Tue, Jul 23, 2019 10:31होमपेज › Belgaon › पालिकांसाठी ईर्ष्येने मतदान

पालिकांसाठी ईर्ष्येने मतदान

Published On: Sep 01 2018 1:45AM | Last Updated: Aug 31 2018 11:29PMबेळगाव : प्रतिनिधी

खानापूर, निपाणी, चिकोडी, संकेश्‍वरसह जिल्ह्यातील 14 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी शुक्रवारी ईर्ष्येने मतदान झाले. खानापुरात तर मतदानाचा टक्‍का गतवेळेपेक्षा वाढला असून, अनपेक्षित निकाल लागू शकतात. पण, जिल्ह्यात सर्वाधिक चुरशीच्या लढती असलेल्या निपाणी नगरपालिकेसाठी मतदानाचा टक्‍का घसरला. चिकोडी आणि संकेश्‍वर नगरपालिकांसाठीही चुरशीने मतदान झाले. सरासरी 74 टक्के मतदान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नेमका आकडा रात्री उशिरा जाहीर केला जाणार होता. मतमोजणी सोमवारी 3 सप्टेंबर रोजी होणार आहे.

निपाणीत गेल्या आठवड्यापासून प्रचाराच्या फैरी झडल्यानंतर शुक्रवारी  सकाळी 31 जागांसाठी 11 वाजेपर्यंत 25 टक्के, तर 1 वाजेपर्यंत 50 टक्के मतदान पूर्ण झाले होते. सर्वच वॉर्डांमध्ये मतदारांना मतदान केंद्रांवर आणण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ लागली होती. मतदारांना ने-आण करण्यासाठी वाहनांचाही  मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.

खानापूर नगरपंचायतीच्या 20 जागांसाठी शुक्रवारी शांततेत मतदान पार पडले. चुरशीची स्पर्धा, जंगी प्रचार आणि मातब्बरांच्या लढती यामुळे मतांची टक्केवारी वाढली. 14 हजार 60 मतदारांपैकी 10 हजार 818 जणांनी मतदान केले. 76.94 इतक्या मतदानाची नोंद झाली. 

चिकोडी नगरपरिषदेच्या  23 जागांसाठी अनुचित प्रकार न घडता मतदान पार पडले. 76.27 टक्के इतके मतदान झाले असून 80 उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. चिकोडी नगरपालिकेवर काँग्रेस की भाजपची सत्ता येणार हे सोमवारी कळेल. संकेश्‍वर नगरपालिकेसाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 72 टक्के मतदान झाले. इथे कत्ती आणि पाटील गटात चुरस आहे.

हुक्केरी नगरपरिषदेसाठी  शांततेत 74. 24 टक्के मतदान झाले. सकाळी 7 पासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात जमावबंदी असल्याने  उमेदवारांचे समर्थक दूरवर राहूनच आपल्या उमेदवाराला मत मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसत होते. 

जमखंडी नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान काही किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. येथील वॉर्ड क्रमांक 17 मधील सरकारी उर्दू शाळेच्या बूथमध्ये ओळखपत्र नसताना मतदान होत असल्याच्या कारणावरून बाचाबाची होताच पोलिसांनी लागलीच ओळखपत्र नसलेल्यांना केंद्राबाहेर काढले.