Tue, Jul 16, 2019 12:27होमपेज › Belgaon › निपाणीत दोन दाम्पत्यांना महामार्गावर अपघात

निपाणीत दोन दाम्पत्यांना महामार्गावर अपघात

Published On: Feb 01 2018 1:42AM | Last Updated: Jan 31 2018 11:47PMनिपाणी : प्रतिनिधी

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर  संकेश्‍वर हद्दीतील नांगनूर क्रॉसवर ट्रकने दुचाकीला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात निजगौंडा सत्यगोंडा पाटील (वय 51) व विद्या निजगौंडा पाटील (46, मूळ गाव खणदाळ, ता. गडहिंग्लज, सध्या रा. संकेश्‍वर) हे दाम्पत्य जागीच ठार झाले.

अपघात बुधवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास झाला. घटनेची नोंद संकेश्‍वर पोलिसांत झाली असून पोलिसांनी दुचाकीस धडकून पसार झालेल्या ट्रकचा क्रमांक अन्य वहानधारकांकरवी टिपून पुढील तपास चालविला आहे. 

निजगौंडा हे माजी सैनिक असून ते पत्नी व आपल्या दोन मुलांसह संकेश्‍वर येथील क्वळ्ळी प्लॉटमध्ये रहावयास आहेत. दुपारी पाटील दुचाकीवरून यमकनमर्डी येथे दवाखान्याला गेले होते. परतत असताना त्यांना मागून येणार्‍या ट्रकने जोरात धडक दिली.

कोगनोळीजवळ पत्नीचा मृत्यू, पती गंभीर

कोगनोळी फाट्यानजीक आयशर वाहनाची धडक बसून दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली. नकुशी गजानन पाटील (वय 45, रा. शंकरवाडी, ता. कागल) असे तिचे  नाव आहे. पती गजानन नाथा पाटील (50) गंभीर जखमी आहेत. अपघात बुधवारी दुपारी एकच्या सुमारास झाला.

गजानन पत्नी नकुशी यांना घेऊन कागलकडे दुचाकीवरून जात होते. कोगनोळी फाटा ओलांडून ते पुढे गेले असता,  मागून येणार्‍या आयशरने धडक दिली. नकुशी यांचे डोके रस्त्यावर आपटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर गजानन गंभीर जखमी झाले. त्यांना निपाणीच्या म.गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आयशरचालक फरार आहे. पोलिस निरीक्षक निंगनगौडा पाटील यांनी 
पंचनामा केला.