Fri, Jul 19, 2019 13:44होमपेज › Belgaon › चोरट्यांचे निपाणी पोलिसांना खुले आव्हान

चोरट्यांचे निपाणी पोलिसांना खुले आव्हान

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

निपाणी : मधुकर पाटील 

गेल्या दोन महिन्यांत निपाणी शहर, उपनगरांसह ग्रामीण भागातील गावात 30 हून अधिक घरे फोडून चोरट्यांनी निपाणी पोलिसांना आम्हाला पकडून दाखवाच, असे खुले आव्हानच दिले आहे. चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लांबविला. विरोध करणार्‍यांना मारहाण केली. चोरीच्या सत्रामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

घर बंद करून बाहेर जायची सोय राहिलेली नाही, अशा दहशतीखाली सर्वजण जगत असताना पोलिसांना चोरट्यांचा माग लागलेला नाही. चोरींचा सिलसिला सुरूच राहिल्यास पोलिसांचे अस्तित्व आणि दरारा संपण्याची भीती आहे. निपाणी हे राष्ट्रीय महामार्गालगत आणि सीमाभागातील एक प्रमुख व्यापारी केंद्र आहे. यामुळे स्थानिक व आंतरराज्य चोरांच्या टोळ्या निपाणीच निवडतात. पण येथील चार पोलिस स्थानकांच्या माध्यमातून शंभरहून अधिक पोलिस घेऊन काम करणार्‍या पोलिसांना एकही चोर सापडत नाही, याचे आश्‍चर्य  व्यक्‍त होत आहे.

चोरीचा सिलसिला दोन महिन्यांपूर्वी श्रीनगरातील एका घरातून 10 तोळे सोने व लाखोची रोकड लुटल्यापासून सुरू झाला. शनिवारी रात्रीपर्यंत तो असाच सुरू राहून चोरट्यांनी बिरोबानगर परिसरातील तीन घरे साफ केली. शेजारच्या घरात काय चाललेय हे पाहावयास कुणाला वेळ नाही. त्याचादेखील हा परिणाम आहे. निपाणी सर्कलमधील 58 गावांसाठी 160 पोलिसांची गरज असताना केवळ 100 पोलिस काम करताहेत. समाजानेसुद्धा सहकार्य पोलिसांना केल्यास गुन्हेगारीला आळा बसू शकतो.

दोन महिन्यांपासूनच्या घटनांवर नजर टाकल्यास काही कारणास्तव पोलिस इतरत्र ड्युटीवर गेल्यावरच चोरट्यांनी डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ चोरच पोलिसांच्या पाळतीवर आहेत असा होतो. चोर्‍या करून जाताना दरोडेखोर एकही पुरावा मागे ठेवत नाहीत. पोलिसांना ते सापडत नाहीत किंवा त्यांचा सुगावा लागत नाही. यावरून चोरांची यंत्रणा पोलिसांपेक्षा सरस आहे.

चोरीचे घाणेरडे प्रकार...

डोळ्यांत चटणी पूड टाकून, समुपदेशन करून, पोलिस असल्याचे सांगून, पुढे दंगा सुरू असल्याचे फसवून चोर्‍या होत असल्याचे ऐकावयास मिळत होते. आता चोर अंगावर घाण टाकून लुबाडण्याचे वेगवेगळेे फंडे अवलंबत आहेत. दुचाकी चोरी म्हणजे लहान मुलांच्या खेळण्याचा प्रकार झाला आहे. यामुळे निपाणीत दार बंद करून घरात बसलेले बरे, अशी मानसिकता नागरिकांची होत आहे.