Sat, Jul 20, 2019 13:39होमपेज › Belgaon › तिहेरी तलाक पद्धत हवीच!

तिहेरी तलाक पद्धत हवीच!

Published On: Feb 08 2018 1:43AM | Last Updated: Feb 07 2018 10:36PMनिपाणी ः प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या तिहेरी तलाक बंदी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ निपाणीत बुधवारी मुस्लिम समाजातील महिलांनी मोर्चा काढला.  शरियतच्या विरोधात असणार्‍या तिहेरी तलाक पद्धतीविषयक घेण्यात आलेला निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी करत तहसील कार्यालयात निवेदन सादर  करण्यात आले.  

जमियते उलेमा-ए-हिंद, ऑल इंडिया एकता फोरम यांच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला निपाणी अंजुमन मुस्लिम बोर्डिंग, भारत मुक्‍ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ यांच्यासह संपूर्ण निपाणीतील मुस्लिम मोहल्ल्यांनी पाठिंबा दिला होता. 

नेहरू चौक येथील जामा मशीद येथून मोर्चाला सुरूवात झाली.  मोर्चा नेहरू चौक, चाटे मार्केट, जुना मोटार स्टँण्ड, जुना पी.बी.रोड मार्गे, लोकमान्य टिळक उद्यानासमोरून विशेष तहसीलदार कार्यालयासमोर येऊन धडकला. याठिकाणी मुस्लिम महिलांनी मनोगत व्यक्‍त करून इस्लाम धर्मात स्त्रीला सर्वाधिक महत्व असून स्त्री ही कुटुंबाचे प्रतिनिधीत्व करते. तिला न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली सुरू असलेली इस्लामी कायद्यातील ढवळाढवळ कदापिही  सहन करणार नसल्याचे सांगून तिहेरी तलाक संदर्भात  करण्यात आलेला कायदा तात्काळ मागे घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. 

मोर्चाच्या संयोजकांनी पोलिस परवानगी घेऊनदेखील विशेष तहसीलदार कार्यालयात उपतहसीलदार नेमिनाथ गेज्जी गैरहजर राहिल्याने उपस्थितांनी त्याच ठिकाणी ठिय्या मांडून गेज्जी यांची प्रतीक्षा करून ते आल्यानंतरच निवेदन देणार असल्याची भूमिका स्वीकारल्याने येथील वातावरण तणावपूर्ण बनले.

दरम्यान, तहसीलदार न आल्याने सीपीआय किशोर भरणी, फौजदार  निंगनगौडा पाटील यांनी मोर्चेकरी महिलांची समजूत काढून निवेदन स्वीकारून संबंधित अधिकार्‍यांद्वारे वरिष्ठ पातळीवर पाठविण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर महिलांच्या हस्ते निवेदन किशोर भरणी यांच्याकडे सोपविण्यात आले.

सदर कायदा हा महिला आणि बालकांविरोधी तसेच समाजाच्या विरोधी झाला असून ते कायद्याचे उल्लंघन आहे. सदर कायद्यामुळे मुस्लिम महिलांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे यामधील महिलांविरोधी तरतूदी रद्द कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी हजारोंच्या संख्येने मुस्लिम महिला तसेच नागरिकांची उपस्थिती होती.