Sun, Jul 21, 2019 08:34होमपेज › Belgaon › उचलली जीभ, लावली टाळ्याला!

उचलली जीभ, लावली टाळ्याला!

Published On: May 07 2018 2:01AM | Last Updated: May 07 2018 12:23AMबेळगाव : प्रतिनिधी

राज्यात सर्वत्र 17 व्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी सर्वच पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. या प्रचाराच्या गोंधळात राज्यातील व केंद्रातील आजी-माजी मंत्र्यांकडून मात्र बेताल वक्तव्य करण्यात येत आहेत.  ‘उचलली जीभ, लावली टाळ्याला’ असा प्रकार सुरू आहे. 

या सार्‍या प्रकारात केंद्रीय कौशल्य विकास मंत्री आणि कारवारचे खा. अनंतकुमार हेगडे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. राहुल यांच्यावर टीका करताना ना. हेगडे म्हणाले, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी ज्याप्रमाणे श्रवणबेळगोळला गोमटेश्‍वर भगवान बाहुबली हे विवस्त्र आहेत. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांनीही विवस्त्र श्रवणबेळगोळला जावे. त्यांच्या या बेताल वक्तव्याने समस्त जैन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्या वक्तव्याच्या निषेधासाठी विविध ठिकाणी बैठका होत आहेत. हेगडे यांच्या या टीकेबद्दल राज्याच्या राजकारणासह देशभर तीव्र खेद व्यक्त होत आहे. याबाबतच्या तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. औराद (जि. बिदर) येथील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचार सभेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपने दिलेल्या उमेदवारीबाबत टीका करताना म्हणाले, शोले चित्रपटातील गब्बरसिंग टोळीतील पात्रांशी मिळतेजुळते असणार्‍या नेत्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. 

माजी मुख्यमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांनीतर मतदारांबाबत वादग्रस्त वक्‍तव्य केले आहे. एम. के. हुबळी (ता. कित्तूर) येथील प्रचारसभेत येडियुराप्पा म्हणाले, ‘आता थांबू नका. कोणी मतदान करत नाहीत असे तुम्हाला वाटत असेल तर सरळ त्याच्या घरी जा. त्याचे हातपाय बांधा आणि मतदान केंद्रावर आणा.’ मतदानाचे महत्व सांगता सांगता येडियुराप्पांची जिभ घसरली. मात्र, अशा मोठ्या नेत्यांना वक्तव्याचे भान राखणे गरजेचे आहे.  उ.प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकार म्हणजे काँग्रेसचे एटीएम’ अशी  टीका केली.  राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केले आहे. मोदी यांना उद्देशून औराद येथील सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना प्रत्यूत्तर देताना पंतप्रधान म्हणून तुमची भाषा आहे ती शोभते का, असा सवाल केला 
आहे. 

पंतप्रधान मोदी यांच्याकडून खेद

कर्नाटकसह देशात भाजपच्या काही नेत्यांकडून बेताल वक्तव्य होत आहेत. अशा वक्तव्यामुळे देशातील अनेक समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. तर काही वक्तव्यामधून समस्त स्त्रियांचा अपमान होत आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेद व्यक्त केला आहे. बेताल वक्तव्य करणार्‍या आपल्या पक्षाच्या नेत्यांना आणि आजी माजी मंत्र्यांना त्यांनी कानपिचक्या दिल्या आहेत.