Sun, Feb 17, 2019 23:31होमपेज › Belgaon › दोन बालमित्रांचा विहिरीत अंत

दोन बालमित्रांचा विहिरीत अंत

Published On: May 25 2018 1:08AM | Last Updated: May 24 2018 11:42PMसंबरगी : प्रतिनिधी

जीवलग असलेल्या दोन बालमित्रांचा विहिरीत  अंत झाल्याची हृदयद्रावक घटना कोकटनूर-ऐगळी रस्त्यावरील तळवार-मडीवाळ वसाहतीत गुरुवारी सकाळी घडली. परिसरात हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे.खेळता खेळता खुल्या विहिरीत डोकावून पाहताना तोल जाऊन हे मित्र बुडाले. कोकटनूर गावाच्याबाहेर ऐगळी रस्त्यावर ही दोन कुटुंबे वास्तव्यास आहेत. वसाहतीतील  अभिषेक बसवराज मडीवाळ (वय 6) आणि आदेश सुभाष तळवार (वय 5) ही एकाच तारखेला जन्माला आलेली मुले एकाच वर्गात शिकत होती. वेगवेगळ्या जातीतील असली तरी बालवयातच ते जीवलग मित्र झाले होते.

गुरुवारी त्यांचे आई-वडील कामाला गेल्यानंतर दोघेही खेळण्यासाठी घराबाहेर गेले. खेळताना विहिरीकडे गेल्यानंतर किती पाणी आहे, हे डोकावून पाहताना तोल जाऊन विहिरीत बुडाले. बराच वेळ होऊनही मुले परत न आल्याने पालकांनी शोधाशोध चालवली. संशय आल्याने त्यांनी विहिरीत पाहिले. आदेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला,  पण अभिषेकचा मृतदेह विहिरीत अडकल्याचे आढळल्याने तो काढण्यासाठी अग्‍निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यांनी मृतदेह बाहेर काढला.

बालकांच्या मृत्यूमुळे दोन्ही कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून गावातील सर्व दुकाने आणि व्यवहार बंद ठेवून दुखवटा पाळण्यात आला.अथणी डीवायएसपी रामाण्णा बसर्गी यांच्या नेतृत्वाखाली ऐगळी पीएसआय एच. डी. मुल्‍ला, सीपीआय महादेव शिरहट्टी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.झुंजरवाड येथे दोन वर्षांपूर्वी बोअरमध्ये पडून बालकाचा तर विहिरीत पडून दोन बालकांचा मृत्यू झाला होता.