Tue, Apr 23, 2019 09:37होमपेज › Belgaon › विवाहितेचा पतीकडून खून

विवाहितेचा पतीकडून खून

Published On: Jul 19 2018 1:36AM | Last Updated: Jul 19 2018 12:02AMखानापूर : वार्ताहर

खानापूर शहरापासून जवळच बांबूच्या वनात विवाहितेचा खून झाल्याचे उघडकीस आले असून, त्याबद्दल तिच्या पतीवर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. इंद्रायणी ऊर्फ मनीषा मारुती गुरव (वय 22, रा. केंचापूर गल्ली, खानापूर)  असे मृत विवाहितेचे नाव आहे. ती बेपत्ता असल्याची तक्रार मंगळवारी (दि. 17) तिच्या आईने खानापूर पोलिसांत केली होती. बुधवारी तिचा  मृतदेह आढळल्यानंतर तिची आई चंद्राबाई मारुती कुसाळी यांनी आपल्या मुलीचा खून जावई मारुती गुरव यानेच केल्याची तक्रार दिली. त्यानुसार मारुतीवर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.

इंद्रायणीचा विवाह तीन वर्षांपूर्वी झुंजवाड (ता. खानापूर) येथील मारुती गुरवशी झाला होता. दरम्यान, सासरच्या लोकांकडून त्रास दिला असल्याच्या कारणावरून ती गेल्या वर्षभरापासून माहेरी राहत होती.  तिने पोटगीसाठी न्यायालयात खटला दाखल केला होता.  10 जुलै रोजी ती नातेवाईकांच्या लग्‍नाला जात असल्याचे घरातून सांगून गेली होती, पण रात्री उशिरापर्यंत घरी परतलीच नाही. बुधवारी दुपारी गुराख्यांना  इंद्रायणीचा मृतदेह बेळगाव-पणजी महामार्गशेजारील वासकर वाडीनजीकच्या बांबूवनात आढळला. मृतदेह पूर्णपणे सडून गेला होता. जवळच तिने घरातून घेऊन गेलेली छत्री आणि चप्पल पडले होते. तिच्या अंगावरील कपड्यांवरून तिच्या भावाने तिची ओळख पटविली.