Fri, Jul 19, 2019 22:56होमपेज › Belgaon › जलवाहिनींकडे दुर्लक्ष, संसर्गजन्य रोगांत वाढ

जलवाहिनींकडे दुर्लक्ष, संसर्गजन्य रोगांत वाढ

Published On: Dec 15 2017 2:43AM | Last Updated: Dec 15 2017 12:48AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव शहरातील विविध ठिकाणी जलवाहिनी फुटण्याचे प्रकार सातत्याने घडत असून शिवाय दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याचेही आठळून आले आहे. केवळ दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याने भांदूर गल्ली, तानाजी गल्ली आणि ताशिलदार गल्ली याठिकाणी डेंग्यू आणि चर्मरोगाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. आरोग्यखात्याने याबाबत आपले हात झटकले असून ही जबाबदारी मनपा आणि पाणीपुरवठा महामंडळाची असल्याचे सांगितले आहे.

गत दोन महिन्यापासून भांदूर गल्लीसह तानाजी गल्ली, महाद्वार रोड या परिसरात ड्रेनेजलाईन फुटून दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत होता. यामुळे या परिसरातील नागरिकांना चर्मरोग व अन्य रोग झाल्याचे उघडकीस आले आहे. 

ड्रेनेज पाईपलाईनमधून बाहेर पडणार्‍या उघड्यावरील पाण्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांच्या संख्येत वाढ झाली आहे. यापूर्वीही मनपा जिल्हा प्रशासन आणि संबंधित नगरसेवक व नगरसेविकांना याची कल्पना देण्यात आली होती. मात्र, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी आंदोलन छेडण्यात आल्यानंतर भांदूर गल्लीतील नगरसेविका ज्योती चोपडे यांना नागरिकांनी जाब विचारला. दरवेळी प्रमाणे त्यांनी यावेळीही सोयीस्कररित्या उडवाउडवीची उत्तरे दिली. शिवाय आरोग्याधिकार्‍यांना सांगून आवश्यक ती उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, दोन दिवसांपासून कोणीही या भागात फिरकले नाही. 

भांदूर गल्ली, तानाजी गल्ली, ताशिलदार गल्ली हा परिसर उत्तर विधानसभा मतदारसंघात येतो. याबाबत आमदार फिरोज सेठ यांना कल्पना देण्यात आली असली तरी अद्यापही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना आंदोलन छेडले होते. 

नागरिकांनी छेडलेल्या या आंदोलनात प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. शहराच्या अन्य भागात 24 तास पाणीपुरवठा होत असताना आम्हाला तीन दिवसाआड सार्वजनिक नळाद्वारे पिण्याचे पाणी देण्यात येत आहे. शिवाय 24 तास पाणी पुरवठ्याच्या आश्‍वासनाकडेही दुर्लक्ष करण्यात येत आहे. सध्या सुरु असलेला पाणीपुरवठा दूषित असल्याने आम्ही जगावे की मरावे, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला.