Fri, Apr 19, 2019 11:56होमपेज › Belgaon › कुजणार्‍या कचर्‍यापासून खत निर्मिती

कुजणार्‍या कचर्‍यापासून खत निर्मिती

Published On: Jan 16 2018 2:08AM | Last Updated: Jan 15 2018 10:40PM

बुकमार्क करा
निपाणी : महादेव बन्‍ने

निपाणी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने 2018 पासून कुजणार्‍या कचर्‍यापासून खतनिर्मिती करण्याकडे लक्ष दिले जात आहे. त्यानुसार पट्टणकुडी हद्दीतील निपाणी पालिकेच्या कचरा साठवणूक प्रकल्पामध्ये याचे काम सुरु आहे.

रोज मोठ्या प्रमाणात कचर्‍याची निर्मिती होत असते. त्यांपैकी सुमारे 1 टन कुजणारा कचरा असतो. हा कचरा साठवून त्यावर योग्य प्रक्रिया केल्यास त्याचे खतामध्ये रूपांतर होऊ शकते. त्यामुळे या कचर्‍याची विल्हेवाट तर लागतेच शिवाय खताच्या निर्मितीमुळे पिकांच्या वाढीसाठी याचा उपयोग होऊ शकतो. त्यानुसार निपाणी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील सर्व हॉटेल तसेच खानावळींमध्ये शिल्‍लक असलेले अन्न, शहरातील भाजी मार्केटमध्ये साचलेला कचरा तसेच विविध फूल व्यापार्‍यांकडे शिल्लक राहिलेली तसेच कोमेजलेली फुले स्वच्छता वाहनांद्वारे गोळा केले जात आहे. यानंतर हा कचरा पट्टणकुडी हद्दीतील प्रकल्पामध्ये नेऊन ओतला जातो. तिथे त्यावर प्रक्रिया केली जात असून, साधारण 40 ते 45 दिवसांनंतर या कचर्‍याचे खतामध्ये रूपांतर होणार आहे. 

दैनंदिन सुमारे 800 किलोंपर्यंत हा कुजणारा कचरा पालिकेच्या वतीने शहरातून गोळा केला जातो. वरील ठिकाणांसह विविध कल्याण मंडप तसेच सांस्कृतिक भवनांमध्ये होणार्‍या कार्यक्रमानंतर शिल्‍लक राहिलेले अन्न उघड्यावर न टाकता ते पालिकेच्या स्वच्छता उठाव वाहनांकडे देण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे अशा कचर्‍यापासून निर्माण होणार्‍या दुर्गंधीवर आळा बसेल तसेच यापासून खत निर्मिती झाल्यामुळे त्याची विक्री झाल्यास पालिकेला यातून उत्पन्नदेखील मिळू शकेल. या नव्या वर्षापासून पालिकेने राबविलेल्या या उपक्रमास किती यश मिळते हे थोड्या दिवसानंतर तयार होणार्‍या खताच्या निर्मितीनंतर दिसून येणार आहे. मात्र पालिकेने घेतलेला हा पुढाकार पर्यावरण रक्षणाच्या द‍ृष्टीने निश्‍चितच स्वागतार्ह आहे.