Fri, Apr 26, 2019 04:11होमपेज › Belgaon › एकेका कुटुंबाला दोन बीपीएल कार्डे

एकेका कुटुंबाला दोन बीपीएल कार्डे

Published On: Jan 30 2018 11:14PM | Last Updated: Jan 30 2018 10:55PMबेळगाव : प्रतिनिधी

यमकनमर्डी मतदारसंघातील अनेक कुटुंबांना अन्‍न व नागरी पुरवठा खात्याने दोन-दोन बीपीएल कार्डे दिल्याची तक्रार खुद्द आ. सतीश जारकीहोळी यांनी जि.पं. सभागृहामध्ये सोमवारी झालेल्या कर्नाटक विकास कार्यक्रमाच्या बैठकीत करून चौकशीची मागणी केली.

आ. जारकीहोळी यांच्या  गंभीर आरोपामुळे जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला, जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन व अन्‍न आणि नागरी पुरवठा खात्याच्या उपसंचालिका बळ्ळारी यांच्यामध्ये खळबळ माजली. अन्नभाग्य योजनेचा लाभ सरकारी सुविधेपासून वंचित असलेल्या कुटुंबांना मिळवून द्या, अशी मागणीही आ. जारकीहोळी यांनी केली. 

यमकनमर्डीमध्ये एकाच कुटुंबाला दोन-दोन बीपीएल कार्डे असतील तर जिल्ह्यामध्ये तशी प्रकरणे किती असतील, त्याची कल्पना करा. तशा सुविधेचा लाभ घेणार्‍या कुटुंबांवर फौजदारी कारवाई करावी, असे आ. जारकीहोळी म्हणाले.

या दुप्पट बीपीएल कार्डांचा वापर करणार्‍यांचा शोध घेण्याचा आदेश जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांनी अन्न व नागरीपुरवठा खात्याच्या अधिकार्‍यांना बजावला आहे.

अनुसूचित जाती/जमातीसाठी असलेल्या कल्याण योजनेमध्येही लाभ घेणार्‍या त्याच त्या लाभार्थींची अनेक ठिकाणी नावे समाविष्ट असतात. यावरून खर्‍या गरजू व योग्य लाभार्थींना योजनांपासून वंचित राहावे लागते. सरकारी योजनांचा लाभ सर्व गरजूंना व दुर्बलांना मिळाला पाहिजे. सरकारी निधीचा सदुपयोग करून दारिद्य्र निर्मूलनाचा कार्यक्रम सरकारी अधिकारी व लोकप्रतिनिधींनी अमलात आणला पाहिजे. जिल्ह्यामधील गोकाक व रामदुर्ग तालुक्यामध्ये सरकारकडून पीक नुकसान भरपाई दिलेल्या योजनेमध्येही कोट्यवधी रु. चा भ्रष्टाचार व दुरुपयोग झाल्याची प्रकरणे उघडकीला आलेली आहेत. रामदुर्ग तालुक्यातील अनेक महसूल खात्याच्या अधिकार्‍यांवर त्या प्रकरणी सरकारने चौकशी करून कारवाईही केलेली आहे.