Mon, Jul 22, 2019 04:40होमपेज › Belgaon › आता रेल्वेलाईनवरील वृक्षसंपदेवर कुर्‍हाड!

आता रेल्वेलाईनवरील वृक्षसंपदेवर कुर्‍हाड!

Published On: Apr 11 2018 1:34AM | Last Updated: Apr 11 2018 12:22AMखानापूर : वासुदेव चौगुले

मिरज-लोंढा लोहमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. जुन्या लोहमार्गाच्या बाजूने नव्या लाईनकरिता जागा सपाटीकरणासाठी रेल्वे पुलानजीकची झाडे हटविण्यात येत असल्याने महामार्ग व लोहमार्ग दरम्यान शिल्लक उरलीसुरली वनराईही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

बेळगाव-पणजी महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी रस्त्याबाजूची हिरवीगार वनराई यापूर्वीच तोडण्यात आली आहे. यामुळे महामार्गावरील प्रवाशांना सावली देणारी गर्द झाडे नष्ट झाल्याने खानापूर ते बेळगावचा प्रवास रखरखीत उन्हात करावा लागतो. यातच आता लोहमार्गाबाजूला असलेली झाडेही तोडण्यात येत असल्याने रस्त्याबरोबरच रेल्वेचा प्रवास करताना आल्हाददायक वनसंपदा लुप्त होणार आहे.

मिरज-लोंढा लोहमार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी पूर्वतयारीचा भाग म्हणून रेल्वेलाईनच्या बाजूने असणारी झाडे हटविली जात आहेत. देसूर, इदलहोंड, अंकले, हत्तरगुंजी ते मराठा मंडळ पदवी महाविद्यालयापर्यंत जागेच्या सपाटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तेथून पुढे लोहमार्गाच्या दोन्ही बाजूला गर्द आकेशी व अन्य प्रजातीची झाडे आहेत. यापैकी महामार्गाच्याबाजूने लोहमार्गाचे दुपदरीकरण केले जाणार असल्याने एका बाजूची झाडे हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

खानापूर शहरानंतरही बर्‍याच ठिकाणी लोहमार्गाच्या दुतर्फा हिरवीगार गर्द झाडी रेल्वेप्रवाशांचा प्रवास सुखकर बनविण्याचे काम करते. त्यापैकी एका बाजूची झाडे दुपदरीकरणासाठी हटवावी लागणार असल्याने महामार्गासारखीच लोहमार्गाचीही उजाड अवस्था होणार आहे. रेल्वे प्रवाशांना गर्द झाडी दिसल्यावर खानापूर आल्याची जाणीव होत असते. ही झाडे हटविल्यानंतर लोहमार्गालाही रखरखीतपणा येणार असल्याने ते टाळण्यासाठी रेल्वेने लोहमार्गाच्या बाजूला वृक्षलागवडीसाठी आतापासूनच नियोजन करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

लोहमार्गाच्या दुपदरीकरणानंतर वृक्ष लावून ते जगविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष योजना तयार केल्यास खानापूरची जाणारी ओळख पुन्हा निर्माण करता येऊ शकते. त्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.
 

Tags: tree, cut, railway line, belgaon news