1:14AM | Last Updated: Apr 23 2018 12:41AMखानापूर : प्रतिनिधी

आई, बहीण व भावासोबत चादरी व अन्य कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या तरुणाचा पाय घसरल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना रुमेवाडी व असोगा या गावच्या सीमेवरील मलप्रभा नदीपात्रात घडली.
विक्रम रामू घाडी (वय 24, रा. रुमेवाडी) असे तरुणाचे नाव असून, आईसमोरच मुलाचा करुण अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्‍त होत आहे.सकाळी दहाच्या सुमारास घाडी कुटुंबीय घरातील अंथरुण व कपडे धुन्यासाठी हालात्रीच्या वरच्या बाजूला असलेल्या मलप्रभा पात्राकडे गेले होते. दुपारपर्यंत कपडे धुतल्यानंतर विक्रम हातपाय धुण्यासाठी नदीपात्रात उतरत होता, पण ओलसर दगडावरून पाय घसरल्याने तो खाली कोसळला. त्याच्या डोक्याला मार लागून तो पाण्यात बुडाला.

आजुबाजुच्या महिलांनी आरडाओरडा करताच बाजुच्या दोघांनी पाण्यात उडी घेऊन विक्रमचा शोध सुरु केला. बर्‍याच वेळानंतर पाण्याच्या तळाशी बेशुद्धावस्थेत विक्रम सापडला. त्वरित त्याला खानापुरातील सरकारी दवाखान्यात आणण्यात आले. मात्र तत्पूर्वीच तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले.विक्रम हा पुण्यातील खासगी कंपनीत कामाला होता. मित्राच्या लग्नासाठी चार दिवसाच्या सुट्टीवर तो गावी आला होता. रविवारी सायंकाळी तो परत कामावर जाणार होता. त्याच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. रात्री उशीरा रुमेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Tags : Belgaum,  young, man, drowning, river,  dies