Sun, Aug 18, 2019 15:35होमपेज › Belgaon › भाजी विक्रेतीने दिली दिवसाची कमाई

भाजी विक्रेतीने दिली दिवसाची कमाई

Published On: Aug 23 2018 1:26AM | Last Updated: Aug 23 2018 12:35AMकेरळ पूरग्रस्तांना मदत : ‘जीएसएस’चा उपक्रम

केरळ पूरग्रस्तांना मदत जमा करताना जीएसएस बीसीए विद्यार्थ्यांना  माणुसकीची अनोखी कणव पाहावयास मिळाली. दिवसभर भाजी विकून जमा झालेली सारी कमाई त्या गरीब भाजी विक्रेतीने विद्यार्थ्यांकडे सुपूर्द केली. 

केरळ पूरग्रस्तांसाठी जीएसएस बीसीए विभागाच्यावतीने वेगवेगळ्या स्वरुपात मदत संकलित करण्यात येत आहे. याला नागरिकांतून चांगला प्रतिसाद लाभला. वडगाव परिसरातील भाजी विक्रेत्या महिलेबरोबर अन्य अनेक जणांनी कमाई विद्यार्थ्यांकडे सुपूर्द केली. यामध्ये पिण्याचे पाणी, वस्तू, धान्य, कपडे, औषधे आदींचा समावेश आहे. सदर वस्तू केरळला पाठविण्यात येणार आहेत.

गंगाधर दोडमनी, योगेश पवार,  अश्‍विनी लेंगडे, आनंद बडिगेर, श्रीनाथ ओब्बय्या, संतोष दरेकर, ममता पाटील यांच्याकडे विद्यार्थ्यांनी मदत सुपूर्द केली.मदत संकलनकार्यात लीड (देशपांडे फांउडेशन)च्या मार्गदर्शनाखाली बीसीए विभागाच्या प्रमुख प्रा. एस. व्ही. राऊत, प्राचार्य डॉ. एन. डी. हेगडे, प्रा. श्‍वेता देसाई, प्रियांका जोराक, प्रसाद खोडे, ज्योती कदम, स्नेहलता कांबळे आदी सहभागी होते. 

बबन भोबे मित्र मंडळातर्फे मदत

केरळ पूरग्रस्तांना बबन भोबे मित्रमंडळाच्यावतीने मदत देण्यात आली. सांबरा येथील विमान प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांच्याकडे बुधवारी मदत सुपूर्द करण्यात आली.

केरळमध्ये हजारो नागरिक बेघर झाले असून देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. भोबे मित्रमंडळाच्यावतीने केळकरबाग येथे विविध वस्तू देण्यात आल्या. यावेळी नंदू बागी, रमेश पवार, सुशीला महांतशेट्टी, विनायक खंडागळे, महादेव सुरेकर, बापू गवळी, महेश भादवणकर, राजेंद्र मुतकेकर, अजित शानभाग आदी उपस्थित होते. मित्रमंडळाच्यावतीने जमा करण्यात आलेला निधी सांबरा विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी पी. एस. देसाई, सुरेश नावी, अमरज्योती दास, सुभाष पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. 

मदतीच्या नावाखाली  फसवणुकीचा प्रकार?

बेळगाव : कोडगु  व केरळ पूरगस्तांना मदत देण्याच्या नावावर शहरात काही जण पैसे गोळा करीत असल्याचे  जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.  मदत गोळा करण्याचे निमित्त करून मंगळवारी सकाळपासून तरुणांचा गट फिरत होता. बस, रेल्वेस्थानक, व्यापारी संकुल, टोलनाके, सरकारी कार्यालयांचे आवारातून हातात डबा घेऊन मदत गोळा करत फिरत होते. याबाबत जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांच्याशी संपर्क साधता ते म्हणाले, मदत  गोळा करण्याचे काम संशयास्पद दिसून आल्यास संबंधितांना ताब्यात घेण्याची  सूचना पोलिस खात्याला करण्यात येईल.