Sun, May 26, 2019 13:02होमपेज › Belgaon › अमली पदार्थ विक्रीला आळा बसणार का?

अमली पदार्थ विक्रीला आळा बसणार का?

Published On: Jun 30 2018 1:15AM | Last Updated: Jun 29 2018 8:23PMबेळगाव : प्रतिनिधी

शहरात राजरोस सुरु असलेल्या अमली पदार्थ व्यवहाराला आळा घालण्याचे पोलिस प्रशासनासमोर आव्हान उभे ठाकले आहे.  तरुणपिढी व्यसनाधीन बनत आहे. त्यांना परावृत्त करण्याच्या उद्देशाने जागतिक अमली पदार्थविरोधी दिन रॅली काढण्यात आली.  शहरामध्ये अमली पदार्थ, गांजा विक्री राजरोस सुरू आहे. याबाबत तक्रार करून सुभाषनगर परिसरातील रहिवाशांनी पोलिस प्रशासनाला निवेदन दिले. यासंदर्भात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. पोलिसांकडून त्यानुसार तपास करून गांजा विक्री करणार्‍यांना ताब्यात घेतले आहे. विकत घेऊन नशा करणार्‍यांवरही कारवाई करण्यात  आली आहे. अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत असलेल्या तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात येत आहे. 

अमली पदार्थ विक्री करणार्‍यांसह ते विकत घेऊन नशा करणारेही तितकेच दोषी आहेत. यानुसार त्यांची वैद्यकीय तपासणी करून कारवाई करण्याची तरतूद कायद्यात आहे. एपीएमसीसह शहरातील आणखी काही पोलिस स्थानकांच्या हद्दीमध्ये अमली पदार्थांची नशा करणार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे. पदार्थ विक्री करणार्‍यांवरही आळा घालण्याचा प्रयत्न चालविला आहे. पोलिस आयुक्तांनी नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे. कोणत्याही परिसरात अमली पदार्थांची विक्री करण्यात येत असल्यास त्याची माहिती पोलिसांना देण्यात यावी. माहिती देणार्‍याचे नाव गुप्‍त ठेवण्यात येईल, असे पोलिस प्रशासनाने म्हटले आहे. 

कारवाई होऊनही शहरातील अनेक भागात अमली पदार्थांची विक्री कमी झालेली नाही. शिवाजीनगर परिसरातील काही भागात, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, रामदेव हॉटेल परिसर, आरपीडी सर्कल, कॅम्प परिसर, उद्यमबाग वसाहत आदी ठिकाणी गांजासह अमली पदार्थांची विक्री केली जात असल्याची चर्चा सुरू आहे. या भागामध्ये पोलिसांनी अधिक लक्ष देऊन विक्री करणार्‍यांवर आळा घातला पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या अमली पदार्थांच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिक्षणासाठी बाहेरून येणार्‍या उच्चभू्र कुटुंबातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लक्ष्य बनविले जात आहे. या परिसरात होणारी अमली पदार्थांची विक्री रोखणे पोलिसांसमोर आव्हान आहे.  

पोलिसांनी तपास लावून काही जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडील गांजाही ताब्यात केला आहे. असे असले तरी असे प्रकार पूर्णपणे थांबलेले नाहीत. पोलिस खात्याकडून विविध शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती देऊन जनजागृती केली जात आहे.  मात्र अनेक भागात अद्यापही गांजा व अमली पदार्थांची विक्री करणार्‍यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळणार का, असा प्रश्‍न शहरवासीयांतून उपस्थित करण्यात येत आहे.