Fri, Jul 19, 2019 07:07होमपेज › Belgaon › दोन शाळकरी बहिणींच्या अपहरणाचा प्रयत्न

दोन शाळकरी बहिणींच्या अपहरणाचा प्रयत्न

Published On: Apr 16 2018 1:38AM | Last Updated: Apr 16 2018 1:26AMबेळगाव : प्रतिनिधी

दोन शाळकरी अल्पवयीन बहिणींचे तिघांनी अपहरण करून त्यांच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना रामदुर्ग तालुक्यात घडली आहे. मुलींच्या मामाने अपहरणकर्त्यांचा पाठलाग करून मुलींना सोडवून आणले. याप्रकरणी तिघांविरुद्ध रामदुर्ग पोलिसांत तक्रार झाली आहे.

गेल्या मंगळवारी हा प्रकार घडला. रिक्षाचालक असलेला मल्‍लेशी तळवार, फकिरगौड पाटील, श्रीनिवास शिवनगौडा पाटील (तिघेही रामदुर्ग तालुका) अशी संशयित अपहरणकर्त्यांची नावे आहेत. 

पोलिस तक्रारीनुसार ः दोन शाळकरी बहिणी शाळेत निकाल पाहण्यासाठी रामदुर्गला गेल्या होत्या. त्या परत येत असता त्यांच्या गावाकडे जाणार्‍या रिक्षाचालकाने त्यांना ‘गावाला जात आहे. येता का’ असे विचारून रिक्षात बसवून घेतले. रिक्षात  चालकाचे दोन साथीदार आधीच बसलेले होते. मुली रिक्षात बसताच चालकाने रिक्षा गावाकडे न नेता दुसरीकडे वळवला. इतक्यात त्याच रस्त्याने दुचाकीवरुन मुलींचा मामा जात होता. त्याला पाहून मुलींनी आरडाओरडा केला. भाचींचा आवाज ऐकलेल्या मामाने रिक्षाचा  पाठलाग सुरूच ठेवला आणि रिक्षापर्यंत पोचला. घाबरलेल्या अपहरणकर्त्यांनी मुलींनी तेथेच सोडून पळ काढला.