Mon, Jun 24, 2019 21:03होमपेज › Belgaon › तपानंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने

तपानंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने

Published On: Apr 22 2018 1:11AM | Last Updated: Apr 22 2018 12:09AMअंकली : प्रतिनिधी

स्थापनेपासून चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व असून आता ‘कमळ’ फुलवण्याचे वेध भाजपला लागले आहेत. ‘सत्तेसाठी काहीही’ या तत्त्वाचा अवलंब करत भाजपने एकसंबा येथीलच दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये एक तपानंतर पुन्हा लढत निर्माण केली आहे. 

काँग्रेसचे आ. गणेश हुक्केरी यांच्याविरोधात भाजपने सहकार नेते अण्णासाहेब जोल्‍ले यांना उमेदवारी दिल्याने एका तपानंतर एकसंब्यातील दोन पारंपरिक कुटुंबात पुन्हा लढत रंगणार आहे. पूर्वी सदलगा विधानसभा मतदार संघ असताना अण्णासाहेब जोल्‍ले यांनी तत्कालीन आ. प्रकाश हुक्केरी यांच्याशी दोनवेळा लढत दिली होती. पण दोन्हीवेळा त्यांना अपयश आले. त्याचदरम्यान जि. पं. निवडणुकीत गणेश हुक्केरी यांच्याविरोधातही अण्णासाहेब जोल्‍ले यांची पत्नी शशिकला जोल्‍ले यांनीही निवडणूक लढविली होती. पण त्यातही काँग्रेसकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

2008 नंतर विधानसभा मतदार संघाचे विभाजन होऊन निपाणी व चिकोडी-सदलगा हे दोन मतदारसंघ निर्माण झाले. त्यावेळी जुन्या सदलगा विधानसभा मतदारसंघातील गावे नव्या निपाणी मतदारसंघात समाविष्ट करण्यात आल्याने शशिकला जोल्‍ले यांनी निपाणी विधानसभा मतदार संघाला आपले राजकीय कार्यक्षेत्र बनवले. पहिल्यांदा येथे तत्कालीन काँग्रेसचे आ. काकासाहेब पाटील, भाजपच्या शशिकला जोल्‍ले व निजदचे प्रा. सुभाष जोशी यांच्यात तिरंगी लढत झाली व त्यात काकासाहेब पाटील विजयी झाले होते. 2013 च्या निवडणुकीत जोल्‍ले यांनी जोशी यांना आपल्या गटात घेत दुरंगी लढतीचे चित्र निर्माण केले. काँग्रेसविरोधी मतांची विभागणी रोखण्यात यश आल्याने या निवडणुकीत शशिकला जोल्‍लेे या विजयी झाल्या. विकास कामांचा सपाटा व विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे घेण्यावर लक्ष देण्यात आले. त्यानंतर नगरपंचायतीच्या निवडणुकीत अण्णासाहेब जोल्‍ले यांनी एकसंबा नगरपंचायतीवर सत्ता मिळविली.चिकोडी सदलगा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी या गणेश हुक्केरी यांच्या विरोधात निवडणूक लढवली. पण ते पराभूत झाले. आता काँग्रेसच्या पराभवासाठी भाजपने अण्णासाहेब जोल्ले यांना उमेदवारी दिली आहे.

Tags : Belgaum,  traditional, competitive, confrontation