Thu, Jun 27, 2019 02:26होमपेज › Belgaon › दोन वर्षापूर्वीचे शौचालय पुन्हा सर्व्हेत 

दोन वर्षापूर्वीचे शौचालय पुन्हा सर्व्हेत 

Published On: Feb 06 2018 10:57PM | Last Updated: Feb 06 2018 10:50PMनिपाणी : प्रतिनिधी

निपाणी पालिकेचे कर्मचारी शहरात स्वच्छ भारत मिशन अभियान अंतर्गत वैयक्‍तिक शौचालयांची बांधकामे किती झाली आहेत, याचा सर्व्हे करीत आहेत. दोन वषार्ंपूर्वी वॉर्ड 8 मधील नागरिक मोतीलाल निंगाप्पा माने यांनी वैयक्‍तिक शौचालयाकरिता अर्ज करूनही त्यांचा अर्ज त्यावेळी मंजूर झाला नव्हता. म्हणून माने यांनी स्वखर्चाने शौचालय बांधले. पालिका कर्मचार्‍यांनी टार्गेट पूर्ण करण्यासाठी माने यांचा शौचालयासमोर उभारून फोटो काढल्याचा आरोप नगरसेविका नीता लाटकर यांनी केला.

शौचालय बांधल्यावर स्वच्छ भारत मिशन अभियान  योजनेतून पालिका 5 हजार 333 रु.चे अनुदान देते. अनेक नागरिकांनी स्वखर्चाने शौचालये बांधली असताना त्यांचे अनुदान कोण घेणार की ते लाटले जाणार, असा सवालही लाटकर यांनी उपस्थित केला. रविवारची सुट्टी न घेता पालिकेचे कर्मचारी अभियान राबवित आहेत. यातून अनुदान लाटण्याचा तर प्रकार होत नाही ना अशी शंका लाटकर यांनी उपस्थित केली.

यासंदर्भात आरोग्य निरीक्षक विवेक बन्ने म्हणाले, वैयक्‍तिक शौचालयासाठीचे अर्ज ऑनलाईन घेतले जातात. शौचालयाचे बांधकाम लाभार्थ्याने सुरू केल्यावर पहिला हप्‍ता 2666 रु. दिला जातो. बांधकाम पूर्ण झाल्यावर उर्वरित 2667 रु. दिले जातात. माने यांनी अर्ज केल्यावर स्वतः शौचालय बांधले आहे, असे पालिकेला कळविलेले नाही. आता शहरात अभियान 100 टक्के यशस्वी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सर्व्हेमध्ये त्यांच्यासह 10 ते 15 टक्के नागरिकांनी बांधकाम पूर्ण केल्याचे आढळून आले आहे. त्यांना अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये शंका घेता येणार नाही.

शहरात 2011 साली 11 हजारवर घरे होती तर 14 हजार 94 कुंटुंबे होती. 1381 कुटुंबांकडे शौचालये नव्हती. आता 520 जणांनी बांधकाम पूर्ण केले असून 108 जणांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे.2019 पर्यंत हागणदारीमुक्‍त भारत करण्याचे उद्दिष्ट आहे.