Fri, Mar 22, 2019 23:53होमपेज › Belgaon › घरच्यांनी सोडले दुसर्‍यांनी तारले

घरच्यांनी सोडले दुसर्‍यांनी तारले

Published On: Feb 10 2018 1:28AM | Last Updated: Feb 09 2018 11:59PMबेळगाव : प्रतिनिधी

टिळकवाडी भाजी मार्केटमध्ये मागील तीस वर्षापासून भाजी विकून आपला उदरनिर्वाह करणार्‍या आजीबाईकडे सामाजिक संस्थांनी दुर्लक्ष केले आहे. आपला स्वाभिमान जिवंत ठेवून कोणाकडेही दया वा भिकेची मागणी न करता या आजीबाई जीवन जगत आहेत. त्यांच्या घरच्यांनीही त्यांच्याकडे दूर्लक्ष केले आहे. पण त्यांना साथ मिळतेय ती अन्य भाजी विक्रेत्यांची.

यामुळे घरच्यांनी सोडले व दुसर्‍यांनी तारले, याचा प्रत्यय आला। टिळकवाडी येथील कलामंदिरच्या मागील बाजूला भाजी मंडई आहे. त्या ठिकाणी  मल्लव्वा शानवी (85) भाजी विकत बसतात. त्या वयस्क असल्याने शांता शहापूरकर या मुख्य भाजी मार्केटमधून भाजी विकण्यासाठी त्यांच्याकडे आणून देतात. मारुती खन्नुरकर, शोभा पवार व ज्योती शेखरशेट्टी आदींची त्यांना मदत व आपुलकीची  माया मिळते. 

मल्लव्वा यांचे मूळ गाव शिरोली (ता. चंदगड). विशीतच लग्न झाल्याने संसाराची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली. कुटुंबात आई, वडील व 9 जण भावंडे असे एकूण 11 सदस्य कुंटुबात होते. मल्लव्वा शानवी या सर्वांत मोठ्या आहेत. त्यांच्या बहिणी बेळगावात वास्तव्यास आहेत. त्यांचे त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. त्यांची दोन सावत्र मुले आहेत. ती आपल्या आईवडिलांसोबत मुंबईला वास्तव्यास असतात. वर्षभरातून एकदा ती आजीबाईला पाहायला येतात. आजीबाईही त्यांच्याकडून कोणतीही आशा ठेवत नाही. संकटांचा सामना करत त्या  धैैर्याने तोंड देत आहेत. 

टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेटवर नेहमी आत्महत्येच्या घटना घडतात.  यासंबंधी त्या म्हणाल्या, जीवन हे एकदाच मिळते. यामुळे कोणीही आत्महत्या करून नये वा असा विचारही मनात आणू नये. कुटुंबापासून दूर असलेल्या आजीबाईंच्या मनात एकदाही आत्महत्येचा विचार आला नाही. उलट आत्महत्या करू नका, असा संदेश त्या देतात. त्यामुळे त्या इतरानांही प्रेरणादायी  ठरतात.

मागील तीस वर्षांपासून मी मल्लव्वा शानवी यांना ओळखतो. त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे. काहीही अडचण असेल तर आम्ही सर्वजण हक्काने मदत करतो. घरच्यांनीही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. भाड्याच्या खोलीत राहून त्या जीवन जगत आहेत.  

- मारुती खन्नुरकर

मल्लव्वा शानवी  वयस्क असल्याने त्यांना भाजी मार्केटमधून भाजी आणून देतो. येथील सर्वजण त्यांना मदत करतात. या ठिकाणी त्या भाजी विक्री करतात व आपला उदरनिर्वाह चालवतात. 

- शोभा पवार, भाजी विक्रेत्या

भाजी मार्केटमधील सर्वजण आजींच्या हाकेला नेहमी धावतात. सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यंत त्या येथे भाजी विक्रीसाठी बसतात. सामाजिक संस्थांनी त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

- ज्योती शेखरशेट्टी, भाजी विक्रेत्या