Sun, May 26, 2019 19:53होमपेज › Belgaon › शहर स्मार्ट, पाणी मुबलक, पुरवठा ३ दिवसांआड

शहर स्मार्ट, पाणी मुबलक, पुरवठा ३ दिवसांआड

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 16 2018 8:56PMबेळगाव : श्रीकांत काकतीकर

बेळगाव शहराला पाणी देणार्‍या राकसकोप आणि हिडकल या दोन्ही जलाशयांमध्ये गेल्यावर्षीपेक्षा जास्त पाणीसाठा असला तरी पुरवठा मात्र तीन दिवसांतून एकदा होतो आहे. जलाशयातून  दररोज एकूण 24 एमजीडी पाणी पुरवठा केला जातो.दोन्ही जलाशयात मुबलक पाणी असल्याचा दावा कर्नाटक शहर पाणीपुरवठा मंडळातर्फे करण्यात येत आहे. मात्र, शहराच्या 48 प्रभागात तीन दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. शहराच्या पाणी पुरवठ्यात अडथळा ठरत असलेली पंपिंग यंत्रणा 17  वर्षे जुनी आहे. नव्या पंपिंग यंत्रेणेचा खर्च 40 कोटींवर पोहोचला आहे. 

बेळगावच्या पाणी पुरवठ्यात मोठा दुजाभाव झालेला दिसतो. 58 प्रभागांपैकी 48 प्रभागातील नागरिकांना तीन ते चार दिवसाआड पाणी पुरवठा तर उर्वरित 10 प्रभागांना 24 तास पाणी मिळते. 48 प्रभागातील 24 तास पाणी योजना रखडली आहे.त्यामुळे लघुपाणी पुरवठा योजनेचे पाणी वापरावे लागते. वर्षभराचा कर भरुन 48 प्रभागातील नागरिकांना वर्षातील 365 दिवसांपैकी 100 दिवसही नळाचे पाणी मिळत नाही.

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी राकसकोप आणि हिडकल जलाशयात पाण्याचा मुबलक पुरवठा आहे.दोन्ही जलाशयांकडून रोज शहराला 24 एमजीडी पाणी पुरवठा केला जात आहे. 24 एमजीडी मधील 6 एमजीडी पाणी हिंडलगा,कॅन्टोनमेंट,हिंडलगा कारागृह, केआयडीबी, टाटा पॉवर,24 तास पाणी योजनेचे 10 प्रभाग तसेच 22 खेड्यांना पुरविले जाते.
यापूर्वी लक्ष्मी जलशुध्दीकरण केंद्राद्वारे संपूर्ण शहराला पाणी पुरवठा केला जात असे. गेल्या वर्षी बसवणकोळ येथे नवे जलशुध्दीकरण केंद्र सुरु झाले.त्यामुळे लक्ष्मी टेकडी येथील केंद्रावरील जलशुध्दीकरण केंद्राचा भार कमी झाला. 

मात्र 24 कि.मी.अंतरावरील हिडकल जलाशयाकडून शहराकडे पाणी आणणारी पंपिंग स्टेशन यंत्रणा 17 वर्षे जुनी आहे. पाणी पुरवठयाचे काम वाढले तरी पंपिंग स्टेशनची यंत्रणा बदलण्यात आलेली नाही.हिडकलपासून शहरापर्यंत तीन ठिकाणी असलेली पंपिंग स्टेशनची कालबाह्य यंत्रणा बदलण्यासाठी सहा वर्षांपूर्वी हालचाली झाल्या.दोन वर्षांपुर्वी नव्या यंत्रणेसाठी 32 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव सरकारकडे पाठवीण्यात आला.तो प्रस्ताव बारगळल्याने नव्या यंत्रणेचा खर्च 40 कोटींवर पोहोचला आहे.नव्या यंत्रणेसाठी निवीदा बोलावण्यात आल्याचे आधिकार सांगतात. मात्र, प्रत्यक्षात नवी पंपिंग यंत्रणा केव्हा येईल याची कोणीच खात्री देत नाही.

बेळगाव स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट झाले, पण पाणी पुरवठा बे-हिशोबी बनला आहे.