पितृ पंधरवड्यात चक्क पांढरा कावळा दिसल्याने कुतूहल! (video)

Published On: Sep 18 2019 7:55PM | Last Updated: Sep 18 2019 7:57PM
Responsive image
कलघटगी (जि. धारवाड) : तालुक्यातील डुम्मवाड येथील तलावाच्या किनार्‍यावर पांढरा कावळा आढळून आला.


बेळगाव : प्रतिनिधी

कावळ्याचा रंग कोणता? असा प्रश्‍न विचारणार्‍यालाच हा काय प्रश्‍न झाला का? असे म्हणत कोणीही वेड्यात काढेल. कारण, कावळा म्हटला की तो काळाच हा निसर्गनियम आहे. परंतु, कावळा पांढरा देखील असतो हे स्पष्ट झाले असून, तसा तो डुम्मवाड (ता. कलघटगी, जि. धारवाड) येथील तलावाजवळ नुकताच आढळून आला. 

झूट बोले कव्वा काटे, काले कव्वे से डरियो... असे गाण्यात देखील म्हटले आहे म्हणजे कावळा काळाच असतो, हे प्रत्येकासह गीतकारांनीही मान्य केले आहे. परंतु, तोच कावळा जर पांढरा निघाला तर त्याबद्दल कुतूहल निर्माण होणे साहजिकच आहे. कलघटगी तालुक्यातील डुम्मवाड गावाजवळ नीरसागर नावाचा तलाव आहे.
 
या ठिकाणी कावळ्यांचा थवा बसलेला असताना त्यामध्ये एकच कावळा पांढरा दिसत होता. पाहणार्‍यांना आधी ते कबूतर असेल, असेच वाटले. परंतु, ते जर कबूतर असेल तर इतर कावळे त्याला मिसळून कसे घेतील? असाही प्रश्‍न उपस्थित झाला. तेव्हा हा कावळाच असल्याची खात्री झाली. 

पांढरा कावळा दिसल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले. सध्या पितृ पंधरवडा असल्याने हा विशेष कावळा आलेला आहे, काही तरी संकटाची चाहुल असली तर कावळा असा रंग बदलतो, अशा अनेक चर्चा सुरू होत्या. परंतु, या चर्चेवेळीही अनेकांनी  या कावळ्याचे फोटो घेतले शिवाय व्हिडिओ शुटिंग देखील केले. या कावळ्याची चोच व पाय काहीसे काळसर जाणवतात. परंतु, त्याचे पंख व शरीर पांढरे आहे. सध्या सुरू असलेला पितृ पंधरवडा व अशावेळी दिसलेला हा पांढरा कावळा यामुळे त्याला पाहण्यासाठी अनेकजण गर्दी मात्र करताना दिसत होते.