Sun, Mar 24, 2019 16:45होमपेज › Belgaon › रस्त्याच्या दुतर्फा वाहने, वाहतुकीची कोंडी

रस्त्याच्या दुतर्फा वाहने, वाहतुकीची कोंडी

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 16 2018 8:47PMबेळगाव : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान रोडवर दुतर्फा वाहने पार्किंग केली जात असल्याने वाहतुकीच्या समस्येत वाढ झाली आहे. याकडे वाहतूक विभागाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे वाहनधारकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

शहराचा मुख्य भाग असल्याने या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. चन्नम्मा चौकापासून सरकारी रुग्णालय, केएलई इस्पितळ, एपीएमसी, राष्ट्रीय महामार्गाकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. यामुळे रस्ता नेहमीच गर्दीने फुललेला असतो. रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावल्याने नेहमीच ट्रॅफिकची समस्या उद्भवत आहे. वाहतूक विभागाने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. 

वाहतूक विभागाने यापूर्वी खडेबाजार, गणपत गल्ली, कॉलेज रोड आदी भागात ऑड-इव्हन पार्किंग केले आहे. यामुळे ट्रॅफिकची समस्या कमी झाली आहे. याप्रमाणे डॉ. आंबेडकर उद्यान रोडवरदेखील ऑड इव्हन पार्किंग किंवा येथून पार्किंग हटविण्याची मागणी केली जात आहे. 

या रोडवर सरकारी रुग्णालय तसेच इतर खासगी रुग्णालये, दुचाकी, चारचाकी वाहनांची शोरुम आहेत. कर्मचार्‍यांना रस्त्यावर वाहने लावण्याशिवाय पर्याय राहत नाही. तसेच या भागात वाहनतळ नसल्याने वाहनधारकांना वाहने पार्किंग करण्यास अडथळे येतात. यासाठी वाहनतळाची मागणीही होत आहे. 

दुतर्फा वाहने लावण्याबरोबर रस्त्याचा अर्धा भाग पार्किंगमध्ये जात  आहे. तसेच कार पार्किंग देखील केल्या जात आहेत. यामुळे अडथळ्यात अधिक भर पडत आहे. चन्नम्मा सर्कलचा सिग्नल पडल्यानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. रस्त्यावर वाहने लावली जात असल्याने या अडथळ्यात अधिक भर पडून ट्रॅफिकची समस्या उद्भवते. 

वाहनतळाची समस्या नित्याचीच 

स्मार्टसिटी योजनेत शहराची निवड होऊन दोन वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटला तरीदेखील विकासाला गती येताना दिसत नाही. शहरात वाहनतळाची समस्या गंभीर बनत चालली आहे. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावर ऑड-इव्हन  पार्किंग तसेच कॉलेज रोडवरील पार्किंग हटविण्यात आले. मात्र, पार्किंग स्थळ नसल्याने वाहनधारकांना अडचणी येत आहेत.