Tue, Jul 23, 2019 11:06होमपेज › Belgaon › ट्रकची दुचाकीला धडक, दोन तरुण ठार

ट्रकची दुचाकीला धडक, दोन तरुण ठार

Published On: Mar 14 2018 12:52AM | Last Updated: Mar 14 2018 12:52AMठारखानापूर : प्रतिनिधी

बेळगाव-खानापूर महामार्गावरील वासकरवाडी क्रॉसनजीक भरधाव ट्रकने समोरुन येणार्‍या दुचाकीला उडविल्याने सिंगीनकोप (ता. खानापूर) गावचे दोन तरुण जागीच ठार झाले. गिराप्पा बसवाणी पाटील (25) आणि दयानंद फकिरा पाटील (17) अशी दुर्दैवी तरुणांची नावे आहेत. 

सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर पलायन करणार्‍या ट्रकला तब्बल 30 किमी अंतरावर बिडीनजीक पकडण्यात नंदगड पोलिसांना यश आले.सिंगीनकोपमध्ये मंगळवारपासून पांडुरंग नामसप्ताह आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त घरचा बाजार आणण्याकरिता गिराप्पा व दयानंद सायंकाळी खानापूरला आले होते. बाजार आटोपून दुचाकीवरुन घरी परतत असताना वासकरवाडी क्रॉसनजीक समोरुन येणार्‍या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ट्रकच्या धडकेने दोघेही उडून रस्त्याच्या बाजूला फेकले गेले.

अपघातानंतर ट्रकचालकाने वाहनासह पलायन केले. याबाबत रस्त्यावरुन जाणार्‍या प्रवाशांनी खानापूर पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार नंदगड व लोंढा येथील पोलिसांना वाहनांची तपासणी करण्याचे आदेश देऊन पोलिस निरीक्षक मोतीलाल पवार व उपनिरीक्षक संगमेश होसमणी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान आ. अरविंद पाटील यांनीही अपघातस्थळी भेट देऊन पोलिसांना सहकार्य केले.
घटनास्थळावरुन मृतदेह खानापुरातील शवागारात हलविण्यात आले. बिट सदस्यांच्या मदतीने बिडी विभागाचे बिट पोलिस संजू अंकलगी यांनी तासाभरातच बिडी सर्कलमध्ये ट्रक अडवून चालकाला ताब्यात घेतले.

दयानंद हा इदलहोंडमधील दमशि मंडळाच्या पदवीपूर्व महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिकत होता. सोमवारीही तो खानापूरला येऊन पेपर देऊन गेला होता. त्याच्या पश्‍चात आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे.  गिराप्पा याच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे. 
पारायण सोहळा लांबणीवर
पारायण सोहळ्याच्या तयारीत सारे ग्रामस्थ मग्न असताना सोमवारची रात्र काळरात्र ठरल्याने उत्सवाच्या रात्री गावावर दु:खाची छाया पसरली आहे. त्यामुळे पारायण सोहळाही पुढे ढकलण्यात आला.