Sun, Feb 23, 2020 09:06होमपेज › Belgaon › खानापूर : करंबळला साकारतोय ‘ट्री पार्क’

खानापूर : करंबळला साकारतोय ‘ट्री पार्क’

Published On: Feb 02 2018 11:44PM | Last Updated: Feb 02 2018 11:25PMखानापूर : वासुदेव चौगुले

हिरव्यागार वातावरणात निसर्ग निरीक्षणाचा छंद जोपासणार्‍यांना जंगल पदभ्रमंती आणि निसर्ग सानिध्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी खानापूर वनविभागाने नवे पाऊल उचलले आहे. शहरापासून अवघ्या दोन कि. मी.  वर असणार्‍या करंबळच्या धोंडदेव डोंगरात शंभर एकर जागेत ट्री-पार्क उभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे शहराच्या हरित वैभवात  भर पडणार आहे.

भीमगड संरक्षित अभयारण्यामुळे निसर्गप्रेमींची पावले खानापूरच्या जंगलाकडे वळू लागली आहेत. मात्र, संरक्षित जंगलामुळे ट्रेकिंग व निसर्गपर्यटनावर निर्बंध येत असल्याने यावर उपाय म्हणून नागरिकांना पायीदेखील चालत जाता येईल, अशा ठिकाणी ट्री पार्क उभारण्याचा प्रस्ताव राज्य वनविभागाकडे पाठविला होता.  या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून कामाला सुरुवात झाली आहे.

ट्री पार्कला भेट देण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना वनस्पती निरीक्षण, डोंगरावरील मनोहारी नजारे तसेच ट्रेकिंगचा आनंद घेता यावा, यासाठी पायाभूत सुविधादेखील पुरवण्यात येणार आहेत.  निवारा शेड, स्वच्छ पाणी, बैठक व्यवस्था, फूड कोर्ट, पार्किंग, पॅरागोला आदी सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

खानापूरचे एसीएफ सी. बी. पाटील आणि आरएफओ एस. एस. निंगाणी यांच्या कल्पकतेतून संकल्पना साकारत आहे. जिल्हा वनाधिकारी एम. अमरनाथ यांनी भेट देऊन ट्री पार्कसाठी निवडलेल्या ठिकाणाला नैसर्गिक जंगलाचे स्वरुप देण्याची सूचना केली आहे. सध्या याठिकाणी तीन ते चार कि. मी. लांबीचा डोंगराला वळसा घालणारा ट्रेकिंग पाथ तयार केला आहे. याचा लाभ शालेय विद्यार्थ्यांनाही घेता येणार आहे. डोंगरावर असणार्‍या दगडाच्या नैसर्गिक बांधणीचा उपयोग करून आकर्षक रुप देण्यात येणार आहे. लहान मुलांना खेळांची सोय तसेच पायथ्याशी वाहन पार्किंगची सोय केली जाणार आहे. महामार्गावरून जाणार्‍या पर्यटकांना आकर्षण वाटावे, या उद्देशाने आकर्षक कमान उभारण्यात येणार आहे.

दोन ते तीन तासांच्या निसर्ग सफरीत खानापूरच्या जंगलाचे वैविध्य आणि अनोखेपण अनुभवता यावे, शालेय अभ्यासक्रमातील विषय विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात शिकता यावेत, यादृष्टीने ट्री पार्क विद्यार्थ्यांना उपयोगी पडणार आहे. त्याचबरोबर निसर्गसौंदर्याची याठिकाणी पर्यटकांना लयलूट करता येणार आहे.