Thu, Apr 18, 2019 16:00होमपेज › Belgaon › दोन विद्यार्थिनींसाठी ‘तो’ ठरला तारणहार

दोन विद्यार्थिनींसाठी ‘तो’ ठरला तारणहार

Published On: Jul 21 2018 1:30AM | Last Updated: Jul 21 2018 12:28AMबेळगाव : प्रतिनिधी

एक विद्यार्थिनी बुडाली.. तिला वाचवण्याचा प्रयत्नही झाला.. तो अयशस्वी ठरला..पण दोन विद्यार्थिनींचे जीव वाचवण्यात त्या युवकाला यश आले..त्या युवकाचे नाव आहे मनोज धामणेकर. त्या दोन विद्यार्थिनींसाठी तो जणू जीवरक्षक ठरला. त्याच्या या धाडसाची दखल प्रशासनाने घेण्याची गरज आहे.तिलारी धबधब्यात गुरुवारी सुप्रिता गाळी या युवतीचा बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी तिचा मृतदेह सापडला. गाळी कुटुंबाला या घटनेने प्रचंड धक्‍का बसला आहे. पण या दुर्घटनेत एकाच बळीवर निभावले, अन्यथा तीन बळी गेले असते, हे आता स्पष्ट झाले आहे. 

बेळगावातील गोगटे कॉमर्स कॉलेजच्या तिसर्‍या वर्गात शिकणार्‍या  दहा मुली गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तिलारीनगर परिसरात वर्षा पर्यटनासाठी गेल्या होत्या. मुख्य धरणाजवळ असणार्‍या ‘अडक्याचा वझर’  धबधब्यानजीक उतरून काही मुली मौजमजा करत होत्या. त्यावेळी दगडावरील निसरडीमुळे तिघींचा तोल जाऊन त्या धबधब्यात कोसळल्या.तिघी मुली पाण्यात कोसळताच इतर मैत्रिणींनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. 

मनोज धामणेकर हा कुद्रेमाणी गावचा युवक पर्यटनासाठीच  आपल्या मित्रासह धबधबा परिसरात गेला होता. त्याने मुलींचे ओरडणे ऐकून अंगातील कपड्यांसह धबधब्यात उडी घेतली आणि बुडणार्‍या दोन युवतींना त्याने वाचविले. मात्र, सुप्रिताला तो वाचवू शकला नाही. मनोज धामणेकर शिनोळी येथील औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात कामाला आहे. त्याने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे दोन युवतींचे जीव वाचले. मनोजने कपड्यांनिशी धबधब्यात उडी घेतली. त्यामुळे त्याच्या खिशातील पैसे भिजले, तर मोबाईल नादुरुस्त झाला आहे. 

मृृत्यूमुळे घाबरला मनोज

मनोजला दोन मुलींना वाचविण्यात यश मिळाले. मात्र, एक मुलगी बुडाली. यामुळे तो प्रचंड घाबरला होता. भीतीने थरथरत होता. पाटबंधारे खात्याच्या कर्मचार्‍यांनी त्याला तुडये येथील त्याच्या नातेवाईकाकडे पाठविले. तेथून तो रात्री नऊ वाजता घरी परतला. भीतीने माहिती देण्यास तो नकार देत होता. शुक्रवारी सकाळी त्यानेच घटनेची सविस्तर माहिती ग्रामस्थांना दिली. तसेच एक व्हिडिओही पुरावा म्हणून सादर केला आहे. त्याआधी त्या विद्यार्थ्यांनीही ही माहिती पोलिसांना दिली होती.