Tue, Apr 23, 2019 14:21होमपेज › Belgaon › शहरवासीयांची भिस्त आता टँकरवर!

शहरवासीयांची भिस्त आता टँकरवर!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

बेळगावला पाणीपुरवठा करणार्‍या राकसकोप जलाशयामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन व जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढल्याने जलाशयाची पातळी घटत चालली आहे. हिडकल  जलाशयामधील पातळीही घटत असल्याने शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कर्नाटक शहर पाणीपुरवठा मंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी पाच दिवसातून एकदा पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील नागरिकांना तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. नागरिकांना पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने मनपाला या कालावधीत टँकर्सचा वापर करावा लागणार आहे. 

सध्या मनपाकडे दोन नवीन टँकर्स असले तरी शहरातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी मनपाला काही टँकर्स भाड्याने घ्यावे लागणार आहेत. यासंदर्भात महापौर बसाप्पा चिक्कलदिन्नी यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता ते म्हणाले, पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मागील वर्षी खोदाई केलेल्या 64 कूपनलिकांवर पाण्याची टाकी व विद्युत पंप बसवून पाणी उपलब्ध करून देण्याचा आदेश यापूर्वीच पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकार्‍यांना बजावलेला आहे. याशिवाय नागरिकांच्या मागणीनुसार टँकरने पाणीपुरवठा करण्याकरिता आम्हाला काही टँकर्स भाड्याने घ्यावे लागणार आहेत. 

तीव्र टंचाई असलेल्या भागामध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्याची ग्वाही महापौर चिक्कलदिन्नी यांनी दिली. कर्नाटक विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झालेली असली तरी पाणीपुरवठा अत्यावश्यक सेवा असल्याने त्यासंदर्भात आम्ही निवडणूक अधिकार्‍यांना समजावून सांगून योग्य व्यवस्था करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
सध्या राकसकोप जलाशयातील पाण्याची पातळी 2462.05 फूट इतकी असून मागील वर्षाच्या तुलनेने ती 7 इंचाने जास्त आहे. हिडकल जलाशयामध्ये सुमारे 14 टीएमसी इतके पाणी शिल्लक आहे. ते पाणी पिण्याच्या हेतूसाठी राखीव ठेवण्याची नितांत आवश्यकता आहे. यासाठी प्रादेशिक आयुक्त पी. ए. मेघण्णावर यांनी त्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी तातडीने अधिकार्‍यांची बैठक बोलावण्याची गरज आहे. यावर्षी पावसाने लवकर सुरुवात केली तर बेळगाव जिल्ह्यामध्ये तितकी पाणी समस्या जाणवणार नाही. परंतु मान्सूनला विलंब झाला तर शहरासह संपूर्ण जिल्ह्यालाच तीव्र पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. या समस्येची पाणी मंडळाने गंभीर दखल घेऊन पाच दिवसातून एकदा पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला असला तरी त्याची अंमलबजावणी काटेकोर करणे  अनिवार्य आहे.


  •