होमपेज › Belgaon › घरकुल मिळावे, एवढीच देवाकडे प्रार्थना

घरकुल मिळावे, एवढीच देवाकडे प्रार्थना

Published On: Apr 10 2018 1:16AM | Last Updated: Apr 09 2018 9:38PMबेळगाव : विठ्ठल नाईक

पती आणि मुलांचे छत्र हरपलेले... वर्षानुवर्षे शासनाचे घरकूल मिळण्यासाठी विनवणी... गावोगावी अनवाणी फिरुन उदरनिर्वाह... पाहुणे व नातेवाईकांकडेच आसरा.  ही व्यथा आहे निपाणीपासून चार पाच किमी अंतरावर असलेल्या पडलिहाळ माळभागावरील चंदाबाई डवरी या वृध्द महिलेची. आ. शशिकला जोल्‍ले व ग्रामपंचायतीने घरकूल मंजुरीचे आदेशपत्र देऊनही 70 वर्षीय चंदाबाई डवरी आजही घरकुलासाठी विनवणी करत असून हक्‍काचे घरकूल मिळावे एवढीच देवाकडे प्रार्थना करत आहेत.

गोरगरीब नागरिकांसाठी शासनातर्फे अनेक योजना राबविण्यात येतात. पण योग्य लाभार्थींना योजनांचा लाभ मिळणे दुर्मीळच. गेल्या 40 वर्षापासून पडलिहाळ येथील माळभागावर चंदाबाई डवरी ही वृध्द महिला वास्तव्यास आहे. पती आणि मुलांचे छत्र हरपलेल्या चंदाबाई हिला सध्या वास्तव्यासाठी स्वत:चे घरही नाही. तिचे पूर्वीचे घर कोसळले आहे. 

आ. शशिकला जोल्‍ले यांनी चंदाबाई डवरी यांना विधवा योजनेंतर्गत घरकूल मंजुरीचे आदेशपत्र दिले. लखनापूर पडलिहाळ ग्रुप ग्रामपंचायतीनेही चंदाबाई डवरी यांना घरकूल मंजुरीचे पत्र दिले आहे. पण चंदाबाई डवरीचा घरकूल मंजुरीचा अर्ज अक्रम सक्रममध्ये अडकून पडल्याने अद्याप घरकूल योजनेपासून त्यांना वंचित राहावे लागले आहे. नातेवाईक आणि पै पाहुण्यांचा आसरा घेऊन दिवसभर चुरमुरे विक्रीचा व्यवसाय करत पोटाची खळगी भरणार्‍या चंदाबाई डवरी यांच्या समस्येकडे लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष देऊन घरकूल मिळवून देण्याची गरज आहे. पण आजतागायत याकडे दुर्लक्षच झाले असून उघड्यावर जीवन जगणार्‍या चंदाबाई डवरीची व्यथा कोण समजून घेणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

शासनाच्या घरकूल योजनेचा लाभ भल्याभल्यांना मिळत आहे. पण योग्य लाभार्थीच शासकीय योजनेपासून वंचित राहात आहेत. आ. शशिकला जोल्‍ले व ग्रामपंचायतीने दीड वर्षापूर्वी चंदाबाई डवरी यांना घरकूल मंजुरीचे पत्र दिले आहे. पण अद्याप घरकूल न मिळाल्याने संतापजनक प्रतिक्रिया व्यक्‍त होत आहेत. आमदार, ग्रामपंचायत व  लोकप्रतिनिधींनी याकडे तात्काळ लक्ष देऊन चंदाबाई डवरी यांचा अर्ज निकालात काढत घरकूल बांधून देण्याची मागणी होत आहे.

चुरमुरे विक्रीच पोटाचा आधार
भल्या पहाटे उठून थोडेसे अन्‍न डब्यात घेऊन चालत परिसरातील दहा बारा गावे फिरुन चुरमुरे विक्री करणे. दुपारी डब्यातील चार घास कोठेही बसून खात सायंकाळपर्यंत चुरमुरे विकून गावी येणे. सायंकाळी पै पाहुणे आणि नातेवाईकांकडे राहून रात्र काढून पुन्हा सकाळी नित्याचा प्रवास सुरू होतो. आता  हक्‍काचे घरकूल मिळावे, एवढीच अपेक्षा असल्याचे मत चंदाबाई डवरी यांनी व्यक्‍त केले.

Tags :woman, prey, god, home,belgaon news